कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : स्वातंत्र्याच्या लढाईचा, चळवळीचा मूक साक्षीदार(transportation) असलेल्या बिंदू चौकाला अनन्य साधारण महत्व आहे. ऐतिहासिक बिंदू चौकातील व्यासपीठावरून व्यक्त केलेला सामाजिक तसेच राजकीय विचार हा महाराष्ट्रात सर्व दूर पोहोचतो असे म्हटले जाते. या चौकात आत्तापर्यंत किती जाहीर सभा झाल्या याची गणतीच करता येणार नाही.
वाहतुकीची(transportation) प्रचंड कोंडी होते म्हणून गेल्या पंचवीस वर्षांपासून बिंदू चौकातील जाहीर सभांना प्रशासनाकडून परवानगी दिली जात नाही. त्यामुळे जाहीर सभांची ठिकाणे आता बदलली आहेत. मिरजकर तिकटी, महाराणा प्रताप चौक, निर्माण चौक, तपोवन, दसरा चौक, पेटाळा, सासणे मैदान ,गांधी मैदान येथे जाहीर सभा होतात. सभेला कोण संबोधित करणार आहे यावरून प्रचार किंवा अन्य सभांची ठिकाणी निश्चित केली जातात.
जाहीर सभांसाठी पूर्वी विद्युत चौक हा एकमेव पर्याय असायचा. आचार्य प्र के अत्रे, बाळासाहेब ठाकरे, एस एम जोशी, नानासाहेब गोरे, कॉम्रेड डांगे, कॉम्रेड यशवंत चव्हाण, कॉम्रेड संतराम पाटील, कॉम्रेड गोविंद पानसरे, कॉम्रेड पी डी दिघे, एन डी पाटील, याशिवाय तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले, शरद पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन, यांच्याशिवाय माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, चौधरी चरण सिंग, अशा कितीतरी नेत्यांनी बिंदू चौकातील जाहीर सभा गाजवल्या आहेत.
इथल्याच एका सभेत माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी महाराष्ट्र अनेक कर्नाटक दरम्यानचा सीमा प्रश्न केव्हाच सुटलेला आहे असे परखडपणे सांगितलेले होते. तेव्हा त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी झाली होती. बिंदू चौक हा मध्यवर्ती ठिकाणी आहे, तो प्रशस्त आहे, अनेक रस्त्यांचे फाटे येथे फुटलेले दिसतात. बिंदू चौक गर्दीने तुडुंब भरला की दहा ते बारा हजार लोकांची गर्दी समजले जायचे. ही सभा प्रचंड गर्दीची म्हटली जायची. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ हा बिंदू चौकातील सभेने व्हायचा.
महाराष्ट्र कर्नाटक दरम्यानच्या सीमा वादावर याच बिंदू चौकात साथी एस एम जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सीमा परिषद झाली होती. तेव्हा बाळासाहेब ठाकरे हे कोल्हापुरात असूनही बिंदू चौकातील सीमा परिषदेकडे ते फिरकलेले नव्हते. प्रसार माध्यमांनी त्यांना याबद्दल छेडले होते तेव्हा, अशा सीमा परिषदांवर माझा विश्वास नाही अशी प्रतिक्रिया बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती. बाळासाहेब ठाकरे यांची सुमारे 50 वर्षांपूर्वी बिंदू चौकात जाहीर सभा झाली होती तेव्हा एका कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून सभा उधळण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा माझ्या सभेत गडबड करणार हे लाल माकड दिसतंय अशी उपरोधिक टीका त्यांनी केली होती.
अटल बिहारी वाजपेयी, पु. ल. देशपांडे, बाळासाहेब ठाकरे, इंदिराजी गांधी यांच्या विक्रमी गर्दीच्या जाहीर सभा गांधी मैदानावर झालेल्या होत्या. त्यानंतर अति गर्दीच्या सभांसाठी गांधी मैदानच निश्चित करण्यात येऊ लागले. या मैदानावर अनेकांच्या सभा गाजल्या आणि वाजल्या. एचडी देवेगौडा हे पंतप्रधान असताना त्यांची एक सभा गांधी मैदानावर झाली होती आणि पंतप्रधान असूनही त्यांच्या सभेला फारशी गर्दी झालेली नव्हती. सर्वात कमी गर्दीची गांधी मैदानावरील सभा असे त्या जाहीर सभेचे वर्णन करावे लागेल.
अटल बिहारी वाजपेयी यांची एक सभा शाहू खासबाग मैदानाच्या बाहेरील रस्त्यावर झाली होती तर समता परिषदेच्या निमित्ताने ते कोल्हापूरला आले होते तेव्हा त्यांची एक सभा राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या समोरच्या भागात झाली होती. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांची एक सभा सासणे विद्यालय मैदानावर झाली होती आणि 2014 मध्ये ते पहिल्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर त्यांची कोल्हापुरातील एक प्रचारसभा तपोवन मैदानावर झाली होती.
माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची एक जाहीर सभा गांधी मैदानावर झाली होती. त्यांचे भाषण सुरू असताना मैदानाच्या मागील बाजूने कुणीतरी फटाके उडवायला सुरुवात केली. त्यामुळे अडवाणी यांच्या सभेत व्यत्यय येऊ लागला. तेव्हा संतप्त बनलेल्या सुधीर मनगुंटीवार यांनी सतेज पाटील यांना ते ग्रह खात्याचे राज्यमंत्री होते म्हणून फटकळ भाषेत सुनावले होते. त्यानंतर फटाके फोडणाऱ्या त्या युवा कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केली होती.
शिवाजी विद्यापीठ परिसरात राजाराम महाविद्यालया नजीकच्या मोकळ्या जागेत काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची एक जाहीर सभा झाली होती तर तपोवन येथे सुद्धा त्यांची एक जाहीर सभा झाली होती. आणीबाणी उठल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. काँग्रेसचे गाय वासरू हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले होते. हात हे नवे चिन्ह मिळाले होते. हे चिन्ह मिळाल्यानंतर त्यांची झालेली महाराष्ट्रातील पहिली सभा गांधी मैदानावर मध्यरात्री झाली होती. मध्यरात्र असूनही सभेसाठी गांधी मैदान गर्दीने तुडुंब भरलेले होते. तेव्हा बाबुराव धारवाडे हे काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष होते तर शामराव भिवाजी पाटील हे जिल्ह्याचे अध्यक्ष होते. तेव्हा आय काँग्रेस या नावानेच आत्ताच्या काँग्रेसला ओळखले जात होते.
हेही वाचा :.
ठाकरेंचा भाजपला दे धक्का…; ‘तो’ नेता हाती शिवबंधन बांधणार, सूत्रांची माहिती
देशभरात लागू झाला ‘वन व्हीकल वन फास्टॅग’ नियम; काय आहे कारण?.
17 रुपयांची साडी…2 कोटींची गाडी…महायुतीत निवडणुकीच वातावरण तापलं