कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : कोणत्याही एखाद्या कठीण प्रसंगाला, सामोरे जाताना तारेवरची(kolhapur) कसरत करावी लागते असे म्हणण्याचा एक वाक्प्रचार आहे. कोल्हापूरकरांना मात्र, रस्त्यावरून चालताना, रस्त्यावरून वाहन चालविताना अक्षरशः रस्त्यावरची कसरत करावी लागते. ही वेळ आणली आहे महापालिका प्रशासनाने. ही वेळ आणली आहे इथल्या रस्त्यांनी. ही वेळ आणली आहे खड्ड्यातील रस्त्यांनी.
हे रस्ते करण्याची जबाबदारी ज्या कंपनीवर सोपवण्यात आलेली आहे त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मात्र महापालिका प्रशासनावर जबाबदारी टाकून हात झटकण्याचा प्रयत्न चालू केला आहे. दिनांक 25 मे पूर्वी रस्ते पूर्ण झाले नाहीत तर 25 ऑक्टोबर पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. परिणामी आणि पावसाळ्यात कोल्हापूरकरांची रस्त्यावरची कसरत आणखी कठीण होणार आहे.
कोल्हापूरचे(kolhapur) विमानतळ विस्तारीकरणासह व अन्य सुविधांसह परिपूर्ण झाले आहे. या विमानतळावर विमाना लँडिंग झाल्यानंतर त्यातून उतरणाऱ्या प्रवाशांना कोल्हापूर शहरात आल्यानंतर इथे खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत असा प्रश्न पडावा. विमानाशिवाय इतर वाहनांनी कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या धार्मिक पर्यटकांची रोजची संख्या ५०हजारच्या पुढे आहे. या पर्यटकांच्या मनात ऐतिहासिक कोल्हापूर विषयी एक वेगळी प्रतिमा असते. पण इथले रस्ते पाहिल्यानंतर, त्यांचा कोल्हापूर विषयीचा भ्रमनिरास होतो.
सध्या कोल्हापूर महापालिकेत प्रशासकीय कारकीर्द असली तरी तीन वर्षांपूर्वी या महापालिकेचा कारभार विद्यमान पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हाती होता. त्यांनी महापालिकेचा उपयोग त्यांच्या राजकारणासाठी केला. कोल्हापूरच्या मूलभूत सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. शहरातल्या रस्त्यांची अक्षरशः”वाट” लागलेली दिसत असतानाही त्यांच्याकडून बघ्याची भूमिका घेतली गेली. दोन महिन्यापूर्वी कोल्हापूर शहरातील प्रमुख 16 मार्गांचे डांबरीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. पण नंतर लोकसभा निवडणुकीचे ढोल वाजू लागल्यानंतर ज्यांनी शुभारंभ केला त्यांनी राजकारणाला प्राधान्य दिले. परिणामी रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली.
रस्त्यांच्या कामाचे संपूर्ण कंत्राट एव्हरेस्ट कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आले.
तथापि या मार्गावरील सर्विस लाईनची कामे अपूर्ण होती. वेगवेगळ्या कारणांसाठी रस्त्यांची खुदाई करण्यात आली होती. डांबरीकरणासाठी किंवा नव्याने रस्ते बांधणीसाठी हे मार्ग महापालिकेने संबंधित कंपनीकडे हस्तांतरित करणे गरजेचे होते. पण प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. परिणामी शुभारंभाचा श्रीफळ वाढवूनही प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही.
मिरजकर तिकटी ते संभाजीनगर हा तसा स्टेशन रोड इतकाच गजबजलेला आणि प्रचंड वाहतूक असलेला रस्ता आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावरून जाणे म्हणजे पाठीचे मणके ढिले करणे.
रस्त्यावरची कसरत कशी असते ती या मार्गावर पाहायला मिळते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापुरात(kolhapur) किमान दहा वेळा आले. पण त्यांना तपोवन कडे जाण्यासाठी मिरजकर तिकटी ते कळंबा या रस्त्यावरून नेण्याचे धाडस पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून झाले नाही. गेल्या दोन-तीन दिवसांपासून या मार्गावर कंत्राटदार कंपनीने खडी आणून टाकली आहे. प्रत्यक्षात कामाला सुरुवात कधी होते हे सांगता येत नाही.
आणखी अर्धा दिवस साल ढकल केली तर 25 मे जवळ येतो आणि 25 मे नंतर कोणत्याही रस्त्यांची कामे करता येत नाहीत. कारण महाराष्ट्र सरकारने तसा नियमच केलेला आहे. त्यामुळे दिनांक 25 मे पूर्वी शहरातील प्रस्तावित रस्ते होतील याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. दिनांक 25 मे पूर्वी रस्ते झाले नाहीत तर त्याला जबाबदार कोण? महापालिका प्रशासन के संबंधित कंत्राटदार कंपनी?
हेही वाचा :
क्रिकेट फॅन्ससाठी गुड न्यूज! CSK आणि RCB दोघंही जाऊ शकतात प्लेऑफमध्ये
कोल्हापुरमध्ये खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
मैत्रिणीप्रमाणे गप्पा मारतो… Open AIचं सर्वात अॅडव्हान्स एआय टूल लाँच