एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून वेगाने वाढू लागलेल्या उष्णतेच्या(heat) झळांमध्ये भारतीय हवामान खात्याकडून आलेला यंदाच्या मान्सूनविषयीचा अंदाज गारवा देणारा ठरला आहे. यंदाच्या हंगामात सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आणि प्रशासनाने तयारीच्या कामांना गती दिली पाहिजे. विशेषतः खरिपासाठीची बियाण्यांची उपलब्धता, जलसंधारण, पाणी साठवणुकीची कामे यांकडे अधिक प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. पडणाऱ्या पावसाचा थेंबन्थेंब मातीत जिरवला जाईल याबाबत समाजात जागरुकता निर्माण झाली पाहिजे. तसे झाल्यास पावसाने ओढ दिल्यास निर्माण होणारी संकटग्रस्त परिस्थिती उद्भवणार नाही.
भारतीय हवामान खात्याने या वर्षी भारतात ‘सामान्य’पेक्षा चांगला पाऊस राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याने अंदाज जारी करताना म्हटले, यंदा पावसाळय़ात एकूण पाऊस 87 सेंटिमीटर सरासरीसह 106 टक्के पर्जन्यमान राहण्याचा अंदाज आहे. अल निनोचा प्रभाव ओसरत जाणार असल्याने या वर्षी देशात पाऊस चांगला राहील. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत पाऊस चांगला पडण्याचा अंदाज आहे.(heat)
हवामान विभागाने पावसाच्या प्रमाणाच्या अशा पाच श्रेणी ठरवल्या आहेत. त्यानुसार 90 टक्यांपेक्षा कमी पाऊस म्हणजे अपुरा पाऊस समजला जातो. दुसऱया श्रेणीत 90 ते 95 टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस, तर तिसऱया श्रेणीत 96 ते 104 टक्के म्हणजे सामान्य सरासरी इतका पाऊस समजला जातो. यंदाच्या हंगामात तिसऱया श्रेणीतील पावसाचे भाकीत करण्यात आले आहे. त्यातही पावसाळा सुरू झाल्यावर अल निनोचा प्रभाव संपला असेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. हवामान विभागाचा पहिला दीर्घकालीन अंदाज आहे. पुढचा सुधारित पावसाचा अंदाज हा मे महिन्याच्या शेवटी वर्तवण्यात येणार आहे. पण सध्याचे एकूण उष्णतामान आणि पॅसिफिक महासागरावरील स्थिती पाहता यामध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे. मागील काळात जानेवारी-फेब्रुवारी-मार्च या महिन्यांमध्ये झालेल्या गारपिटीमुळे आणि अवकाळी पावसामुळे तसेच जून महिन्यात आलेल्या चक्रीवादळांमुळे मान्सूनचे आगमन, वाटचाल यामध्ये व्यत्यय येत गेला होता. यंदा तशी स्थिती दिसत नसल्याने मान्सून मनसोक्त बरसेल असे दिसते आहे.
चांगल्या पावसाचा परिणाम खरीप पिकांच्या उत्पादनावर होतो आणि त्यामुळे काही विशेष खाद्यान्नाचे भाव कमी होऊ शकतात. तांदूळ, बाजरी, कापूस, मका, सोयाबीन आदी खरीप पिके असून त्यांचे उत्पादन बहुतांश वेळा चांगल्या पावसावर अवलंबून असते. त्यांची पेरणी जून-जुलैपासून सुरू होते. अशा वेळी पाऊस चांगला राहिला तर त्यांचे उत्पादन वाढेल आणि महागाईवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येणे शक्य आहे. महागाई कमी झाली तर अर्थव्यवस्थेला फायदा मिळेल. एकूणातच पाऊस हा शेतकऱयांची जीवनरेखा आहे. एका अंदाजानुसार पावसावर दोन खर्व डॉलरची अर्थव्यवस्था अवलंबून असते आणि किमान 50 टक्के कृषीक्षेत्राला पाणी हे पावसातूनच मिळत असते. सद्यस्थितीत भारतात सुमारे 800 दशलक्ष नागरिक ग्रामीण भागात राहतात आणि ते शेतीवर अवलंबून असून त्यांचा भारताच्या जीडीपीमधील वाटा 14 टक्के आहे. पाऊस कमी पडला तर देशाच्या विकासाला आणि अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. सामान्यापेक्षा अधिक पाऊस राहिल्याने कृषी उत्पादन आणि शेतकऱयांच्या उत्पन्नात वाढ होते. त्यामुळे ग्रामीण भागात उत्पादनाला मागणी वाढते. चांगला पाऊस हा केवळ कृषी क्षेत्रासाठीच आवश्यक नाही तर उद्योग जगालादेखील सुगीचे दिवस येतात. शेतीपासून ते जेवणाच्या टेबलपर्यंत एक मोठी साखळी असते आणि त्यात कमी पाऊस हा संपूर्ण साखळी विस्कळीत करू शकते. त्यामुळे आर्थिक व्यवहार कोलमडू शकतात. 2024 मध्ये पाऊस चांगला पडण्याची शक्यता वर्तविली जात असताना सरकारने शेतकऱयांच्या चेहऱ्यावर आणखी हास्य फुलविण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी धोरणात्मक पावले उचलणे गरजेचे आहे.
तूर्त देशात चांगला पाऊस हा विकासाची रेषा मानली जात आहे. कारण पावसाचा प्रभाव हा देशातील कोटय़वधी लोकांच्या रोजीरोटी आणि दैनंदिन जीवनावर पडत असतो. चार महिन्यांचा पावसाळा हा अर्थव्यवस्थेसाठी एकप्रकारे मलम म्हणून सिद्ध होऊ शकतो. पिकाच्या उत्पन्नातून खाण्यापिण्याच्या वस्तूंचे भाव निश्चित होतात आणि चांगले पीक आले तर खाद्यपदार्थांच्या किमती कमी राहतात व त्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल.
पाऊस हा खरीप पिकांना लाभदायी ठरतोच, त्याचबरोबर रब्बी पिकांनादेखील उपयुक्त ठरतो. रब्बी हंगामात पिकाची लागवड करताना हिवाळय़ात जमिनीत ओलावा राहण्यासाठी पडून गेलेला चांगला पाऊस पूरक ठरतो. दमदार पाऊस हा देशातील पाणीसाठय़ात वाढ करतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळते. एवढेच नाही तर आरबीआय व्याजदर निश्चित करताना पावसाचे प्रमाण, खाद्योत्पादन आणि महागाई दरावर लक्ष केंद्रस्थानी ठेवते. परिणामी चांगला पाऊस हा व्याजदरात घसरण आणू शकतो आणि कर्ज स्वस्त होऊ शकते. आर्थिक विकासदर वाढण्यास पावसाचा मोलाचा वाटा असतो. त्यामुळे महागाई वाढणार नाही आणि त्याच वेळी विकासदरदेखील वाढेल. चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांना चांगले पीक मिळेल आणि त्यांची क्रयशक्ती वाढेल व त्यांची सक्रियता ही बाजाराची रौनक वाढवेल.
सध्या देशात महागाई हा कळीचा मुद्दा ठरला आहे. देशात शेतकऱयांना शेती करणे खूपच महागाचे ठरत आहे. बियाणे, खत, डिझेलच्या भावात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना शेती करणे खूपच कठीण होऊ लागले आहे. वाढती महागाई ही शेतकऱयांना शेतीतील रस कमी करत आहे. कारण शेती करणे हा तोटय़ाचा व्यवसाय वाटत आहे. शेतकऱ्यांना खर्च काढणेदेखील कठीण वाटत आहे. डिझेलच्या किमती वाढल्याने शेतकरी अगोदरच त्रस्त आहे. शेतीची कामे डिझेलवरच अवलंबून असतात. शेतीची मशागत ते कापणीपर्यंत तसेच भाजी मंडईपर्यंत शेतकरी लहान ट्रक्टरचा वापर करतात आणि महागडे डिझेल हे शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी करत आहे. त्यामुळे ही एक मोठी समस्या ठरत आहे. अशा वेळी पाऊस कमी पडला तर स्थिती आणखीच नाजूक होऊ शकते.
हेही वाचा :
रोहित शर्मा टी-20 वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेणार, हार्दिकच्या सिलेक्शनसाठी दबावतंत्राचा वापर
आमदाराने मतदाराच्या कानशिलात लगावली, मतदारानेही थप्पड मारली Video
आमदाराने मतदाराच्या कानशिलात लगावली, मतदारानेही थप्पड मारली Video