पुणे जिल्ह्यातील दौंड शहरालगत असलेल्या बोरावके नगर परिसरात एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मृत अर्भक(Infant) आणि मानवी अवशेष आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्राईम टाऊनच्या पाठीमागील कचरा डंपिंगजवळ ही घटना घडली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरू असून हा गर्भपाताचा प्रकार आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

सदर घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या 112 क्रमांकावर दिल्यानंतर दौंड पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्राथमिक पाहणी करून पंचनामा केला व तत्काळ डॉक्टरांचे वैद्यकीय पथक बोलावून घेतले. संशयास्पद बरणीतील अर्भक आणि अवशेष ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर पुढील वैद्यकीय तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बरणीतील अर्भक(Infant) सीलबंद अवस्थेत आहे असं सांगण्यात आलं आहे. तसेच हे अवशेष प्रयोगशाळेतील वैद्यकीय नमुने असावेत की गर्भपातानंतर टाकण्यात आलेले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पोलिसांनी सर्व शक्यतेचा विचार करत तपास सुरू केला आहे.
यासंदर्भात वैद्यकीय अहवालानंतरच अधिकृत माहिती समोर येईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, एवढ्या काळानंतर अशा संवेदनशील वस्तू खुलेआम कचऱ्यात सापडणं, ही गोष्ट गंभीर असून स्थानिक प्रशासन आणि वैद्यकीय संस्थांमधील जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
या घटनेनंतर बोरावके नगर आणि प्राईम टाऊन परिसरात भीतीचं आणि अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं आहे. अर्भक व मानवी अवशेष कुठून आले, याबाबत नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून कोणत्याही हॉस्पिटल किंवा प्रयोगशाळेतील बेकायदेशीर व्यवहाराशी याचा संबंध आहे का, हे तपासलं जात आहे.
या घटनेनं वैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीविषयी असलेली बेफिकिरी आणि प्रशासनाची उदासीनता पुन्हा एकदा समोर आली आहे. कायद्यानुसार अर्भक किंवा मानवी अवशेष यांची योग्यप्रकारे विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. त्यामुळे संबंधित दोषींवर कठोर कारवाई होण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
हेही वाचा :
अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याला मुहूर्त कधी?
हरभजन सिंग पुरता फसला? आर्चरला काय बोलून गेला
दररोज फक्त ₹७ गुंतवा अन् महिन्याला ५००० रुपयांची पेन्शन मिळवा