शरद पवारांकडून धनंजय मुडेंचा ‘टप्प्यात कार्यक्रम’? 

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या महत्त्वाच्या मतदारसंघांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल असा मतदारसंघांमध्ये परळीचाही समावेश होतो. मागील विधानसभेला या मतदारसंघात बहीण विरुद्ध भाऊ अशी थेट लढत झाली होती. फूट पडण्याआधीच्या राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या धनंजय मुंडेंनी भारतीय जनता पार्टीच्या पंकजा मुंडेंना धूळ चारली होती. मात्र मागील पाच वर्षांमध्ये पुलाखालून बरंच पाणी गेलं असून या भागातील राजकीय समिकरणं दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पडल्याने पूर्णपणे बदलली आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार परळीमध्ये मराठा कार्ड खेळण्याची शक्यता अधिक वाढली आहे. शरद पवार यांनी धनंजय मुंडेंविरुद्ध तगडा उमेदवार देण्याची तयारी सुरु केली असून केवळ अजित पवार गटच नाही तर पवार या मतदारसंघात भाजपालाही घाम फोडतील अशी शक्यता सध्या तरी व्यक्त केली जात आहे. शरद पवार ज्या व्यक्तीच्या जीवावर राष्ट्रवादीमधील फुटीनंतरही गोपीनाथ मुंडेंचा हा बालेकिल्ला पुन्हा जिंकू इच्छितात त्या व्यक्तीचं नाव आहे, रावसाहेब देशमुख! 

धनंजय मुंडेंची चिंता वाढली

आगामी विधानसबा निवडणूकीत पुन्हा एकदा परळीमध्ये विजयी पताका फडकावण्यासाठी शरद पवारांनी तयारी सुरु केली आहे. विद्यमान खासदार आणि अजित पवारांबरोबर बंडखोरी करणारे धनंजय मुंडेंना शह देण्यासाठी पवारांनी शड्डू ठोकत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शदर पवार या अत्यंत महत्त्वाच्या मतदरासंघात राजेसाहेब देशमुख यांच्या रुपात अगदीच नवा उमेदवार देण्याची दाट शक्यता आहे. राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे बीडचे जिल्हाध्यक्ष आहे. राजेसाहेब देशमुख यांनी नुकतीच ‘सिल्वर ओक’वर शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर पवार परळीमध्ये मराठा कार्ड वापरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पवारांची ही खेळी धनंजय मुंडेंना महागात पडू शकते. सध्या धनंजय मुंडे हे परळीमधून आमदार असून महायुतीच्या सरकारमध्ये कृषीमंत्री आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या पक्षाला ही जागा आगामी निवडणुकीत सुटेल आणि या ठिकाणाहून पुन्हा धनंजय मुंडे हेच निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार हे निश्चित मानलं जात आहे. हीच बाब लक्षात घेऊन शरद पवारांनी या मतदारसंघासाठी विशेष नियोजन सुरु केलं आहे.