कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : छत्रपती(Chhatrapati) शिवाजी महाराज यांच्या विषयी गरळ ओकणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकर यांच्या मुसक्या आवळल्याच पाहिजेत. तशा त्या आवळल्या जातीलही. जातीच्या आणि राजकारणाच्या चष्म्यातून या प्रवृत्तीकडे न पाहता मराठ्यांच्या इतिहासाचा, पराक्रमाचा, शौर्याचा घोर अपमान म्हणून या घटनेकडे पाहिले पाहिजे.

त्यासाठी आंदोलनात उतरून शिवप्रेमींनी आपली ऊर्जा खर्च करताना थोडीशी ती शिल्लक ठेवून अपूर्ण अवस्थेत असलेल्या किंवा घोषणेतच अडकलेल्या स्मारकांच्या पूर्ततेसाठी ती खर्च केली पाहिजे. कर्नाटकातील शहाजीराजे यांच्या उघड्यावरील समाधीचा जिर्णोद्धार, छत्रपती शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारक की ज्याचे फक्त भूमिपूजन झाले आहे, संगमेश्वर येथील धर्मवीर छत्रपती(Chhatrapati) संभाजी महाराजांचा खंड हर स्थितीत असलेल्या वाड्याचा जीर्णोद्धार यासाठी समस्त शिवप्रेमींनी, इतिहासाच्या अभ्यासकांनी रस्त्यावर उतरून संबंधितांना जाब विचारला पाहिजे, तथापि तसे तसुभरही घडताना दिसत नाही हे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.
छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य करण्याची एक दुष्ट परंपराच
या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून सुरू झाली आहे आणि ती थांबायला तयार नाही. जेव्हा जेव्हा वादग्रस्त विधाने झाली तेव्हा तेव्हा महाराष्ट्रात शिवप्रेमींनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली किंवा तीव्र शब्दात त्याचा धिक्कार केला. वादग्रस्त विधाने करणाऱ्यांना दहशत बसावी यासाठी आंदोलनाचा उतारा आवश्यक आहे, पण त्याचबरोबर रखडलेली स्मारके किंवा जीर्णोद्धार याच्या पूर्ततेसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणे गरजेचे आहे.
छत्रपती(Chhatrapati) शिवाजी महाराज यांचे खरे गुरु म्हणजे त्यांचे पिताश्री शहाजीराजे होत. गनिमी कावा तंत्र हे त्यांनी शिवरायांना शिकवले. शहाजीराजे हे महापराक्रमी होते. दक्षिणेत एक राजा स्वतंत्रपणे उभा राहतो आहे हे समजल्यानंतर औरंगजेबाचा बाप शहाजहान हा ताजमहालाचे बांधकाम स्थगित करून दक्षिणेत यावयास निघाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफजलखानाचा वध केल्यानंतर आणि त्याचे वृत्त विजापूरच्या दरबारी आल्यानंतर दरबारात उपस्थित असलेल्या शहाजीराजे यांच्यावर राग काढण्याचे धाडस कुणी केले नाही.
इतकी दहशत शहाजीराजे यांनी आपल्या महापराक्रमातून निर्माण केली होती. कर्नाटकातील शिमोगा शहरा पासून काही अंतरावर असलेल्या होजीगिरी या गावात वीस गुंठे जमिनीवर शहाजीराजे यांची उघड्यावर समाधी आहे. तिचा सन्मानपूर्वक जिर्णोद्धार होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींनी महाराष्ट्र शासनावर दबाव आणला पाहिजे आणि त्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे.
ज्या छावा चित्रपटावरून सध्या वातावरण तापले आहे त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मोगलांनी जेथून ताब्यात घेतले त्या संगमेश्वर येथील वास्तूची पडझड झाली आहे. 35 वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे आणि कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या उपस्थितीत संगमेश्वर येथे संभाजी राजांच्या उचित स्मारकाचे भूमिपूजन झाले होते. पण एक इंच ही स्मारक पुढे गेलेले नाही. वास्तविक हे ऐतिहासिक पर्यटन स्थळ आत्तापर्यंत झाले पाहिजे होते. इच्छा असूनही शिवप्रेमींना संगमेश्वरच्या त्या वास्तूकडे सहजासहजी जाता येत नाही. ऐतिहासिक ऊर्जा स्थळ म्हणून ते विकसित केले गेले तर इतिहास प्रेमी तेथे मोठ्या संख्येने जाऊन नतमस्तक होतील.
मुंबई येथे अरबी समुद्रात छत्रपती(Chhatrapati) शिवाजी महाराजांचे अतिशय भव्य स्मारक केले जाणार आहे. दहा वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते प्रत्यक्षात मात्र पुढे काहीही झालेले नाही. वर्तमान काळाने इतिहासातून, इतिहास पुरुषांकडून ऊर्जा घेतली तरच भविष्यकाळ उज्वल असतो. म्हणूनच महाराष्ट्रातील, महाराष्ट्राच्या बाहेर गडकोट किल्ले, सागरी किल्ले हे वर्तमानाचे ऊर्जा स्रोत आहेत.
पण आज त्यांची अवस्था काय आहे? सर्वच गडकोटांची डागडुजी निधी अभावी करता येत नसली तरी छत्रपती घराण्याचे मानदंड असलेल्या निवडक गडकोट किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे. कोल्हापूरचे संभाजी राजे छत्रपती हे त्यासाठी पोटतिडीकेने काम करत असले तरी समस्त शिवप्रेमींनी त्यांना साथ का देऊ नये?
नवी दिल्लीत जाऊन आग्रा येथील ताजमहाल पाहणारे महाराष्ट्रातील किती पर्यटक छत्रपती शिवरायांना जिथे अटकावून ठेवले होते त्या ठिकाणाला भेट देऊन नतमस्तक होतात? त्या ऐतिहासिक वास्तू कडे पर्यटकांनी मुद्दाम भेट द्यावी असे किती प्रयत्न महाराष्ट्र सरकारच्या वतीने करण्यात आले? नवी दिल्लीत महाराष्ट्र सदन बांधणाऱ्या इथल्या राज्यकर्त्यांनी पर्यटकांच्या नजरेत किंवा पर्यटन नकाशावर आग्रा परिसरात असलेली ही वास्तू का आणली नाही? याचा जाब किती अभ्यासकांनी सरकारला आत्तापर्यंत विचारला आहे? छत्रपती शिवरायांच्या गनिमी तंत्राचा महान अविष्कार असलेली ही वास्तू आज दुर्लक्षित आहे हा शिवरायांचा अपमान आहे असे का समजू नये?

नागपूरच्या प्रशांत कोरटकर या विकृत माणसाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अतिशय वाईट टीका टिपणी केली आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. या मंडळींनी दुर्लक्षित करण्यात आलेल्या स्मारक, जीर्णोद्धार विषयी सुद्धा संताप व्यक्त करावा आणि त्यासाठी रस्त्यावर उतरावे. ही स्मारके अशीच दुर्लक्षित झाली तर येणारी पिढी विद्यमान पिढीला माफ करणार नाही.
हेही वाचा :
भाजप आमदाराच्या मुलाचा आयुष्य संपण्याचा प्रयत्न, प्रकृती गंभीर
अभिनेता गोविंदाच्या घटस्फोटाबद्दल सर्वात मोठी अपडेट, पत्नी सुनिता आहुजा म्हणाली…
नाचणी ओट्सचा वापर करून सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा खमंग कॅल्शियमयुक्त ढोकळा, वजन राहील नियंत्रणात