मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

मध्य प्रदेशातील गुणा (score)येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.
भोपाळ ः ‘‘मतांच्या हव्यासापोटी गांधी या आडनावावर नकली गांधी मते मागत फिरत आहेत,’’ अशा शब्दांत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी-वद्रा यांच्यावर शनिवारी टीका केली. मध्य प्रदेशातील गुणा(score) येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.
‘देशातील नागरिकांनी कष्टाने कमावलेली संपत्ती काँग्रेस पक्ष घुसखोरांना आणि भरपूर मुले असणाऱ्यांना देण्याची योजना आखत आहे, महिलांच्या मंगळसूत्रावरही त्यांना घाला घालायचा आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील एका सभेमध्ये केला होता. त्यानंतर यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरूवात झाली. सोनिया गांधी यांनी देशासाठी त्यांचे मंगळसूत्र दिले आहे असे विधान प्रियांका गांधी यांनी या आरोपाच्या प्रत्युत्तरादाखल केले होते. त्याचा संदर्भ घेत मोहन यादव यांनी प्रियांका यांच्यावर टीका केली. ‘‘ आपल्याकडे मुलीचे लग्न करून तिची पाठवण केली की तिचे आडनाव बदलते, परंतु मतांसाठी हे लोक अजूनही गांधी आडनावच वापरत आहेत, प्रियांका या अजूनही गांधी आडनाव कसे लावतात’’ असा सवाल यादव यांनी उपस्थित केला.
मंगळसूत्रावरूनही टीका

मोहन यादव यांनी प्रियांका गांधी यांच्यावर मंगळसूत्राबाबतही टीका केली.‘‘जवाहरलाल नेहरू हे दुःखी असतील कारण त्यांच्या वंशातील व्यक्ती ही मंगळसूत्रही घालत नाही,’’ असे यादव म्हणाले.


काँग्रेसकडून प्रत्युत्तर

यादव यांनी केलेल्या टीकेला काँग्रेसचे नेते के.के. मिश्रा आणि जितू पटवारी यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. मंगळसूत्र न घालणे हा काही गुन्हा आहे की घटनाबाह्य कृती आहे? असा सवाल काँग्रेस नेते पटवारी यांनी विचारला आहे. आडनावावरून टीका करणाऱ्यांनी प्रियांका यांचे ‘एक्स’वरील अकाउंट तपासून पाहावे त्यावर वद्रा असेही लिहिले आहे, असेही पटवारी यांनी सांगितले.

हेही वाचा :

पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

काँग्रेसने शाहू महाराजांचा राजकीय बळी दिला : राजेश क्षीरसागर

कोल्हापूरच्या गादीपुढे मोदी कोणीही नाहीत; संजय राऊतांची घणाघाती टीका