अहिल्यानगर मध्ये कुस्ती परंपरा झाली “धोबीपछाड”

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथे झालेल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत
जो काही प्रकार घडला त्याचे समर्थन कुठलाही कुस्ती(wrestling)शौकीन करणार तर नाहीच, केलाच तर निषेधच करेल. रविवारी महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेलाच “धोबी पछाड” करण्यात आले असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. कुस्ती स्पर्धेतील मुख्य पंचाने दिलेल्या निर्णयावर पराभूत पैलवानांकडून फार फार तर नाराजी व्यक्त केली जाते, मारहाण करण्यापर्यंत त्याची मजल जात नाही. महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्याकडून रविवारी मैदानात जो प्रकार घडला तो अभूतपूर्व आणि लांछनास्पद म्हणावा लागेल.

अंतिम फेरीत येण्यापूर्वी पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात लढत झाली, पंचांनी पृथ्वीराज ला विजयी घोषित केले. शिवराज ला हा पंचांचा निर्णय मान्य नव्हता. नंतर पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्यात महाराष्ट्र केसरी किताबतीसाठी लढत झाली. या लढतीमध्ये मोहोळ विजयी झाला. त्यावर महेंद्र गायकवाड याने आक्षेप घेतला. मैदानात गैरवर्तन केले. तर शिवराज ने पंचाची गळपट्टी धरली आणि त्याच्या कमरेत लाथ घातली. मैदानातील ही” दंगल” पाहून उपस्थित असलेल्या कुस्ती शौकिनांना जबर धक्का बसला.

कुस्तीच्या इतिहासात असा प्रकार पहिल्यांदा घडला असल्याने, महाराष्ट्रातील तसेच कुस्ती पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातील कुस्ती(wrestling) शौकीनांकडून तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. गेल्या चार दिवसांपासून अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी किताबतीसाठी ती स्पर्धा सुरू असून रविवारी शेवटच्या दिवशी दोन पैलवानांच्या कडून अतिशय घटनास्पद प्रकार घडला.

अंतिम फेरीसाठी मुख्य पंचाशिवाय, आणखी एक निर्णय देणारा पंच असतो. मोहोळ विरुद्ध राक्षे, मोहोळ विरुद्ध गायकवाड या दोन कुस्त्यांमध्ये पंचांनी दिलेला निर्णय संबंधितांना तसेच त्यांच्या समर्थकांना मान्य नव्हता. असे प्रकार यापूर्वीही घडलेले आहेत, पण ते एका मर्यादेच्या पलीकडे गेलेले नव्हते. नाराजी व्यक्त करून पंचांचा निर्णय पराभुत पैलवानांच्या कडून मान्य केला जायचा. आता मात्र प्रत्येक पराभूत पैलवानाला पंचाकडून आपल्यावर अन्याय झालेला आहे असे वाटू लागले आहे. हे प्रामुख्याने मॅटवरील कुस्तीच्या संदर्भात म्हणजे जेथे गुण दिले जातात तिथे हे प्रकार वाढलेले आहेत. मातीवरील कुस्तीत चितपट हा विषय सहसा वादग्रस्त ठरत नाही. कारण त्याला हजारो कुस्ती शौकीन साक्षीदार असतात.

रविवारी मैदानात केलेल्या गैर वर्तनाबद्दल महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे या दोन पैलवानांना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने तीन वर्षांसाठी निलंबित केले आहे. वास्तविक रविवारचा तो प्रकार प्रत्यक्ष पाहिल्यानंतर या दोन्ही पैलवानांवर कायमस्वरूपी बंदी घातली पाहिजे असे कोणाचेही मत होईल. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने अशा प्रकारचे कठोर निर्णय घेतले तर अहिल्यानगर मध्ये घडलेला प्रकार अन्यत्र घडणार नाही.

फार वर्षांपूर्वी मल्ल सम्राट युवराज पाटील विरुद्ध नवी दिल्लीच्या गुरु हनुमान सिंग आखाड्याचा सतपाल सिंग यांच्यात लढत झाली होती. तेव्हा पंचाचा एक निर्णय वादग्रस्त असल्याचे मत व्यक्त करून सतपाल सिंग या पैलवानाने कुस्तीचा आखाडा सोडला होता. नंतर पत्रकारांशी बोलताना त्याने अतिशय संयत शब्दात पंचा विरुद्ध नाराजी व्यक्त केली होती. रविवारी अहिल्यानगर येथे घडलेला प्रकार कोल्हापूरच्या शाहू खासबाग मैदानात घडला असता तर मैदानातील उपस्थित कुस्ती(wrestling) शौकिनांनी आखाड्यात घुसून चोप दिला असता. पृथ्वीराज मोहोळ हा 67 वा महाराष्ट्र केसरी बनला आहे, त्याच्याबद्दल त्याचे अभिनंदन केलेच पाहिजे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने सुद्धा आता कठोर उपाययोजना केल्या पाहिजेत. किताबाच्या किंवा अन्य कुस्त्यांसाठी कडक नियमावली केली पाहिजे. तरच असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत. भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केली होती.

या निर्णयाविरुद्ध परिषदेने न्यायालयात धाव घेतली होती आणि न्यायालयाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर महाराष्ट्रात दोन कुस्तीगीर परिषदांच्या वतीने वेगवेगळ्या कुस्ती स्पर्धा घेतल्या गेल्या होत्या. अधिकृत संघटना कोणाची याबद्दलच संशय निर्माण झाला होता. 67 महाराष्ट्र केसरी पदाची स्पर्धा घेतलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडे आता ती अधिकृत संघटना आहे हे मान्य केले गेले आहे.

रविवारी कुस्ती मैदानात जो काही प्रकार घडला तो पंचांनी दिलेल्या निर्णयातून. आता या निर्णयविरुद्ध संबंधित न्यायालयात धाव घेणार आहेत. कुस्तीगीर परिषदेने सुद्धा पंचांनी दिलेल्या निर्णयाची चौकशी केली पाहिजे. तरच निकाली
कुस्तीची परंपरा टिकणार आहे.

हेही वाचा :

‘महिलांना ब्रा साईजनुसार मिळणार…’; पबच्या ‘या’ ऑफरने उडाली खळबळ

काय आहे आजचे सोन्या-चांदीचे भाव! वाचून तुम्हीही व्हाल आनंदीत

जो दुसऱ्यांसाठी मेला , तो कायमचा जगला….!