‘मी ठाकरेंचा आनंद दिघे’ म्हणणारे शिंदे गटातून निवडणूक लढणार? नार्वेकरांचे तोंडावर बोट

शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंड करीत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या जवळच्या बड्या(finger) मंडळींना आपल्याकडे खेचले. बंडाच्या पहिल्या दिवसापासूनच ठाकरेंचा खास मोहोरा अर्थात ठाकरेंचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकरांनाही गळाला लावण्याचा शिंदेंचा डाव आहे. पण, ‘मी ठाकरेंचा आनंद दिघे’ असल्याचे जाहीरपणे सांगणाऱ्या नार्वेकर हे शिंदेंच्या जाळ्यात अडकले नाहीत. मात्र, हेच नार्वेकर ठाकरेंच्या गोटात भक्कमपणे राहून शिंदेंनाही भेटत राहिले. गणपती उत्सवात गणपतीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री शिंदे हे नार्वेकरांच्या घरी गेले होते. त्यामुळे नार्वेकरही फुटणार, या तेव्हापासून चर्चा आहेत.

याआधी नार्वेकर हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री होणार असल्याचेही बोलले(finger) गेले. परंतु, तसे घडले नाही. ‘हे कसे काय घडेल,’ असा भाव असलेले नार्वेकर सर्वपक्षीय फिरत राहिले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता हेच नार्वेकर शिंदेंच्या शिवसेनेतून दक्षिण मुंबईतून दिल्लीला जाऊ शकतात, अशा चर्चा मीडियातून पुढे आल्या. मात्र, ही चर्चा खोडून काढण्यासाठी नार्वेकर पुढे आले नाहीत. त्यामुळे ते खरोखरीच शिंदेंकडे जाणार का, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

नार्वेकर हे ठाकरेंची साथ सोडणार नाहीत आणि ते तूर्त तरी कोठून निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट आहे. तरीही, आपण चर्चेत आल्याचे समाधान नार्वेकरांना असावे आणि नार्वेकरांना फोडण्याच्या शिळ्या कढीला ऊत देऊन शिंदेंची शिवसेना आपली पाठ थोपटून घेणार हे, नक्की. यावर साऱ्या घडामोडींवर नार्वेकरांनी घडाघडा बोलून आपली भूमिका मांडली पाहिजे. नाहीतर, नुसताच चर्चेचा फुगा फुटणार नाही याचीही काळजी नार्वेकरांना घ्यावीच लागणार आहे .

महायुतीत दक्षिण मुंबई मतदारसंघ शिंदे गटाकडे की भाजपकडे असणार हे अजून स्पष्ट झाले नाही. या मतदारसंघातून भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा हे इच्छुक आहेत. तर, शिंदे गटातून मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव हे इच्छुक आहेत. मात्र, येथील उमेदवार निश्चित होत नसल्याने या जागेवर मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची चर्चा मीडियातून सुरू झाल्याने इच्छुकांची देखील धाकधुक वाढली असेल.

विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा फेटाळून लावली आहे. आज संध्याकाळच्या दौऱ्यात मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंच्या सोबत असणार असून महायुतीकडूनच मिलिंद नार्वेकर फूटणार असल्याच्या खोट्या बातम्या पेरल्या जात आहे. माझ्या बाबतीत तेच झाले होते ते आता मिलिंद नार्वेकर यांच्या बाबतीत होत आहे, असे अंबादास दानवे म्हणाले.

हेही वाचा :

पुन्हा छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार नाही, चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय

प्रणिती शिंदेंनी केली भाजपच्या कामाची पोलखोल; ‘मुद्द्याचं बोला ओ’…रॅप सॉंग व्हायरल

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण गरम! राजू शेट्टी यांची कारखानदारांवर जोरदार टीका