संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थान सलग पाचव्या विजयासाठी सज्ज

संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सचा संघ सलग पाचव्या विजयाला गवसणी घालण्यासाठी मैदानात उतरणार आहे. राजस्थानसमोर आयपीएलच्या उद्या होणार असलेल्या लढतीत गुजरात टायटन्सचे(gujarat titans) आव्हान असणार आहे.


जयपूर : संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सचा संघ सलग पाचव्या विजयाला गवसणी घालण्यासाठी मैदानात उतरणार आहे. राजस्थानसमोर आयपीएलच्या उद्या होणार असलेल्या लढतीत गुजरात टायटन्सचे(gujarat titans) आव्हान असणार आहे.राजस्थानसाठी यशस्वी जयस्वालचा सुमार फॉर्म चिंतेचा विषय असून शुभमन गिलच्या नेतृत्वात गुजरातचा संघ सलग तिसरा पराभव टाळण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करील. राजस्थानसाठी संजू सॅमसन व रियान पराग उल्लेखनीय कामगिरी करीत आहे.

सॅमसन याने दोन अर्धशतकांसह १७८ धावांचा पाऊस पाडला असून पराग याने दोन अर्धशतकांसह १८५ धावांची फटकेबाजी केली आहे. मात्र, यशस्वी जयस्वालला अद्याप मोठी कामगिरी करता आलेली नाही. त्याला चार लढतींमधून फक्त ३९ धावाच करता आल्या आहेत. यशस्वीसह शिमरोन हेटमायर व ध्रुव जुरेल या फलंदाजांनाही आपला खेळ उंचवावा लागणार आहे.

राजस्थानचा संघ गोलंदाजी विभागातही प्रभावी कामगिरी करीत आहे. ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर व युझवेंद्र चहल यांनी प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवताना राजस्थानसाठी मोलाची कामगिरी केली आहे. रवीचंद्रन अश्‍विनला अद्याप सूर गवसलेला नाही.

चार सामन्यांमधून त्याला फक्त एकच फलंदाज बाद करता आलेला आहे. तसेच षटकामागे आठ धावा त्याच्या गोलंदाजीवर देण्यात आल्या आहेत. ‍अश्‍विनकडे प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे सुमार फॉर्ममधून तो नक्कीच बाहेर येईल.
गिल, सुदर्शनवर मदार


गुजरातचा कर्णधार शुभमन गिल याने यंदाच्या आयपीएल मोसमात चमक दाखवली आहे. त्याने पाच सामन्यांमधून १८३ धावा फटकावल्या आहेत. साई सुदर्शनने समाधानकारक फलंदाजी केली आहे. मात्र, त्यालाकाही अर्धशतक झळकावता आलेले नाही. या दोन फलंदाजांवरच गुजरातच्या फलंदाजीची मदार असणार आहे. तसेच डेव्हिड मिलर, केन विल्यमसन, राहुल तेवतिया, विजय शंकर या स्टार खेळाडूंनी कात टाकायला हवी.

अफगाणच्या गोलंदाजांनी खेळ उंचवावा
अझमतुल्ला ओमरजाई, राशीद खान व नूर अहमद हे अफगाणिस्तानचे तिन्ही गोलंदाज गुजरातच्या संघात आहेत. या तिन्ही गोलंदाजांना आपला खेळ उंचवावा लागणार आहे. मोहित शर्मा व उमेश यादव हे भारतीय वेगवान गोलंदाज गुजरातसाठी मोलाची कामगिरी करीत आहेत. मात्र, पंजाबविरुद्धच्या लढतीत शशांक सिंग व आशुतोष शर्मा या फलंदाजांना रोखण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे आता गुजरातच्या गोलंदाजांना सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे.

हेही वाचा :

सांगलीतून विशाल की चंद्रहार पाटील? तडजोडीस उद्धव ठाकरेंचा नकार, ‘मविआ’कडून आज घोषणा

मनोरंजन जोरदार, तुम्ही आहात का तय्यार ? एअरटेल एक्स्ट्रीम फायबरसोबत मिळेल शानदार एंटरटेनमेंट

२०२२ मध्ये वेगळं होण्याचा निर्णय, २ वर्षांनंतर घटस्फोटाचा अर्ज! धनुष- ऐश्वर्याबाबत मोठी अपडेट