आता मात्र “हद्द”च झाली! पुनश्च हरी ओम…..?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : कोल्हापूर शहराची हद्द वाढ करण्याच्या मागणीवर एक शासन(limit) प्रमुख म्हणून काही आश्वासन देण्याऐवजी कोल्हापूरचा मंगळवारी होणारा नियोजित दौरा च रद्द करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाबद्दल सर्वसामान्य जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. कोल्हापूरला काही द्यायचं नाही, करवीर वासियांची विकासाची झोळी रिकामीच ठेवायची ही शासनकर्त्यांची भूमिका बदलणार कधी? असा संतप्त सवाल विचारला जाऊ लागला आहे. आता दोन्ही औद्योगिक वसाहती वगळून हद्द वाढीचा नवीन प्रस्ताव महापालिकेकडून नगर विकास मंत्रालयाला सादर केला जाणार आहे, म्हणजे पुनश्च हरी ओम! आतापर्यंत किमान अर्धा डझन प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत आणि ते सर्व प्रस्ताव खेळाच्या टोपलीत गेले आहेत.

कोल्हापूर शहराची हद्द वाढ करण्यात यावी. 18 गावांचा समावेश कोल्हापूर(limit) शहरात करावा, कोल्हापूरला सहा जिल्ह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करावे या प्रमुख दोन मागण्यांच्या कडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर शहर सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नियोजित कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्र्यांचा हा दौराचा रद्द झाल्याने कोल्हापूर बंद आंदोलन स्थगित करण्यात आले. आता कोल्हापूर शहर हद्द वाढीच्या मागणीवरून सतेज पाटील विरुद्ध महाडिक यांच्यातील राजकीय वाद पुन्हा उफाळून आला आहे.

सतेज पाटील हे आठ वर्षे काँग्रेसचे शहराध्यक्ष होते आणि पंधरा वर्षे आमदार आहेत. त्यांना कधी शहर हद्द वाढीच्या प्रश्नावरून काळे झेंडे दाखवलेत काय? असा सवाल शौमिका महाडिक यांनी उपस्थित केला आहे. वास्तविक कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समिती आणि सतेज पाटील यांचा तसा फारसा संबंध नाही. ते जिल्हाध्यक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचा एक सदस्य म्हणून या कृती समितीत समावेश आहे इतकेच.

वास्तविक कोल्हापूर महापालिकेची सत्ता महादेवराव महाडिक यांच्याकडे तब्बल वीस वर्षे होती. स्थानिक स्वराज्य संस्था या मतदारसंघातून ते विधान परिषदेवर सलग तीन वेळा निवडून गेले होते. कोल्हापूर शहराची हद्द वाढ करण्याची
जबाबदारी त्यांच्यावर होती तथापि त्यांनी विधान परिषदेत अर्थात विधिमंडळ अधिवेशनात या विषयावर कधीही चर्चा घडवून आणलेली नाही. त्यामुळे”बोन्साय”झालेल्या कोल्हापूरचे ते जसे मारेकरी आहेत तसेच माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार सतेज पाटील, विद्यमान पालकमंत्री हसन मुश्रीफ हे सुद्धा या शहराच्या हद्द वाढीचे मारेकरी आहेत. कारण पाटील आणि मुश्रीफ या दोघांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर महापालिकेची सत्ता आहे.

कोल्हापूर शहराची हद्द वाढ आता कोणीही रोखू शकत नाही. कोल्हापूर शहराच्या हद्दीत किमान पाच ते सहा गावे आणणारच असा निर्धार पालकमंत्री म्हणून हसन मुश्रीफ यांनी गेल्या वर्षी बोलून दाखवला होता. पण त्यालाही हद्दवाढ विरोधी कृती समितीकडून विरोध होऊ लागल्यानंतर मुश्रीफ हे या विषयावर काही बोलावयास तयार दिसत नाहीत.
पूर्वी महापालिकेचे प्रमुख उत्पन्न हे जकातीच्या माध्यमातून होते. आता जकात कर राहिलेला नाही. त्याऐवजी वस्तू सेवा कर आणण्यात आला आहे.

त्यामुळे शिरोली आणि गोकुळ शिरगाव या दोन्ही औद्योगिक वसाहती मधील उद्योजकांचा कोल्हापूर शहर हद्दवाडीला विरोध करावा असे कारण राहिलेले नाही. पण तरीही या दोन्ही औद्योगिक वसाहतींकडून हद्द वाढीला विरोध होणार हे गृहीत धरले जाते म्हणून या दोन्ही औद्योगिक वसाहतीवरून नवीन हद्द वाढ प्रस्ताव तयार करण्यात यावा अशी भूमिका कृती समितीने सोमवारी झालेल्या महापालिका आयुक्त समवेत च्या बैठकीत मांडली आणि आता महापालिकेच्या प्रशासक के मंजू लक्षमी या येत्यात तीन आठवड्यात हद्द वाढीचा नवीन प्रस्ताव नगर विकास मंत्रालयाला सादर करणार आहेत.

कोणत्याही शहराची हद्द वाढ झाल्याशिवाय प्रगती होत नाही, विकास होत नाही असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कोल्हापूरच्या मागणीच्या संदर्भात मत व्यक्त केले होते. आता महायुती आघाडीत असलेल्या शौमिका महाडिक यांनीच कोल्हापूर शहराच्या हद्द वाढीला अप्रत्यक्षपणे विरोध दर्शवला आहे. विरोधी कृती समितीला विश्वासात घेऊन या प्रश्नावर मार्ग काढावा असे त्या म्हणतात आणि हद्द वाढ कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही या मतावर विरोधी कृती समिती ठाम आहे.

शौमिका महाडिक यांचे सासरे महादेवराव महाडिक यांना कोल्हापूर शहराची हद्द वाढ मंजूर करवून घेण्याची एक आमदार म्हणून मोठी संधी होती. कारण तेव्हा काँग्रेस आघाडीचे सरकारही होते. पण त्यांनी ही संधी साधली नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत महाडिक यांच्या कुटुंबीयातून कोणीतरी एक सदस्य कोल्हापूर उत्तर तसेच कोल्हापूर दक्षिण या मतदारसंघातून उतरण्याची शक्यता आहे. त्यावेळी मतदारांना शहर हद्द वाढीचे काय असा प्रश्न विचारण्याची मोठी संधी मिळणार आहे.

हेही वाचा :

कोल्हापूर जिल्ह्यात डेंग्यूचा कहर; ३०० हून अधिक ग्रामस्थांना लागण

धक्कादायक… भाजप नेत्याच्या पत्नीवर हिप्नोटिज्मचा प्रयोग? लाखोंची लूट

नाश्त्यासाठी झटपट बनवा स्वादिष्ट पोहे-बटाटा कटलेट, अगदी सोपी रेसिपी