इम्पॅक्ट प्लेअर फैसला लवकरच , जय शाह यांनी दिले संकेत

इम्पॅक्ट प्लेअरचा(player) आयपीएलवर खूप मोठा ‘इम्पॅक्ट’ झालाय, हे कुणापासूनही लपलेले नाही. इम्पॅक्टवर खुद्द कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा रिअॅक्ट झाल्यानंतर बीसीसीआयनेही आपली भावना व्यक्त केलीय. इम्पॅक्ट प्लेअर हा नियम एक प्रयोग आहे. तो कायमस्वरूपी नसल्याचे वक्तव्य बीसीसीआय सचिव जय शाह यांनी दिले आहे. त्यामुळे या नियमावर दिग्गजांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया पाहता याचा फैसला आयपीएलचे भागधारक, ब्रॉडकास्टर यांच्याशी चर्चा करून लवकरच घेतला जाईल, असेही शाह यांनी स्पष्ट केले आहे.

‘इम्पॅक्ट प्लेअर’ या नियमामुळे आयपीएल सामन्यात दोन जादाच्या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळत असल्यामुळे या बाराव्या खेळाडूचा (player)सामन्यांवर खूप मोठा प्रभाव पडू लागला आहे. याच नियमामुळे आयपीएल हा खेळ ताकदीचा झाला आहे. 250 धावांचे आव्हानही छोटे भासू लागले आहे. एवढेच नव्हे तर या खेळाडूमुळे अष्टपैलू खेळाडूची किंमत कमी झालीय. त्यामुळे खेळाडूसुद्धा या नियमावर बोट ठेवून टीका करू लागले आहेत. हा नियम आयपीएल 2023च्या मोसमापासून लागू करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या दोन हंगामापासून हा नियम आयपीएलमध्ये वापरला जात आहे, मात्र अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या नियमाचा वापर झालेला नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये ‘इम्पॅक्ट प्लेअर’चा नियम हा चर्चेचा विषय ठरला. अनेक खेळाडूंनी यावर टीका करताना हा नियम गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरत असल्याचे सांगितले.
खुद्द हिंदुस्थानच्या टी-20 संघाचा कर्णधार रोहित शर्मानेदेखील ‘इम्पॅक्ट प्लेअर’मुळे अष्टपैलू खेळाडूचे मरण होत असल्याचे भावना व्यक्त केली होती. त्यानंतर हिंदुस्थानचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह यानेदेखील ‘इम्पॅक्ट प्लेअर’ हा फलंदाजांच्या फायद्याचा ठरत असून गोलंदाजांसाठी मारक असल्याचे म्हटले होते.

आता बीसीसीआयनेही या नियमाबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्यामुळे लवकरच याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. जय शाह यांनी या नियमाबाबत कोणताही निर्णय घेतला नसला तरी सर्वांशी चर्चा केल्यानंतर या नियमाचा प्रभाव कमी करण्याबाबत विचार केला जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे 2025 च्या आयपीएलमध्ये ‘इम्पॅक्ट प्लेअर’चा ‘इम्पॅक्ट’ कमी झाला तरी कुणाला आश्चर्य वाटणार नाही. मात्र या नियमामुळे क्रिकेटचे हित जपले जाईल आणि सामन्याची रंगतही वाढेल, असा पर्याय शोधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे समोर आले आहे.
…म्हणून इशान, श्रेयसला करारातून वगळले
बीसीसीआयने वारंवार आदेश दिल्यानंतरही इशान किशन आणि श्रेयस अय्यर हे देशांतर्गत क्रिकेटपासून दूर राहिले. त्यामुळे त्यांना शिक्षेपोटी खेळाडूंच्या वार्षिक करारातून वगळण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता, मात्र दोघांना करार यादीतून बाहेर ठेवण्याचा निर्णय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी घेतला होता. मी फक्त त्याची अंमलबजावणी केल्याचे शाह यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

इचलकरंजी येथील पंचगंगेतील गाळ काढण्यासंदर्भात होणार लवकरच कार्यवाही!

कोल्हापूर, सांगली, अहमदनगर इथं जोरदार पावसाला सुरुवात; ‘या’ जिल्ह्यात लवकरच कोसळणार

मी कुठल्या पाटलाच्या मागे हे 4 जूनला समजेल : विश्वजीत कदमांनी सांगलीचे पत्ते उघड केले