कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : नैराश्यात गेलेल्या मुलाची आणि मुलाचे साधी मागणी किंवा इच्छा आपण पूर्ण करू शकत नाही म्हणून हरलेल्या बापाची ही कथा आहे. एकाच झाडाच्या फांदीवर एकापाठोपाठ गळफास घेऊन केलेल्या आत्महत्येची(Suicide) ही करूण, हृदयाला पिळ पाडणारी कहाणी आहे. ज्या जिल्ह्याने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले त्या नांदेड जिल्ह्याच्या मी नकी गावात घडलेल्या या घटनेने प्रत्येक संवेदनशील माणसाच्या हृदयात नक्कीच कालवा कालवा झाली असेल. माध्यमांनी या शोकांतिकेची दखल घेतली असती तर गतिशील सरकार आणि वेगवान महाराष्ट्र कुठे आहे असा क्षणभर तरी प्रश्न प्रत्येकाला पडला असता.
नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यात मी नक्की नावाचे एक छोटेसे गाव आहे. या गावातील ओमकार राजेंद्र पैलवार(वय 16) हा उदगीर येथे शिक्षणासाठी राहात होता. सुट्टी घेऊन तो गावी आला होता. त्याने बापाकडे मकर संक्रातीच्या सणासाठी नवे कपडे घेऊन देण्याचा हट्ट धरला होता. त्याला शालेय साहित्यही घ्यायचे होते. पण बापाकडे पैसा नव्हता.
आत्ता पैसे नाहीत, हातात पैसे पडल्यावर तुला कपडे घेतो, तुझ्या शाळेचे साहित्य घेतो असे बापाने सांगितले. निराश होऊन ओमकार हा घरातून बाहेर पडला. बराच वेळ होऊनही पोरगं घरी आलं नाही म्हणून बाप (राजेंद्र)
सैरभैर झाला. तो पोराच्या शोधासाठी बाहेर पडला. शेतातल्या एका झाडावर ओमकार चा मृतदेह लटकताना दिसला आणि बाप आतून बाहेरून पार हादरून गेला. मनातून कोसळलेल्या बापाने शांतपणे झाडावर चढून मुलाचा मृतदेह फासातून सोडवला. तो एका बाजूला ठेवला आणि त्याच दोरीने राजेंद्रने गळफास घेऊन आपली ही जीवन यात्रा संपवली. गरीब परिस्थितीने बाप लेकाच्या जीवाचा(Suicide) असा घास घेतला होता.
वाल्मीक कराड, जन आक्रोश मोर्चा, छोटे आका, बदनाम मुन्नी, राजीनाम्याची मागणी, या साऱ्या कोलाहलात बाप लेकाच्या आत्महत्येची बातमी “किल” झाली. इलेक्ट्रॉनिक मीडियाला प्रतिक्रिया देण्यासाठी रोज तयारीत असलेल्या काही राजकारण्यांनी साधी श्रद्धांजली वाहिली नाही, दुःख व्यक्त केले नाही. देशात अव्वल स्थानावर असलेल्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत करण्याची भाषा कायम ऐकवली जाते पण त्यातून माणूस आणि त्याची आर्थिक स्थिती मजबूत होत नाही हे वास्तव आहे.
मुलाची अपेक्षा पूर्ण करायला बापाकडे हजार पाचशे रुपये नसतील तर जीडीपी, आर्थिक महासत्ता हे शब्द पैलवार कुटुंबीयांसाठी भ्रमक आणि कुचकामी ठरतात. कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र? असा सवाल विचारणाऱ्या विरोधी पक्षीय नेत्यांनी सुद्धा या घटनेवर साधे दुःख व्यक्त केलेले नाही. राजकारणासाठी राजकारण करणाऱ्या या मंडळींना त्यासाठी सवड मिळाली नसावी.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून महाराष्ट्रात खोक्याची भाषा ऐकायला मिळते आहे, लोकसभा निवडणुकीत उमेदवारांकडून पैशाचा महापूर आणला जातो, विधानसभा निवडणुकीतही पैशाचाच खेळ होतो. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या कडे इतका अफाट पैसा कुठून आला असा प्रश्न प्रत्येकाला पडावा. बीड जिल्ह्यातील वाल्मीक कराड याची मालमत्ता, संपत्ती पाहून सामान्य माणसाचे डोळे विस्फारतात. पैशाचे आकडे एकीकडे नाचत असताना दुसरीकडे राजेंद्र पैलवार या शेतकऱ्याकडे पैशाचा दुष्काळ पडलेला. मुलाचा नवे कपडे तो घेऊ शकत नाही, त्याच्या शालेय गरजा त्याला भागवता येत नाहीत. मुलाने गळफास घेण्यासाठी जो दोर वापरला तोच दोन बापाने स्वतः गळफास(Suicide) घेण्यासाठी वापरला.
सलमान खान याला विष्णू ये टोळी कडून जिभे मारण्याची धमकी आल्यावर तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्याच्या घरी जातात. नंतर त्याच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली जाते. शिंदे यांच्याशिवाय इतरही काही मंत्री आमदार सन्मान च्या घरी जाऊन त्याला धीर देतात. आता तर लक्षावधी रुपये खर्च करून त्याच्या घराच्या खिडक्या आणि गच्ची बुलेट केली जाते. आणि इकडे नांदेड जिल्ह्यातील छोट्याशा गावात गरीब बाप लेक हजार पाचशे रुपये नाहीत म्हणून आत्महत्या करतात. आणि त्याची ठळक बातमी होत नाही.
शाहरुख खान याची पत्नी गौरी खान हिने इस्लाम धर्म स्वीकारला आहे काय यासाठी घरातला छोटा पडदा व्यापला जातो. पण जगण्याची लढाई हरलेल्या बापलेकाच्या शोकांतिकेसाठी मीडियाचे कॅमेरे घटनास्थळाकडे फिरकत नाहीत. प्रत्येक दुःखाची कविता होत नाही, प्रत्येक मरणाची बातमी होत नाही हे जरी खरे असले तरी त्याला शोकांतिकेचा अपवाद असला पाहिजे.
हेही वाचा :
आनंदाची बातमी! सोन्या – चांदीच्या दरात मोठी घसरण, खरेदीपूर्वी वाचा आजचे भाव
‘या’ भाज्या वापरून सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा भोगीची भाजी, पदार्थ होईल चमचमीत
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: कोणत्या संघांनी जाहीर केले खेळाडूंचे संघ, भारताच्या टीमवर सगळ्यांच्या नजरा