कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : सत्तेच्या वर्तुळातून(Political) अनपेक्षितपणे बाहेर फेकले गेल्यानंतर नेमकी काय अवस्था होते हे अचूकपणे समजायला छगन भुजबळ यांच्यासारखे उत्तम उदाहरण दुसरे शोधूनही सापडणार नाही. “माझ्यासारख्याला, मंत्री मंडळाच्या बाहेर ठेवताच कसे येऊ शकते?”हे प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर दाखवत सध्या ते नाशिक मुंबई अशा चकरा मारत आहेत. सत्तेच्या वियोगातून थोडेसे बाहेर पडण्यासाठी म्हणून ते आपल्या कुटुंबीयांसह आठ दहा दिवसांसाठी परदेशात गेले होते. आता तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधकांनी महायुती सरकारची कोंडी केली असल्याने छगन भुजबळ विषय तसा बाजूला पडला आहे.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा विषय सर्वच पक्षीय नेत्यांनी अजेंड्यावर घेतला आहे. भारतीय जनता पक्षाचे(Political) आमदार सुरेश धस, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके आणि माणिकराव कोकाटे या महायुतीत असलेल्या मंडळींनीही विरोधी पक्षीय नेत्यांच्या मागणीला समर्थन दिल्याने अजितदादा पवार यांच्यासमोर धर्म संकट उभा राहिले आहे.
“घरचं झालं थोडं आणि त्यात व्याह्यांने धाडलं घोडं”अशी छगन भुजबळ यांनी अजितदादांची अवस्था केली आहे. मी साधासुधा नेता नाही, महाराष्ट्रातीलच नव्हे, देशभरातील ओबीसी समाज माझ्या मागे आहे. तेव्हा मला सत्तेच्या वर्तुळात घेता की मग मी रिंगणातून, तुमच्या अंगणातून बाहेर जाऊ? कसा सवाल घेऊन ते फिरू लागले आहेत.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भुजबळ हे फारसे व्यक्त झालेले नाहीत. केज तालुक्याच्या मसाजोग गावाकडे ते सांत्वनासाठी म्हणून फिरकलेले नाहीत. आता तर मनोज जरांगे पाटील यांनी सरपंच हत्या प्रकरणात मराठा समाजाचे नेते म्हणून लक्ष घातले आहे. त्यांनी घरात घुसून मारण्याची धमकी दिली आहे. आणि लक्ष्मण हाके यांनी त्यांना इशारा देऊन मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष सरपंच हत्या प्रकरणात अप्रत्यक्षपणे आणला आहे. सरपंच हत्या हा विषय महाराष्ट्रात सध्या व्यापून राहिला आहे आणि आपला विषय बाजूला पडला आहे असा विचार करून छगन भुजबळ हे अधिकच अस्वस्थ झालेले दिसत आहेत.
अजित दादा पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला तर आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. साथ सोडून मग स्वतंत्र पक्ष काढायचा की भारतीय जनता पक्षामध्ये थेट प्रवेश करायचा असे काही प्रश्न त्यांच्यासमोर पडले आहेत. कोणताही निर्णय घेतला तरी मूळ प्रश्न सुटत नाही. अजितदादा यांनी त्यांना पक्षातून काढले तर त्यांची आमदारकी सुरक्षित राहते पण त्यांना थेट भाजपमध्ये घ्यायचे म्हटले तर देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर युतीधर्म अडवा येतो.
नारायण राणे यांनी काँग्रेस(Political) मधून बाहेर पडल्यावर स्वाभिमानी पक्ष काढला होता. उद्धव ठाकरे यांची भाजपशी असलेली सोयरीक तुटल्यानंतर राणे यांनी स्वाभिमानी पक्ष भाजपमध्ये विलीन केला. त्यानंतर राणे कुटुंबीयांचे राजकीय पुनर्वसन भाजपाने केले. छगन भुजबळ यांनाही असाच द्राविडी प्राणायाम करावा लागेल. पण त्यासाठी त्यांना निश्चित काळापर्यंत थांबावे लागणार आहे.
मी ओबीसी समाजाचा बाहुबली नेता आहे. माझ्याशिवाय या समाजाचे पान हलत नाही असे वातावरण छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रात तयार केले आहे पण संपूर्ण समाज त्यांच्या मागे एकवटला आहे असे म्हणता येणार नाही. भारतीय जनता पक्षामध्ये कितीतरी आमदार हे ओबीसी समाजातून आलेले आहेत.
काहीजण मंत्री आहेत. निवडणुकीतील(Political) जातनिहाय्यम मतदानांचं वर्गीकरण करणाऱ्या एका राष्ट्रीय पातळीवरील संस्थेच्या अहवालानुसार इसवी सन 2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ओबीसींची 34% मते मिळालेली होती. 2019 च्या निवडणुकीत हेच प्रमाण 34 टक्क्यावरून 44 टक्क्यांवर गेले होते. त्यावेळी छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. तरीही भाजपने ओबीसींचे मोठ्या प्रमाणावर हिंदुत्विकरण केले होते.
आजही अशीच स्थिती आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांना भारतीय जनता पक्षात घेतले तर त्यांचा फार मोठा पक्षाला फायदा होईल असे नाही. याशिवाय त्यांना पक्षात घेतले तर स्व पक्षातील ओबीसी नेते नाराज होण्याचा धोका आहेच आणि छगन भुजबळ यांचे वय सध्या ऐंशीच्या आसपास आहे. त्यामुळे त्यांना लंबी रेस का घोडा असे म्हणता येणार नाही.
छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी जाणवण्या इतकी जवळीक वाढवलेली आहे. छगन भुजबळ यांना भारतीय जनता पक्षाचा प्रवेश मिळाला तर त्यांना ओबीसींचा राष्ट्रीय पातळीवरील चेहरा म्हणून भारतीय जनता पक्षाकडून
लॉन्च केले जाईल, त्यांना केंद्रात चांगले स्थान दिले जाईल असे भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांना वाटते आहे. पण ते इतके सोपे नाही. कारण देवेंद्र फडणवीस यांना महायुती धर्म अडचणीत आणावयाचा नाही.
हेही वाचा :
भाजपमध्ये प्रवेशासाठी रांग; ठाकरे गटाचे माजी नगरसेवक कारणीभूत?
अल्पवयीन मुलीला अश्लील इशारा करत खुणावलं, नागरिकांनी रिक्षावाल्याला बेदम चोप देत अर्धनग्न धिंड काढली
“मुस्लिम घरात जन्म, पण ब्राह्मण संस्कार; हिंदू धर्म स्वीकारण्याची इच्छा अपूर्ण राहिलेल्या अभिनेत्याची कहाणी