राजकीय नेत्यांचा “बोरीचा माळ”

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : दक्षिण महाराष्ट्रातील काही गावांमध्ये दरवर्षी विशिष्ट दिवशी(political leadership training) नदीच्या दोन्ही काठावर गावचे पुरुष ,महिला एकत्र समोरासमोर येतात. आणि नदीच्या दोन्ही काठावरून शिव्यांचा भडीमार सुरू होतो. त्याला”बोरीचा माळ”असे म्हणतात. गावातल्या तरुणांचे दोन गट परस्परांना भिडण्यापूर्वी जी टपोरी भाषा बोलतात, तीच भाषा सध्या आजी माजी मंत्री, आमदार खासदार बोलू लागले आहेत. हे तसे बोरीचा माळ याचे संक्षिप्त रूप आहे. राजकारणाच्या मैदानावर सुरू असलेला हा प्रकार मतदारांचे मनोरंजन करणारा आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सध्या महाविकास आघाडी(political leadership training) विरुद्ध महायुती यांच्यात टपोरी शाब्दिक युद्ध सुरू आहे. माजी राज्यमंत्री सतेज पाटील विरुद्ध खासदार धनंजय महाडिक यांच्यात सध्या सुरू असलेल्या विसंवादाने राजकीय नेते आणि टपोरी तरुण यांच्यातील सीमारेषाच अस्पष्ट होऊ लागलेल्या दिसतात. महाविकास आघाडीचे अर्थात काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती आहेत. त्यांच्या प्रचाराची सर्व सूत्रे माजी राज्यमंत्री आणि विद्यमान आमदार सतेज पाटील यांच्याकडे आहेत. आणि म्हणूनच महायुती आघाडीचे शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांचे स्टार प्रचारक खासदार धनंजय महाडिक आहेत. या दोघांमधील राजकीय शत्रुत्व संपूर्ण जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला माहित आहे.

दोन दिवसांपूर्वी एका प्रचारसभेत केलेल्या भाषणात सतेज पाटील यांनी, तुमच्या आडवे कोणी आले तर मला सांगा, मी रात्री बारा वाजता हे सुद्धा हातात काठी घेऊन येईन अशी धमकी सदृश्य भाषा केली आहे. तर आपण सध्या गृहराज्यमंत्री नाही आहोत, हे सतेज पाटील विसरलेले दिसतात. आम्ही कुणाच्या आडवे जात नाही. हे त्यांनी लक्षात घ्यावे असा सबुरीचा सल्ला धनंजय महाडिक यांनी त्यांना दिला आहे. जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री हसन मुश्रीफ हे तर महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांना, कशाला उभारता? पराभव करून घ्यायचा आहे काय? वेळ गेलेली नाही, माघारी घ्या! असे तुणतूणे
वाजवले होते. दुसऱ्याच्या अधिकारात हस्तक्षेप करण्याचा त्यांना अधिकार कोणी दिला?

शेजारच्या कोकणात अर्थात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामध्ये महायुतीचे उमेदवार, भाजपचे नेते, विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या स्वभावाला शोभेल अशी भाषा प्रचाराच्या माध्यमातून वापरायला सुरुवात केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या मतदारसंघात येऊन देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल अपशब्द वापरून दाखवावेत. त्यांना कोकणातून बाहेर पडण्याचा रस्ता कोणता हे सुद्धा समजणार नाही. अशी सरळ सरळ धमकीच दिली आहे. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी नारायण राणे हे काँग्रेसमध्ये होते आणि त्यांनी एका प्रचार सभेत, ज्याला बायको सांभाळता येत नाही, तो देश काय सांभाळणार? अशा शब्दात नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्याची आठवण सध्या महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून तसेच नेत्यांकडून करून दिली जात आहे.

उद्धव ठाकरे हे सुद्धा आपल्या भाषणात तडीपार हा गुन्ह्याशी संबंधित शब्द सर्रास वापरू लागले आहेत. उद्धव ठाकरे विरुद्ध चंद्रशेखर बावनकुळे, ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यात सध्या जुंपलीआहे. ठाकरे यांना उद्देशून देवेंद्र फडणवीस म्हणतात त्यांचं डोकं फिरल आहे! बावनकुळे म्हणतात हा नालायक राजकारणी आहे!

संजय राऊत यांना दिवसातून एकदा फक्त तासभर मौन पाळा असा सल्ला दिला आणि तो त्यांनी पाळला तर सामान्य माणूस आश्चर्याने थक्क होईल. ते विरोधकांशी ज्या भाषेत बोलतात त्याच भाषेत आघाडीतील घटक पक्षाशीही बोलतात. सांगलीत काँग्रेसवाले आमच्या आडवे आले तर कोल्हापुरात आम्ही तुमच्या उमेदवाराच्या आडवे येऊ अशी भाषा वापरताना त्यांनी आघाडी धर्माचे भान ठेवलेले नाही.

आयकर विभागाने केलेल्या कारवाईत एकनाथ शिंदे यांच्याकडे नोटांची बंडले असलेले गोडाऊनच सापडले. भाजपच्या नेत्यांनी त्यांना आता तुम्ही जेलमध्ये जाण्यासाठी तयार राहा अशा धमक्या द्यायला सुरुवात केल्यानंतर एकनाथ शिंदे हे चक्क रडत होते. अशी एक नवीनच माहिती आदित्य ठाकरे यांनी सर्वसामान्य जनतेला दिलेली आहे. प्रचाराचे रान जसजसे तापत जाईल तस तसे आरोप प्रत्यारोपांच्या निमित्ताने सर्वसामान्य जनतेला भलतीच भाषा ऐकावी लागणार आहे.

गल्लीत पाय ठेवून तर बघ! बघतोस काय रागानं!
गाठ माझ्याशी आहे, याद राख! सरळ पायाने येशील पण जाताना लंगडत जाशील!
तुझ्यासारखा चिंधी चोर मी नाही! कोंबडी चोर! चांगल्या भाषेत सांगतोय, नंतर सांगितलं नाही म्हणशील!

ही टपोरी भाषा गावात गल्लोगल्लीत ऐकायला मिळते. भांडणात हे शब्द कानावरून जातात. पण आता हे टपोरी शब्द राजकीय नेत्यांनी प्रचाराच्या भाषणात वापरायला सुरुवात केलेली आहे. म्हणूनच हा एकूण प्रकार”बोरीचा माळ”याचे संक्षिप्त रूप आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

हेही वाचा :

राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध! शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा

मी तुमच्या शेतातला म्हसोबा; मला मत द्या… राजू शेट्टींची मतदारांना भावनिक साद!

सांगलीचा आखाडा तापला! सहकारी संस्थांवर जगणाऱ्यांनी आमची मापं काढू नयेत, संजयकाकांचा विशाल पाटलांवर प्रहार