केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी(Farmers) असलेली महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम २,००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. मात्र, आता १९ व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना एक महत्त्वाचे काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे..
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, डिसेंबर २०२४ पासून शेतकऱ्यांना फार्मर रजिस्ट्री करणे आवश्यक आहे. म्हणजेच, शेतकऱ्यांना(Farmers) त्यांच्या जमिनीची संपूर्ण माहिती सरकारकडे नोंदवावी लागेल.
या नोंदणीचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांकडील जमिनीची अचूक माहिती मिळवणे आणि त्यानुसार योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ही नोंदणी करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२५ आहे. ज्या शेतकऱ्यांनी विहित मुदतीत नोंदणी केली नाही, त्यांना योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत ३.४६ लाख कोटी रुपये ११ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. १८ व्या हप्त्याचे वितरण ५ ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील एका कार्यक्रमात करण्यात आले. या हप्त्याद्वारे ९.५८ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला. आता शेतकरी १९ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत, जो नोंदणी केल्यानंतरच मिळेल.
फार्मर रजिस्ट्रीमुळे सरकारकडे शेतकऱ्यांच्या जमिनीची अचूक माहिती उपलब्ध होईल. यामुळे योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे शक्य होईल आणि गैरवापर टाळता येईल. तसेच, जमिनीच्या धारणा क्षेत्रानुसार योजना राबवणे शक्य होईल, ज्यामुळे योजना अधिक पारदर्शक होतील.
केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये दिले जातात. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केंद्र आणि राज्य सरकार मिळून एकूण १२,००० रुपये प्रतिवर्ष मिळतील.
-३१ जानेवारी २०२५ पूर्वी फार्मर रजिस्ट्री प्रक्रिया पूर्ण करा.
-बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवा.
-शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर फार्मर रजिस्ट्री करून घ्यावी आणि आपल्या आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा करावा.
हेही वाचा :
नेटफ्लिक्सचा चाहत्यांना झटका, प्लॅनच्या किंमती पुन्हा वाढवल्या
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून पदभरती जाहीर, सरकारी नोकरीसाठी ‘असा’ करा अर्ज
आधुनिक शेतीचा नवा आदर्श! सांगलीच्या पठ्ठ्यानं केली कमाल, 25 गुंठ्यात घेतलं 4 लाखांचं उत्पन्न