कोल्हापूरचा दत्तक प्रकरण त्यावर अकारण राजकारण!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यात सुमारे 60 वर्षापूर्वी घडलेल्या(adoption) दत्तक विधान प्रकरणाचा कधी काळी राजकारणासाठी वापर केला जाईल असे किमान कोल्हापूरच्या जनतेला वाटले नव्हते. श्रीमंत शाहू छत्रपती हे महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून कोल्हापूर लोकसभा मतदार संघाच्या आखाड्यात उतरले आणि अचानक राजवर्धन कदमबांडे यांची काही राजकारण्यांना आठवण झाली. इतकेच नाही तर त्यांना प्रत्यक्षात कोल्हापूरच्या प्रचारात महायुतीकडून आणले गेले आहे. साठ वर्षांपूर्वीची कोल्हापूरकरांची अस्मिता जागृत करण्याचा हा राजकीय प्रयत्न म्हणावा लागेल.

कोल्हापूरच्या राजघराण्यातील दत्तक(adoption) विधान प्रकरण साठ वर्षांपूर्वी अतिशय गाजले होते, त्याचे साक्षीदार अजूनही कोल्हापुरात आहेत. त्यांच्याकडून तत्कालीन आंदोलनाच्या सुरस कथा आजही सांगितल्या जातात. तथापि गेल्या साठ वर्षात पंचगंगा नदीच्या पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेलेले आहे. लोक हा दत्तक विधान विषय विसरलेले आहेत किंवा होते. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे वारसदार म्हणून विद्यमान श्रीमंत शाहू छत्रपती यांना लोकांनी स्वीकारलेले आहे. आता ते लोकसभेचे उमेदवार असल्यामुळे हा जुना इतिहास पुन्हा जनतेसमोर अकारण आणला जातो आहे.

छत्रपती घराण्याचे दत्तक विधान प्रकरण हा पूर्णपणे त्यांचा खाजगी विषय आहे. त्याचे आत्ताच्या लोकसभा निवडणुकीत राजकारण केले जात आहे. राजवर्धन कदमबांडे हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक होते. पण आता ते धुळे जिल्ह्यात भाजपच्या मांडवाखाली काम करतात. आता भाजपने त्यांना खास कोल्हापुरात आणले आहे. त्यांनी कोल्हापुरात येऊन घेतलेल्या पत्रकार परिषदेत मी राजर्षी शाहू महाराज यांच्या रक्ताचा वारस असल्याचे आणि विद्यमान श्रीमंत शाहू छत्रपती हे संपत्तीचे वारसदार असल्याचे म्हटले आहे. तर मी रक्ताचा वारसदार आहेत पण त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा सुद्धा वारसदार आहे असे श्रीमंत शाहू छत्रपती यांनी त्यांना उत्तर देताना म्हटले आहे.

वास्तविक राजघराण्यातील दत्तक प्रकरणाचा आणि आत्ताच्या राजकारणाचा काहीही संबंध नाही. पण तरीही साठ वर्षांपूर्वींचा हा राजघराण्याशी संबंधित असलेला वाद भाजपकडून पुन्हा उकरून काढला जातो आहे. कोल्हापूरच्या जनतेची इच्छा असेल तर आपण कोल्हापुरात राजकारणात सक्रिय राहू असे राजवर्धन कदमबांडे यांनी म्हटले आहे. वास्तविक ही संधी त्यांना कोल्हापूरच्या जनतेने 1984 च्या लोकसभा निवडणुकीत दिली होती. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक हरल्यानंतर त्यांना कोल्हापुरात राजकारणात सक्रिय राहता आले असते. पण निवडणूक हरल्यानंतर ते धुळ्याला परत गेले ते पुन्हा कोल्हापुरात दिसलेच नाहीत. त्यांचे कोल्हापुरात खाजगी दौरे झाले असतीलही पण त्यांनी कोल्हापुरात यापूर्वी कधीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला नव्हता.

प्रचाराच्या माध्यमातून महायुतीचे एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांनी कोल्हापूरचे दत्तक प्रकरण प्रचाराचा एक भाग म्हणून पुढे आणले. त्यानंतर त्याची चर्चा सुरू झाली. अनेकांनी त्यावर आपली मते व्यक्त केली. साठ वर्षांपूर्वी गाजलेला आपल्या व्यक्तिगत जीवनाशी संबंध असलेला दत्तक विधान विषय कोल्हापुरात पुन्हा चर्चेला आलेला आहे हे कदाचित राजवर्धन कदमबांडे यांना माहीत सुद्धा नव्हते. पण भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दत्तक प्रकरणाचा महायुतीसाठी फायदा करून घेता येईल असा धूर्त आणि राजकीय विचार करून राजवर्धन कदमबांडे यांना कोल्हापुरात महायुतीच्या प्रचारासाठी आणले आहे. त्यांच्याकडून पुन्हा दत्तक प्रकरणाचाच अप्रत्यक्ष विषय उपस्थित केला जातो आहे. साठ वर्षांपूर्वी कोल्हापुरात जे वातावरण होते तेच वातावरण पुन्हा कोल्हापुरात तयार करण्याचा हेतू त्यामागे असला तरी सर्वसामान्य मतदारांच्यासाठी तो अस्मितेचा विषय बनू शकत नाही हे वास्तव आहे.

हेही वाचा :

“मोदींनी कोल्हापुरात भडकाऊ भाषण करत…”, रोहित पाटलांची टीका

कोरोना संकटातच कोल्हे राजीनामा घेऊन आले होते; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट.

शिंदे राहिले त्या हॉटेलमध्ये काय घडलं ? सतेज पाटील करणार मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रार