पराभवाची परतफेड करण्यास चेन्नई सज्ज! LSG विरुद्ध 5 दिवसांत दुसरा सामना

गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज(csk) आणि लखनौ सुपर जाययंटस् हे संघ पाच दिवसांत दुसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत.


शुक्रवारी झालेल्या सामन्यात चेन्नईला (csk)लखनौकडून अनपेक्षित पराभवाचा सामना कराव लागला. त्याची परतफेड करण्याची संधी चेन्नईला आज घरच्या मैदानावर मिळणार आहे.

लखनौमध्ये झालेल्या त्या पराभवामुळे चेन्नईची गाडी ८ गुणांवरच थांबली. मात्र लखनौनेही ८ गुण मिळवत गुणांची बरोबरी साधली. गुणतक्त्यात चेन्नई चौथ्या स्थानी असले तरी हे स्थान कायम राखण्यासाठी किंवा पुढे प्रगती करण्यासाठी त्यांना विजय आवश्यक आहे.
लखनौमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात चेन्नईचा संघ जिंकेल याची शक्यता अधिक होती; परंतु त्यांची फलंदाजी कोलमडली. महेंद्रसिंग धोनीने केलेल्या टोलेबाजीमुळे पावणे दोनशे धावांपर्यंत मजल मारता आली होती. एवढ्या धावाही विजयासाठी पुरेशा ठरू शकतात; परंतु लखनौचे सलामीवीर केएल राहुल आणि क्विनटॉन डिकॉक यांनी १३४ धावांची सलामी देत चेन्नईचे प्रयत्न फोल ठरवले होते. गेल्या सामन्यातील या चुका कशा टाळल्या जातात यावर चेन्नईचे विजयाचे गणित अवलंबून असेल.

चेन्नई संघात धोनीचा अपवाद वगळता तसे नावाजलेले आणि विख्यात फलंदाज नसले तरी कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यंदा त्यांच्या फलंदाजीची प्रमुख धुरा वाहत आहेत; परंतु शुक्रवारच्या सामन्यात हे दोघेही लवकर बाद झाले होते. चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या रवींद्र जडेजाने शानदार अर्धशतकी खेळी केली होती. त्यानंतर मोईन अलीच्या ३० आणि धोनीचा ९ चेंडूंतील नाबाद २८ धावांचा झंझावात मोलाचा ठरला होता.

चेन्नईची गोलंदाजीही यंदाच्या त्यांच्या प्रवासात चांगले योगदान देत आहे; परंतु शुक्रवारी तेसुद्धा अपयशी ठरले. पथिराना आणि मुस्तफिझुर रहिम १५ षटकांत लखनौचे सलामीवीर राहुल आणि डिकॉक यांना बाद करू शकले नाहीत. तेथेच त्यांची लढत तोकडी पडली. यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक डॉट बॉल (निर्धाव) चेंडू टाकणाऱ्या तुषार देशपांडेविरुद्ध ४ षटकांत ४२ धावा चोपण्यात आल्या होत्या.

मयंक यादवची प्रतीक्षा

आपल्या भन्नाट वेगाने यंदा सुरुवीताच्या सामन्यात सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या मयंक यादवला बरगड्यांची दुखापत झाली. त्यामुळे तो गेल्या काही सामन्यांत खेळलेला नाही. उद्याच्या सामन्यात तो खेळू शकेल असे सांगण्यात येत आहे; परंतु लखनौ संघाचे व्यवस्थापन प्लेऑफच्या भवितव्याचा विचार करून त्याला आताच खेळवण्याचा धोका पत्कारणार नाही. त्यामुळे वेगवान माऱ्याची जबाबदारी मोहसिम खान आणि यश ठाकूर यांच्यावर असेल.

फिरकी गोलंदाज कृणाल पंड्या लखनौसाठी मोल्यवान ठरत आहे. चेन्नईविरुद्ध शुक्रवारी झालेल्या सामन्यात त्याने मोक्याच्या क्षणी दोन विकेट मिळवल्या होत्या. मात्र त्यांचा हुकमी लेगस्पिनर रवी बिश्नोई अपयशी ठरला होता. लखनौचा संघही या चुका आजच्या सामन्यात टाळण्यासाठी प्रयत्नशील असेल.

हेही वाचा :

विज्ञान-रंजन – खग्रास सूर्याचा ‘पाठलाग’

टीसमधील पीएचडी स्कॉलरला दोन वर्षांसाठी केले निलंबित;

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरणपूरक वस्तूंचा घेऊ ध्यास