हातकणंगलेत तीन अपक्ष आमदारांची बंद खोलीत चर्चा; कोरे-आवाडे- यड्रावकरांचं काय ठरलं

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार(f mla) धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी सध्या भाजपसोबत असलेल्या नेत्यांची भूमिका अजूनही गुलदस्तात आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘जनसुराज्य’चे आमदार डॉ. विनय कोरे यांनी इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांची, तर आवाडे यांनी शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भेट घेऊन चर्चा केली, तर तिघांनीही दोन तास बंद खोलीत चर्चा केल्याची माहिती आहे.

दरम्यान, या मतदारसंघातून साखर कारखानदारांचा म्हणून स्वतंत्र उमेदवार(f mla) उभा करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे समजते. त्यातून या तीन नेत्यांनी एकमेकांची भेट घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. संपर्काचा अभाव, विकासकामांबाबतची नाराजी यातून खासदार माने यांना उमेदवारी मिळेल का नाही ? यावरच प्रश्‍नचिन्ह होते.

तत्पूर्वीच आवाडे यांचे पुत्र व माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी या मतदारसंघातून लढण्याची घोषणा करून अप्रत्यक्षरीत्या माने यांच्या उमेदवारीलाच आव्हान दिले होते. त्यानंतर राहुल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य नेत्यांच्या भेटी घेऊन लढण्याची तयारी दर्शवली होती; पण तोपर्यंत महायुतीकडून खासदार माने यांची उमेदवारी जाहीर झाली.

खासदार माने यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतरही आवाडे असो किंवा यड्रावकर हे महायुतीच्या प्रचारात सक्रिय नसल्याची चर्चा मतदारसंघात आहे. कोरे हे सध्या भाजपसोबत असल्याने माने यांच्या विजयाची जबाबदारी त्यांच्यासह इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यावर आहे. या प्रचारात आवाडे व यड्रावकर यांनी सक्रिय राहावे, यासाठी डॉ. कोरे यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातून डॉ. कोरे यांनी काल सायंकाळी आवाडे यांची भेट घेतली.

माजी खासदार कल्लाप्पा आवाडे यांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी आपण गेल्याचा दावा डॉ. कोरे यांनी केला असला, तरी त्यामागे आवाडे यांना सक्रिय करणे हा हेतू असल्याचे समजते. त्यानंतर कालच मध्यरात्री आवाडे यांनी यड्रावकर यांची त्यांच्या नरंदे येथील निवासस्थानी भेट घेतली. यड्रावकर हेही सध्या प्रचारात सक्रिय नसल्याचे चित्र आहे. या दोघांत दोन तासांहून अधिक काळ चर्चा झाली; पण चर्चेचा तपशील समजला नाही.

हेही वाचा :

Hyundai Grand i10 नवीन व्हर्जनमध्ये लाँच; जबरदस्त लूक आणि दमदार इंजिन

Jr NTR ‘वॉर २’च्या शूटिंगसाठी मुंबईत दाखल, हृतिक रोशनसोबत करणार ॲक्शन सीन्स

हातकणंगलेत जयंत पाटलांचा नवा डाव.. थेट शिंदे समर्थक आमदाराची घेतली भेट; धैर्यशील मानेंच्या अडचणी वाढणार?