केजरीवाल यांना दिलासा नाहीच, अटक वैधच, आव्हान

मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करत (ED)ने त्यांना २१ मार्च रोजी अटक केली. सध्या ते तिहार तुरुंगात असून, त्यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

‘ईडीने लोकसभा निवडणुकीची वेळ साधून अटक केली हा आरोप टिकू शकेल असा नाही. ईडीने या प्रकरणी पुरेसे पुरावे गोळा केले आहेत. त्यानंतरच अटकेची कारवाई झाली.(ED) ही कारवाई करताना कोणत्याही कायदेशीर तरतुदीचे उल्लंघन झाल्याचे दिसत नाही. तसेच, सत्र न्यायालयाने दिलेला ईडी कोठडीचा आदेशही सकारण होता. त्यात बेकायदा काही नाही,’ असा निकाल न्या. शर्मा यांनी दिला.

‘पुरेशी कागदपत्रे, माफीच्या साक्षीदारांचे जबाब तसेच, गोव्यातील एका आप उमेदवाराने दिलेल्या कबुलीच्या आधारे मद्यधोरण घोटाळ्यातील पैसा गोव्यातील निवडणुकीत पुरविण्यात आला, असा दावा ईडी करू शकली, असे न्यायालयास वाटते. घोटाळ्यातील पैसा ते गोव्यात झालेला अर्थपुरवठा हे वर्तुळ यातून पूर्ण होते,’ असेही न्यायालयाने नमूद केले.

अटकेच्या कारवाईस आव्हान देताना केजरीवाल यांनी केलेल्या राजकीय हेत्वारोपांवरही न्यायालयाने भाष्य केले. ‘आम्ही केवळ कायद्यास बांधील आहोत, राजकारणास नाही. न्यायालयासमोर राजकीय विचार आणता येत नाहीत. आमच्यापुढे असणारे प्रकरण हे केंद्र सरकार विरुद्ध केजरीवाल असे नसून केजरीवाल विरुद्ध ईडी असे आहे. न्यायालये ही घटनात्मक नैतिकतेशी संबंधित असतात, राजकीय नैतिकता हा न्यायालयांचा विषय नाही,’ अशी कठोर टिप्पणीही न्यायालयाने केली.

सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार
अटकेच्या कारवाईस आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने नामंजूर केल्यानंतर आम आदमी पक्षाने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल, असे ‘आप’तर्फे सांगण्यात आले. दरम्यान, केजरीवाल यांचे राजकीय अस्तित्व नष्ट करण्यासाठी आखलेले हे राजकीय कारस्थान आहे, असा आरोप आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी पत्रकार परिषदेत केला. न्यायसंस्थेवर आमचा विश्वास असून सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला निश्चितच न्याय मिळेल, असेही ते म्हणाले.

‘आपचा उद्दामपणा धुळीस’
आपचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन आता ‘केजरीवाल भ्रष्टाचार क्रांती’मध्ये रूपांतरित झाले आहे, अशी टीका दिल्ली भाजपने केली. केजरीवाल यांच्यात थोडीशी नैतिकता उरली असेल तर ते पदाचा राजीनामा देतील, असे दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेव म्हणाले. न्यायालयाच्या निकालामुळे ‘आप’चा उद्दामपणा धुळीस मिळाला आहे. तथ्ये व पुराव्यांमुळे प्रामाणिक नेता या स्वयंघोषित प्रतिमेसही तडे गेले आहेत, अशा शब्दांत भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी समाचार घेतला

न्यायालयाने फटकारले मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणातील माफीच्या साक्षीदाराबाबत केलेल्या विधानावरून उच्च न्यायालयाने मंगळवारी अरविंद केजरीवाल यांना फटकारले. माफीच्या साक्षीदाराबाबतचा कायदा १०० वर्षांपूर्वी तयार करण्यात आला असून, तो केजरीवाल यांना खोट्या प्रकरणात गोवण्यासाठी आणण्यात आलेला नाही, असे खडे बोल न्यायालयाने सुनावले.

हेही वाचा :

इचलकरंजीतील कुख्यात ‘केसरी गँग’चे तिघे गुंड जिल्ह्यातून हद्दपार

स्वाभिमानी शेतकरी संघटना सहा जागा लढविणार, राजू शेट्टी आजही ठाम

‘मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात निवडणुका होणार नाहीत…’ अर्थमंत्री सीतारामन यांच्या पतीचा दावा