19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा पाकिस्तानात खेळवली जाणार असून भारतीय क्रिकेट संघाचे(Team India) स्पर्धेतील सर्व सामने हे दुबईत होतील. चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जवळ येऊ लागल्याने जर्सीवरील नावा संदर्भातील नवा वाद समोर आला होता.
आयसीसी स्पर्धेच्या लोगो सोबत स्पर्धेचे आयोजन ज्या देशात होतंय त्या देशाचे नाव प्रत्येक संघाच्या जर्सीवर लिहिणे महत्वाचे असते. परंतु भारत चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्व सामने दुबईत खेळणार आहेत त्यामुळे बीसीसीआय टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव लिहिण्यास तयार नाही अशी माहिती समोर येत होती. मात्र आता या वादावर बीसीसीआयच्या सचिवांनी पडदा टाकला आहे.
आयसीसीच्या स्पर्धांचे यजमानपद ज्या देशाकडे असते त्या देशाचे नाव स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांना त्यांच्या जर्सीवर लिहावे लागते. मात्र बीसीसीआय टीम इंडियाच्या(Team India) जर्सीवर चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमान असणाऱ्या पाकिस्तानचं नाव लिहिणार नाही अशी माहिती समोर येत होती.
या कारणामुळे पीसीबीचे अधिकारी बीसीसीआयवर नाराज होते आणि त्यांनी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डावर खेळात राजकारण आणत असल्याचे आरोप केले. याबाबत पीसीबीने आयसीसीला देखील मध्यस्थी करण्याची मागणी केली होती. आता यावर बीसीसीआयचे नवे सचिव देवजित सैकिया यांनी क्रिकेट बोर्डाची भूमिका स्पष्ट केली आहे.
बीसीसीआयचे माजी सचिव जय शाह यांनी आयसीसीच्या चेअरमनपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मागील आठवड्यात बीसीसीआयच्या बैठकीत नवे सचिव म्हणून देवजित सैकिया उन्ची निवड करण्यात आली. ५५ वर्षांचे देवजीत सैकिया हे पुढील 10 महिन्यांसाठी बीसीसीआयचे सचिव असतील. देवजीत सैकिया हे आसामचे माजी क्रिकेटर असून पेशाने वकील आहेत.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार ‘बीसीसीआयच्या सचिवांनी सांगितले की चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये बीसीसीआय खेळाडूंच्या गणवेशासंदर्भातील आयसीसीने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करेल’. याचाच अर्थ असा की टीम इंडियाच्या जर्सीवर चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमान असणाऱ्या पाकिस्तानचे नाव लोगो सोबत प्रिंट केले जाईल. मात्र याबाबत बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया साईटवर माहिती दिलेली नाही.
आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांच्या कर्णधारांची पत्रकार परिषद पाकिस्तानातील प्रमुख शहरात पार पडणार आहे. तसेच ट्रॉफीसोबत सर्व कर्णधारांचे फोटोशूट देखील पार पडेल. याकरता पीसीबीकडून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला आमंत्रण देण्यात आले होते.
मात्र या पत्रकार परिषद आणि फोटोशूटसाठी बीसीसीआय टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला पाकिस्तानात पाठवण्यास तयार नाही. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार रोहित शर्मा पाकिस्तानला जाणार नाही अशी माहिती समोर आली आहे.
भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार) , शुभमन गिल (उपकर्णधार) , विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षत पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा
हेही वाचा :
प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मांना तुरुंगवासाची शिक्षा; कोर्टाचा मोठा निर्णय
ठाकरे गटाचे १० माजी आमदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; उदय सामंत यांचा गौप्यस्फोट
किसान सन्मान निधीची रक्कम वाढणार? अर्थसंकल्पातून शेती क्षेत्राला मिळणार का नवे वळण?