राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल झाला आहे. मुंबईतही मान्सूनची (rain)दमदार सुरुवात झाली आहे. शुक्रवार सकाळपासून मुंबईत पाऊस सुरु आहे. तसेच राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये पावसाच्या यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. विदर्भातील यवतमाळ, वर्धा, अमरावती, बुलढाणा, वाशिममध्ये यलो अलर्ट दिला आहे. रत्नागिरी, पुणे, ठाणे, अहमदनगर, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट दिला आहे. मान्सून वेळेवर आल्यामुळे शेतकऱ्यांनी कामाला सुरुवात केली आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाला(rain) सुरुवात झालेली आहे. दादर परिसरात सकाळपासून रिमझिम पाऊस होत आहे. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हवामान खात्याकडून मुंबई, ठाणे, पालघर रायगड या ठिकाणी मुसळधार पाऊस पाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, गोरेगाव परिसरात पाऊस पडत आहे.
कोकणात पाऊस सुरु आहे. रत्नागिरी अन् चिपळूणमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने 16 जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पहिल्या पंधरवड्यात दीड हजार मिमी पावसाचा टप्पा पार झाला आहे. या पावसामुळे धरणांच्या पाण्याची पातळी वाढली आहे.
रत्नागिरी पावसामुळे राजापूरमधील अणूस्कूरा घाटात दरड कोसळली आहे. कोकणातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा सर्वात जवळचा घाट म्हणून अनुस्कुरा घाटाची ओळख आहे. पावसाच्या सुरुवातीलाच या घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाल्याने भविष्यात या घाटातील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरड हटवून रस्ता मोकळा करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरु आहे.
जळगाव शहरामध्ये मान्सूनच्या दुसऱ्या पावसात दाणादाण उडाली आहे. जळगावमध्ये मान्सूनच्या दुसऱ्या पावसाची जोरदार बॅटिंग शुक्रवारी झाली. या मुसळधार पावसामुळे दुकानदारांसह नागरिकांची तारांबळ उडाली. जळगाव शहरातील छत्रपती क्रीडा संकुल परिसरासह वेगवेगळ्या भागातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले. तसेच मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यावरच तलाव साचले. रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. वृक्ष उन्मळून विजेच्या तारांवर कोसळल्यामुळे जळगावच्या आर आर विद्यालय परिसरात वीज पुरवठा खंडीत झाला.
हेही वाचा :
विधानसभा निवडणुकीतही जरांगे फॅक्टर “मविआ” ला तारणार?
आज शेअर बाजारात संमिश्र संकेत; कोणते शेअर्स असतील चर्चेत?.
भाज्यांचे दर वाढल्याने सामान्यांना फुटला घाम; दर १०० पार