कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : लोकसभेच्या मावळत्या सभागृहातील इथल्या दोघां(development) खासदारांना पुन्हा निवडून आणणारच, तर पक्षाशी दगाफटका करणाऱ्यांना पराभवाच्या मातीत गाळणारच असे परस्पर दावे अगदी जोरदारपणे केले जाऊ लागल्यामुळे प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातच लढत असल्याचे वातावरण तयार झाले आहे.
कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात(development) अतिरथी महारथी प्रचारात उतरल्यामुळे उमेदवारांच्या पेक्षा नेत्यांनीच ती अधिक प्रतिष्ठेची बनवली आहे. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकेला सर्वसामान्य मतदारांचे समर्थन आहे काय? या प्रश्नाचे उत्तर दिनांक 4 जून रोजी च्या मतमोजणीतून मिळणार आहे.
कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उदय सामंत, धुळ्याचे राजवर्धन कदमबांडे, अभिनेता गोविंदा आदींनी जाहीर सभा घेतल्या. तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे, आदींनी प्रचाराचे रान चांगलेच तापवले.
महायुतीच्या घटक पक्षांच्या वतीने तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी जाहीरनामे, वचननामे, संकल्पनामे प्रसिद्ध केले पण त्यातील मुद्द्यावर फारशी चर्चा झालीच नाही. आरोप आणि प्रत्यारोप यांची चिखल फेक, बोलताना जीभ घसरणे, भाषा सभ्यतेचा अभाव, बघून घेऊ, हिसका दाखवू, गद्दारांना गाडून टाकू, सोड घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, नालायक, वेळ लागलय, मस्तवाल, सत्तेची मस्ती, वखवखलेला आत्मा अशा शब्दांची उधळण नव्हे तर धुळवडच या निमित्ताने दोन्ही मतदार संघात झाली.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महाराष्ट्रातील दोन मजबूत पक्ष भारतीय जनता पक्षाने विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी फोडल्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोन मातब्बर नेते राजकीय दृष्ट्या चांगलेच घायाळ झाले आहेत. पक्ष फुटीची भळभळती जखम सोबत घेऊनच ते प्रचारात उतरले आहेत. पक्षाशी दगाफटका करणाऱ्या लोकप्रतिनिधींना सामान्य मतदार पुन्हा स्वीकारत नाही ह्या राजकीय इतिहासातील दाखल्यांचा आधार घेऊन या दोघांनीही महाराष्ट्र पिंजून काढला आहे.
शिवसेनेला कधी नव्हे ते दोन खासदार कोल्हापूर जिल्ह्याने 2019 च्या निवडणुकीत दिले होते. त्यांनी गद्दारी केली म्हणून त्या दोघांनाही पाडण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी देव पाण्यात घातले आहेत. शरद पवार यांचे कोल्हापूर हे आजोळ. एकेकाळी संपूर्ण जिल्हा त्यांच्यासोबत होता. अल्पसंख्यांक समाजाचा चेहरा म्हणून त्यांनी इथल्या हसन मुश्रीफ यांना सत्तेच्या वर्तुळात आणले होते. त्याच मुश्रीफांनी त्यांच्याशी दगलबाजी केली. या जिल्ह्यातील दगलबाजांना राजकारणातून बेदखल करण्यासाठी पवार आणि ठाकरे या दोघांनीही इथे निर्धार सभा घेतल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा प्रतिष्ठेच्या कमाल पातळीवर आणून ठेवल्या आहेत. ते स्वतःच उमेदवार असल्यासारखे कोल्हापुरात तळ ठोकून आहेत. दहा दिवसात सहा दौरे त्यांचे कोल्हापुरात झाले आहेत. आता तर इथे प्रचाराची सांगता होईपर्यंत ते कोल्हापुरातच राहणार आहेत.
मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात इतके दिवस तळ ठोकणे हे पहिल्यांदाच घडते आहे. छगन भुजबळ, नारायण राणे यांनी शिवसेनेचे बंड केले होते. या बंडात साथ देणाऱ्या लोकप्रतिनिधींना नंतर लोकांनी साथ दिली नाही हा इतिहास लक्षात घेऊन, पराभवाची परंपरा खंडित करण्याच्या निर्धाराने ते कोल्हापुरात उतरलेले दिसतात. शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबरच भारतीय जनता पक्षाने सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी चंग बांधला आहे. स्व पक्षाचा उमेदवार नसतानाही पंतप्रधानांच्या पासून अनेक केंद्रीय मंत्र्यांना कोल्हापुरात प्रचारासाठी यावे लागते यावरूनच भारतीय जनता पक्षाला कोल्हापूरच्या दोन्ही जागा मिळवणे किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट होते.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अर्थात काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती आणि महायुतीचे शिंदे गटाच्या शिवसेनेचे संजय मंडलिक अशी सरळ लढत होत आहे. या मतदारसंघातील प्रचारात कोल्हापूरशी संबंधित विकासाचे प्रश्न, तसेच महागाई हे महत्त्वाचे मुद्देच गायब झालेले दिसले आहेत. प्रचाराची वैचारिक पातळी इथे दिसली नाही. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पंचरंगी लढत आहे. महायुतीचे शिंदे गटाच्या शिवसेनेचे मावळते खासदार धैर्यशील माने, महा विकास आघाडीचे ठाकरे गटाच्या शिवसेनेचे सत्यजित पाटील सरूडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, भारतीय जवान व किसान संघटनेचे रघुनाथ दादा पाटील, आणि वंचित आघाडीचे डी. सी. पाटील या प्रमुख पाच उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.
कोणता उमेदवार विजयाच्या समीप आहे आणि कोणता उमेदवार मागे आहे याचा कोणताही अंदाज या मतदारसंघात बांधता येत नाही. या मतदारसंघातही महायुती आणि महाविकास आघाडी यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. या मतदारसंघातही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नितीन गडकरी, अभिनेता गोविंदा, तसेच उद्धव ठाकरे, सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे अशी मातब्बर मंडळी प्रचारात दिसली आणि त्यांनी निवडणूक वातावरण चांगलेच तापवले.
हेही वाचा :
IPLचे भविष्य संकटात! संघांच्या कमाईत झाली मोठी घसरण
मुख्यमंत्री शिंदे ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत, ‘हा’ मोठा नेता सोडणार पक्ष
विश्वजित कदम वाघ आहेत की नाही हे 4 जूनला कळेल : संजय राऊत