पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात काँग्रेसवर(congress) टीका करताना काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नसलेल्या गोष्टी मोडून तोडून सांगत आहेत. त्यामुळे काँग्रेसचा जाहीरनामा तळागाळापर्यंत पोहोचवण्यास ते मदतच करीत असून, एका अर्थाने पंतप्रधान मोदी हेच काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे स्टार प्रचारक आहेत, अशी बोचरी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांची घृणा असल्यानेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात तळ ठोकून आहेत, पण चार काय चाळीस दिवस जरी ते कोल्हापुरात राहिले तरी कोल्हापूरकरांना काही फरक पडणार नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती विक्रमी मतांनी विजयी होतील, असा विश्वास वड्डेटीवार यांनी व्यक्त केला.(congress)
दरम्यान, विदर्भातील सर्व दहा, तर मराठवाडय़ातील आठ जागा महाविकास आघाडी जिंकेल, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातही आघाडी मिळून राज्यात किमान 38 जागा जिंकू, असा विश्वास व्यक्त करीत जुमलेबाज, हुकूमशाही सरकार घालवण्याचा जनतेचा मूड असून, देशात सत्तांतर होईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांची प्रचाराची पातळी घसरली आहे. दहा वर्षांत काय प्रगती केली हे न सांगता, ते काँग्रेसच्या विरोधात बोलत सुटले आहेत. काँग्रेस नेत्यांना हिणवण्याशिवाय त्यांना दुसरे काही सुचत नाही. काँग्रेसमुक्त भारत, असे मुंगेरीलालसारखे स्वप्न ते पाहत आहेत. भाजप काळात दहशतवादी हल्ले थांबले, असा प्रचार करीत असले तरी मागील दहा वर्षांत किमान तीसहून अधिक असे हल्ले झाल्याचे निदर्शनास आणून देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जुमलेबाजी आता जनतेच्या लक्षात आल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दलची भीती पंतप्रधान मोदी यांच्या मनात घर करून बसली आहे. बेरोजगारी, महिला सुरक्षा, शेतकऱयांचे प्रश्न, महागाई यावर पंतप्रधान मोदी यांनी बोलण्याची गरज आहे. ‘ना खाऊंगा, ना खाणे दुंगा’ असे बोलणाऱया पंतप्रधान मोदी यांच्या आजूबाजूला भ्रष्टाचाऱयांची मांदियाळी झाली आहे, असा टोला विजय वड्डेटीवार यांनी लगावला.
गेल्या दहा वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे करीत फक्त व्यापाऱयांचे हित जोपासून भाजपने देशाला कर्जाच्या खाईत लोटले आहे. देशातील नागरिकांना खोटी स्वप्ने दाखवून भूलथापांच्या राजकारणातून भाजपने सत्ता काबीज केली. शेतकरी देशोधडीला लागला असून, राज्यातील उद्योगधंदे, प्रकल्प बाहेर जात आहेत. बेरोजगारीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. युवा पिढी आणि नागरिकांना दिशाहीन करणे हेच भाजपचे काम आहे, अशी टीका करीत मोदींची वॉरंटी आहे; पण काँग्रेसने न्यायाची गॅरंटी दिली आहे, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. कोल्हापूर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ राशिवडे येथील प्रचार सभेत वडेट्टीवार बोलत होते. यावेळी ‘भगवती’चे ज्येष्ठ संचालक कृष्णात पाटील, आमदार पी. एन. पाटील, ए. वाय. पाटील, ‘भोगावती’चे संचालक अविनाश पाटील, ‘गोकुळ’चे माजी संचालक पी. डी. धुंदरे उपस्थित होते.
हेही वाचा :
इचलकरंजीत आज तिनही उमेदवारांकडून पदयात्रा
‘बावड्याचा पोरगा कोणासमोर झुकणार नाही’; सतेज पाटलांचा कोणाला उद्देशून इशारा?
लोकसभा निवडणुकीमुळे कोल्हापूर विमानतळ गजबजले; विमानांसह हेलिकॉप्टरची 195 ‘राजकीय उड्डाणे’