मोदी, ठाकरे, पवारांनंतर मनोज जरांगेही…

लोकसभा निवडणुकीमुळे सर्वत्र सर्वपक्षीय राजकारण्यांच्या(political) तोफा सभांमधून धडाडत आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभा एकाच दिवशी म्हणजे सोमवारी (ता. 29 एप्रिल) होणार आहेत. त्यातच आता मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील हेही सोमवारी सोलापूरमध्ये येत आहेत, अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे सोमवारी सोलापूर हा सभांचा हॉटस्पॉट होणार आहे.

मनोज जरांगे पाटील(political) यांचे सोमवारी (ता. 29 एप्रिल) सायंकाळी पाच वाजता मरिआई चौक येथे आगमन होणार आहे. मराठा समाजाच्या वतीने त्यांचे त्या ठिकाणी भव्य असे स्वागत करणार आहोत. स्वागत स्वीकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे पुढे मंगळवेढा, सांगोला, सांगली मार्गे बेळगाव येथे जाणार आहेत. त्या ठिकाणी ते जाहीर सभा घेणार आहेत, अशी माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिली.

मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच ज्यांना पाडायचे आहे, त्यांना पाडा, असा सूचक संदेश मराठा समाजाला दिलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये येत असलेले मनोज जरांगे पाटील हे सोलापूरमध्ये मराठा समाजाला कोणाला पाडण्याचा संदेश देणार आहेत, याची उत्सुकता सर्वांना असणार आहे.

दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी दुपारी सोलापूरच्या होम मैदानावर भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्यासाठी सभा घेत आहेत. मोदी यांच्या सभेसाठी सुमारे एक लाख लोक बसतील, अशी आसनव्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच, उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी मंडपही उभारण्यात आलेला आहे. मोदी आपल्या सभेतून कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

महाविकास आघाडीच्या सोलापूरच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संयुक्तपणे सभा घेणार आहेत. ठाकरे आणि पवार यांची कर्णिकनगरमध्ये सोमवारी सायंकाळी सभा होणार आहे. पवार आणि ठाकरे हे भाजपचा कोणत्या शब्दांत समाचार घेणार, याची उत्सुकता सोलापूरकरांना लागली आहे.

हेही वाचा :

सक्तीची राजकीय निवृत्ती!

महाविकास आघाडीची युवा फळी आज कोल्हापुरात

शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार? बडा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत