अंगावर काटा आणणारा क्षण! यात्रेतील 150 फूट उंच रथाचा कोसळतानाचा व्हिडीओ व्हायरल

देशभरात यात्रा-जत्रांचा(Yatra) उत्सव सध्या जोरात सुरू असून, या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील हुस्कुर येथील मद्दुरम्मा देवीच्या यात्रेदरम्यान घडलेली भीषण घटना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. १५० फूट उंचीचा रथ कोसळल्याचा धक्कादायक व्हिडीओ अनेकांनी पाहिला असून, यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

बंगळुरू-होसूर महामार्गावरील हुस्कुर गावात दरवर्षी मोठ्या उत्साहात मद्दुरम्मा देवीचा जत्रोत्सव(Yatra) पार पडतो. यावेळीही हजारो भाविक रथोत्सव पाहण्यासाठी उपस्थित होते. मात्र, सोसाट्याचा वारा सुरू झाल्यामुळे 150 फूट उंच रथाचे संतुलन बिघडले आणि तो काही क्षणांतच कोसळला. या दुर्घटनेत 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून कैक भाविक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, रथ कोसळतानाचे क्षण धुरळा, किंकाळ्या आणि गोंधळात गेले. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी रथावरून उड्या मारल्या आणि मोठी जीवितहानी टळली. पण, जखमी भाविकांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हुस्कुर गावात अशी दुर्घटना ही पहिल्यांदाच घडलेली नाही. 2021 पूर्वी रथांची उंची नियंत्रित होती, मात्र मंदिर प्रशासनाने उत्तम रथासाठी रोख बक्षिसाची घोषणा केल्यापासून रथांच्या उंचीवर एकप्रकारची स्पर्धा सुरू झाली. यावर्षीही 80 फूट मर्यादा असताना 150 फूट उंच रथ तयार करण्यात आला होता.

उपजिल्हाधिकारी कार्यालयाने यंदा रथाच्या उंचीसाठी 80 फूटची मर्यादा निश्चित केली होती. मात्र ग्रामस्थांनी याला विरोध करत, “आम्ही आधीच रथ तयार केला आहे, पुढच्या वर्षी नियम पाळू” असे म्हणत नियमांची पायमल्ली केली. परिणामी, हा आनंदाचा उत्सव एका भीषण आठवणीत बदलून गेला.

हेही वाचा :

अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याला मुहूर्त कधी?

हरभजन सिंग पुरता फसला? आर्चरला काय बोलून गेला

प्रशांत कोरटकर कोल्हापुरात येताच घडलं भयंकर? शिवप्रेमींच्या भावनांचा उद्रेक