केजरीवालांनी ‘इंडिया’च्या नेत्यांना आणले एकत्र

विस्कळित वाटणारी ‘इंडिया’ आघाडी(lead) प्रत्यक्षात असल्याबद्दल प्रश्‍न उपस्थित होत होते. परंतु निवडणुकांचा बिगूल फुंकल्यानंतर दिल्लीत रविवारी रामलीला मैदानावर ‘इंडिया’ची पहिलीच जोरदार सभा झाली.

नवी दिल्ली : विस्कळित वाटणारी ‘इंडिया’ आघाडी प्रत्यक्षात असल्याबद्दल प्रश्‍न उपस्थित होत होते. परंतु निवडणुकांचा बिगूल फुंकल्यानंतर दिल्लीत रविवारी रामलीला मैदानावर ‘इंडिया’ची पहिलीच जोरदार सभा झाली. ‘इंडिया’तील घटक पक्ष अद्याप विविध राज्यांमध्ये एकसंध होऊ शकले नसले तरी दिल्लीतील सभेवरून त्यांचा एकच ‘एल्गार’ दिसला तो म्हणजे या देशाचे संविधान वाचवणे. यासाठी मोदी सरकारला हटविण्याचा संकल्प करण्यात आला. जोरदार शक्तिप्रदर्शन केलेल्या या सभेचे निमित्त होते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ‘ईडी’ने केलेल्या अटकेचे.

केजरीवाल यांच्या अटकेचा विरोध करण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीने दिल्लीतील रामलीला मैदानावर महारॅली आयोजित करीत ती यशस्वीही करून दाखवली. अनेक विरोधी नेत्यांची या रॅलीत तडाखेबंद भाषणे झाली. महारॅली यशस्वी झाली असली तरी अनेक राज्यांमध्ये असलेला एकमेकांना विरोध व या रॅलीमध्ये आलेल्यांचे मतांमध्ये परिवर्तन कसे होईल, यावरच या यशस्वी रॅलीचे फलित अवलंबून राहणार आहे.

बहुचर्चित मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी केजरीवाल व जमीन गैरव्यवहारप्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना झालेली अटक तमाम विरोधी पक्षांना एकत्र करण्यात यशस्वी ठरली आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षाने या मुद्द्यावर किमान दिल्ली आणि पंजाबमध्ये तरी लोकांत सहानुभूती निर्माण करण्यात यश मिळवले आहे. या दोन्ही राज्यातून मोठ्या संख्येने लोक आले होते.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी महारॅलीत सामील झाल्या, मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्यांचे भाषण झाले नाही. दुसरीकडे प्रियांका गांधी यांचे भाषण विषयपत्रिकेत नसले तरी ‘इंडिया’ आघाडीच्या पाच मागण्या मांडण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली होती, सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि राहुल गांधी असे गांधी घराण्याचे तीन मातब्बर नेते महारॅलीला हजर होते. दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आप यांच्यादरम्यान जागावाटप झाले आहे. या पार्श्वभूमीवर एकमेकांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी हे दोन्ही पक्ष प्रयत्न करणार काय, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. दिल्लीत आप ४ तर काँग्रेस ३ जागा लढवणार आहे. देशभरातील प्रमुख विरोधी पक्षनेते महारॅलीस हजर होते. त्याला अपवाद ठरला तो तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा. बॅनर्जी यांनी स्वतः येण्याऐवजी खासदार डेरेक ओ ब्रायन व खासदार सागरिका घोष यांना पाठवले.

रामलीला मैदानावर रॅलीच्या ठिकाणी केजरीवाल यांचे पोस्टर्स लावण्यात आले होते. व्यासपीठासमोर खालच्या बाजूस असलेले केजरीवाल यांचे पोस्टर मात्र काँग्रेस नेत्यांच्या विरोधामुळे आम आदमी पक्षाला हटवावे लागले. मैदानाच्या मागच्या बाजूस तुर्कमान गेट आहे. याठिकाणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची दोन-तीन मोठी कटआउटस् दिसत होती.

हेही वाचा :

राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार भाजप आमदाराची पत्नी

लोकसभा निवडणुकीत मतदान न केल्यास बँकेतून 350 रुपये कापले जातील? 

सर्वांसमोर ऋषि कपूर यांनी रणबीरच्या कानशीलात लागावली; कारण ठरली ‘ही’ धार्मिक चूक