गुजरात टायटन्सने रोखली राजस्थानची विजयी वाटचाल

गुजरात टायटन्स(gujarat titans) संघाने बुधवारी राजस्थान रॉयल्सची आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील विजयी वाटचाल रोखली.


जयपूर : गुजरात टायटन्स (gujarat titans)संघाने बुधवारी राजस्थान रॉयल्सची आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील विजयी वाटचाल रोखली. कर्णधार शुभमन गिलच्या ७२ धावांच्या जोरावर गुजरातने राजस्थानवर तीन विकेट राखून थरारक विजय मिळवला.
राहुल तेवतियाच्या २२ धावा व राशीद खानच्या नाबाद २४ धावा या विजयात महत्त्वाच्या ठरल्या. चार विजयांनंतर राजस्थानचा पहिला पराभव झाला. गुजरातने तिसरा विजय संपादन केला. राजस्थानकडून गुजरातसमोर १९७ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते.

साई सुदर्शन व कर्णधार शुभमन गिल या जोडीने ६४ धावांची भागीदारी करताना आश्‍वासक सुरुवात केली; पण या वेळी वेगवान गोलंदाज कुलदीप सेन राजस्थानच्या मदतीला धावून आला. त्याने सुदर्शन (३५ धावा),

मॅथ्यू वेड (४ धावा) व अभिनव मनोहर (१ धाव) यांना झटपट पॅव्हेलियनमध्ये पाठवत गुजरातला मोठे धक्के दिले. गिलने एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला. युझवेंद्र चहलने विजय शंकरला १६ धावांवर, त्यानंतर गिलला ७२ धावांवर बाद करीत राजस्थानच्या विजयाची आस कायम ठेवली. गिलने आपल्या खेळीत सहा चौकार व दोन षटकार मारले. त्यानंतर राहुल तेवतिया व राशीद खानच्या छोट्या पण महत्त्वपूर्ण खेळींमुळे गुजरातने विजय साकारला.

त्याआधी संजू सॅमसन व रियान परागच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर राजस्थानने तीन बाद १९६ धावांची फटकेबाजी केली. सॅमसन याने ३८ चेंडूंत सात चौकार व दोन षटकारांसह नाबाद ६८ धावांची खेळी साकारली.

परागने ४८ चेंडूंत तीन चौकार व पाच षटकारांसह ७६ धावांची खेळी केली. दोघांनी १३० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारीही रचली. राजस्थानने तीन बाद १९६ धावा फटकावल्या.

संक्षिप्त धावफलक : राजस्थान रॉयल्स २० षटकांत ३ बाद १९६ धावा (संजू सॅमसन नाबाद ६८, रियान पराग ७६) पराभूत वि. गुजरात टायटन्स २० षटकांत ७ बाद १९९ धावा (साई सुदर्शन ३५, शुभमन गिल ७२, राहुल तेवतिया २२, राशीद खान नाबाद २४, कुलदीप सेन ३/४१).

हेही वाचा :

अजितदादा म्हणाले तोंड उघडायला लावू नका

संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थान सलग पाचव्या विजयासाठी सज्ज

रानडुकराच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी