शहरातील सराईत गुन्हेगारांचे ‘हॉटस्पॉट’ निश्चित; गुन्हे शाखेकडून ‘रोडमॅप’ तयार

पुणे शहरातील ‘स्ट्रीट क्राइम’ (Crime)आणि गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांचे वास्तव्य असलेले अठरा ‘हॉटस्पॉट’ निश्चित केले आहेत.

पुणे – शहरातील ‘स्ट्रीट क्राइम’ आणि गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांचे वास्तव्य असलेले अठरा ‘हॉटस्पॉट’ निश्चित केले आहेत. (Crime)गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांकडून आता गुन्हेगारांचे ‘हॉटस्पॉट’ असलेल्या ठिकाणांपैकी एका ठिकाणी एकाच वेळी एकत्रित कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येणार आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिली.

गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरात विविध भागात घडणाऱ्या गुन्हेगारी घटना आणि गुन्हेगारांचे वास्तव्य या बाबींचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार गुन्हे शाखेकडून १८ ‘हॉटस्पॉट’ निश्चित करण्यात आले आहेत.

बेकायदा शस्त्र बाळगणे, अमली पदार्थाची तस्करी, अल्पवयीन गुन्हेगारांकडून वाहनचोरी, वाहनांची तोडफोड, सोनसाखळी हिसकावणे, जबरी चोरी करणाऱ्यांची कुंडलीच तयार करण्यात आली आहे. सराईत गुन्हेगारांसह भुरट्या चोऱ्या करणाऱ्यांवरही पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. संपूर्ण शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याऐवजी आता गुन्हेगारांचे ‘हॉटस्पॉट’ असलेल्या ठिकाणांपैकी एका-एका ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येईल.

गुन्हे शाखेचे सर्व युनिटमधील पोलिस आणि स्थानिक पोलिसांकडून एकत्रित कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेतली जाईल. जेणेकरून गुन्हेगार पोलिसांच्या तावडीतून सुटणार नाहीत. जबरी चोरीच्या गुन्ह्यांतील बहुतांश आरोपी स्थानिक आहेत. कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याबाबत नियोजन करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त बलकवडे यांनी सांगितले.

मोबाईल, दुचाकी चोरी, वाहनांची तोडफोड अशा गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत आहे. गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी ‘रोडमॅप’ तयार करण्यात आला आहे. नागरिकांमध्ये पोलिसांबाबत विश्वासाची भावना निर्माण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

हेही वाचा :

अर्जही एकाच दिवशी अन् सभेची तारीखही एकच; ‘शिवाजी पार्क’साठी मनसे- ठाकरे गटात रस्सीखेच!

तरुणांची लग्न करणं हेच माझं लक्ष्य; वंचितच्या उमेदवाराची अफलातून घोषणा

‘शरद पवारांनी आदेश दिला तर मी..’; पृथ्वीराज चव्हाण अगदी स्पष्टच बोलले! राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट