संजयकाका पाटलांना मोठा धक्का, विशाल पाटलांनी भाजपचे 4 शिलेदार गळाला लावले

सांगली लोकसभेचे उमेदवार संजयकाका पाटील यांना मोठा धक्का(latest political news) बसलाय. सांगलीत भाजपच्या चार नगरसेवकांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. इतकेच नाही तर चारही नगरसेवक काँग्रेसचे बंडखोर असलेल्या विशाल पाटलांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देताच चारही नगरसेवकांनी विशाल पाटलांचा जोरदार प्रचार सुरु केलाय.

मिरजेतील भाजपच्या नगरसेवकांकडून विशाल पाटलांच्या(latest political news) प्रचारामध्ये सहभाग घेतल्याच्या कारणातून भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षांकडून संबंधित चार नगरसेवकांच्यावर कारवाईचा प्रस्ताव प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता. मात्र, कारवाईच्या आधीच भाजपचे बंडखोर नगरसेवक संदीप आवटे, निरंजन आवटी, आनंदा देव माने आणि शिवाजी दुर्वे यांनी आपल्या भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

त्याबरोबर भाजपमधील आणखी तीन नगरसेवकांचा छुपा पाठिंबा असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे भाजपचे विद्यमान खासदार आणि उमेदवार संजयकाका पाटील यांच्या बद्दल मिरजेतल्या भाजप नगरसेवकांमधील असणारी नाराजी उघडपणे आता समोर आली आहे.

महाविकास आघाडीमध्ये सांगलीची जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुटल्यानंतर काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केलाय. त्यानंतर त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी लिफापा हे चिन्ह बहाल करण्यात आलं आहे. विशाल पाटील गेल्या पाच वर्षांपासून सांगली लोकसभेसाठी तयारी करत होते. मात्र, महाविकास आघाडीतील अंतर्गत राजकारणामुळे त्यांचं तिकीट कापल्या गेलं असल्याची चर्चा आहे.

सांगलीत आमच्या तोंडचा घास पळवलाय. मित्रपक्षाला सांगा आम्ही महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसची 100 टक्के मतं देऊ. मात्र, आता विधानसभेला आवाज काढायचा नाही. आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान होईल. पण विधानसभेला याचा वचपा काढण्यात येईल, असा इशाराच काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी दिलाय. विश्वजीत कदम विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी आग्रही होती. मात्र, मित्रपक्षांकडूनच त्यांचा पत्ता कापण्यात आल्याने सांगलीतील काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर आहे.

भाजपने संजयकाका पाटील यांना सांगलीतून उमेदवारी दिल्यानंतर ठाकरे गटाने अचानकपणे ट्रीपल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. तर आता काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंड करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे सांगली लोकसभेत यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

चंद्रहार पाटलांच्या अडचणींमध्ये वाढ; मिरज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

दारूचा प्रत्येक थेंब करतो नुकसान, लिव्हर किती खराब झालंय हे घरीच तपासा

दिल्ली उच्च न्यायालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात याचिका; आज होणार सुनावणी