विधानसभेत बहुमत मिळाल्यानंतर महायुती सरकार सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली करत आहे. आजच एकनाथ शिंदे यांनी राजभावनात मुख्यमंत्रीपदाचा(political updates) राजीनामा दिला आहे. यानंतर मुख्यमंत्री पद कुणाला मिळणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. राजकीय वर्तुळात सध्या देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार, अशा जोरदार चर्चा आहेत. अजित पवार गटाकडूनही याला पसंती मिळाली असल्याचं कळतंय.
अजित पवार गटाने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा दिला असला तरी शिंदे सेना बिहार मॉडलची चर्चा करताना दिसत आहे. शिंदे सेनेकडून एकनाथ शिंदे यांनाच संधी मिळावी म्हणून आग्रह केला जातोय. तर, फडणवीस यांच्या नावाला दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळाल्याचं म्हटलं जातंय. यासोबतच आरएसएसनेही त्यांच्या नावाला पाठिंबा दिलाय.
त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री(political updates) पदाचे पक्के दावेदार मानले जात आहेत. मात्र, असं करताना भाजपा 3 मुद्यांचा विचार करेल, याची शक्यता आहे. भाजपच्या विजयात ओबीसी समाजाचा मोठा वाटा राहिला आहे. आजच ओबीसी महासंघाकडून राज्यात ओबीसींच्या हिताचं रक्षण करणारे मुख्यमंत्री असावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
भाजपाने देशभरात राष्ट्रपतीपासून ते राज्यपालांपर्यंत अनुसूचित जाती-जमातींना प्राधान्य दिलं आहे. त्यातच कॉँग्रेस नेते राहुल गांधी हे सतत जातनिहाय जनगणनेविषयी आक्रमक दिसून येतात.असं असताना ओबीसी मतांवर, ब्राह्मण मुख्यमंत्री पदावरून विरोधक हल्लाबोल करू शकतात. त्यामुळे भाजपा या गोष्टीचा विचार करू शकते. त्यातच आता बिहार आणि दिल्लीमध्येही निवडणुका होत आहेत. त्याचाही विचार पक्षश्रेष्ठी करतील.
दूसरा मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदे यांचा पक्ष होय. महायुतीमध्ये शिंदे गटाला 57 जागा मिळाल्या आहेत. तर अजित पवारांकडे 41 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यात शिंदे गटाकडे अधिक संख्याबळ आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या लोक कल्याणकारी धोरणांना सुद्धा श्रेय दिले जात आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्या नावाची शिफारस आग्रहाने केली जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची नाराजी महायुती ओढावून घेणार नाही, असंही म्हटलं जातंय.
तिसरा मुद्दा म्हणजे मराठा समाजाची नाराजी. गेल्या काही महिन्यात देवेंद्र फडणवीस आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यातील शाब्दिक युद्ध नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी तर देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात उघड मोर्चा देखील काढल्याचे दिसून आले. त्यातच मुख्यमंत्री पदी एक ब्राम्हण चेहरा बसल्यावर त्याचे चित्र काय उमटेल, या गोष्टींचाही विचार केला जाऊ शकतो. आता महायुती काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
हेही वाचा :
… त्या गोष्टीसाठी भाजप शिंदे व अजित पवारांचा पक्ष फोडेल!
हिंदुंच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या चिन्मय दास यांना अटक
धक्कादायक… घंटागाडीने दीड वर्षांच्या चिमुकल्याला चिरडलं