कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : आगामी विधानसभेची निवडणूक जिंकावयाची(spark) असेल तर महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा महाराष्ट्रातील जनतेसमोर ठेवला पाहिजे. बिन चेहऱ्याची निवडणूक लढवणे योग्य होणार नाही. अशी ठिणगी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीमध्ये टाकली आहे. त्यांच्या या मागणीमुळे काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस नाराज झाली आहे.
संजय राऊत हे तिरकस बोलणारे, वादग्रस्त वक्तव्य (spark)करणारे म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. आता त्यांनी बिन चेहऱ्याची विधानसभा निवडणूक लढणे योग्य ठरणार नाही असे सांगताना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात आणावे असे त्यांना अप्रत्यक्ष सुचवावयाचे आहे. काँग्रेसचे नाना पटोले यांनी तसेच जयंत पाटील यांनी राऊत यांच्या या नव्या भूमिकेवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
आघाडीच्या वतीने विधानसभा निवडणूक लढवताना ज्यांच्या जास्त जागा येतील त्यांचा मुख्यमंत्री हे साधे सरळ गणित मांडले आहे. महाविकास आघाडीला या निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर आघाडीच्या घटक पक्षातील नेते मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात निर्णय घेऊ शकतात, पण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आधीच ठरवला जात नाही. हे संजय राऊत यांना सुद्धा माहित आहे. उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द चांगली झालेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचाच चेहरा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या समोर आणला पाहिजे असा त्यांचा युक्तिवाद आहे.
लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या शिवसेनेला, त्यांचे निवडणूक चिन्ह नवीन असतानाही नऊ जागांवर त्यांना चांगले यश मिळाले. आगामी विधानसभा निवडणुकीतही ठाकरे यांना चांगले यश मिळेल हे गृहीत धरून मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचाच चेहरा सर्वसामान्य जनतेसमोर ठेवला गेला पाहिजे. असे राऊत यांचे म्हणणे आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आधीच महाविकास आघाडी कडून संभाव्य मुख्यमंत्री म्हणून कोणाचेही नाव पुढे केले जाण्याची शक्यता फारच कमी आहे. ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री हे आघाडीचे सूत्र ठरलेले आहे. पण तरीही राऊत यांनी केलेली मागणी ही आततायीपणाची म्हणावी लागेल.
लोकसभा निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांनी दिलेला कौल हा विधानसभा निवडणुकीतही दिसून येईल असे राजकीय गणित मांडणे हे भाबडेपणाचे ठरते. 2019 च्या लोकसभा निवडणुकी नंतर विधानसभेच्या निवडणुकीत चित्र वेगळे दिसले होते. माफक यश मिळवूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नंतरच्या विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले होते हे इथे लक्षात घेतले पाहिजे.
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि एनडीए आघाडीने पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा चेहरा वापरला होता. मात्र विरोधकांच्या इंडिया या आघाडी कडून पंतप्रधान म्हणून कोणताही चेहरा सर्वसामान्य जनतेसमोर ठेवलेला नव्हता. इंडिया आघाडीला बहुमत मिळाले असते तर सर्व नेत्यांनी विचार करून पंतप्रधान म्हणून कोणाच्यातरी नावाची निवड केली असती. हे सर्व संजय राऊत यांना माहित आहे पण तरीही ते विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री कोण असणार याची घोषणा महाविकास आघाडीने केली पाहिजे असा आग्रह धरतात.
वास्तविक त्यांची ही भूमिका महाविकास आघाडीची बिघाडी करू शकते. त्यांनी ही भूमिका मांडल्यानंतर लगेच जयंत पाटील आणि विजय वडेट्टीवार तसेच नाना पटोले यांनी महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर आम्ही एकत्र बसून त्या संदर्भात निर्णय घेऊ असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे संजय राऊत यांची ही भूमिका महाविकास आघाडीला मान्य नाही हे स्पष्ट होते.
वास्तविक लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसने घवघवीत यश मिळवले आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसचाच मुख्यमंत्री म्हणून कोणाची तरी नाव जाहीर करा अशी मागणी केली असती तर, ते उचित ठरले असते. पण त्यांनी अशा प्रकारची कोणतीही भूमिका घेतलेली नाही. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा मोठा भाऊ असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटल्यानंतर आघाडीतील इतर घटक पक्षाच्या नेत्यांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. संजय राऊत यांनी मात्र आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला महाराष्ट्रातील बहुतांशी जनतेचे समर्थन असल्याचे अप्रत्यक्ष स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याच नावाची घोषणा करावी असे त्यांना म्हणावयाचे दिसते.
हेही वाचा :
मनापासून खरं प्रेम करत असाल, तरी सुद्धा ‘या’ चुकांमुळे होईल ब्रेकअप…
जिओ अन् एअरटेलनंतर वोडाफोन आयडियाचा ग्राहकांना झटका
‘7 महिन्यात रोहित दुसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनल हरला तर..’ ; गांगुली स्पष्टच बोलला