मोदींचा फोटो लावून प्रकाशअण्णा आवाडेंनी हातकणंगलेत महायुतीविरोधात ठोकला शड्डू!

हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून शिवसेनेच्या धैर्यशील माने(photobooks) यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता त्यांच्याच विरोधात महायुतीत असणारे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी रणशिंग फुंकले आहे. महायुतीच्या उमेदवाराविरोधातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरून आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.

त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी(photobooks) वाढली असून, त्याचा फायदा नेमका कोणाला होणार? हे पाहणे महत्त्वाचे आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासाठी आपण रिंगणात आहोत, असा खुलासाही आवाडे यांनी दिल्याने त्यांच्यामागे भाजपचा हात आहे का? अशीही चर्चा आहे.

आमदार प्रकाश आवाडे यांच्या संभाव्य उमेदवारीने हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र बदलणार आहे. त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यास महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांची मोठी अडचण होणार आहे. मत विभागणीचा फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना होणार आहे. आवाडे यांच्या या धक्कातंत्रामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे, त्यामुळे त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून केला जाणार काय, याकडे आता लक्ष असणार आहे.

आमदार आवाडे यांचे पुत्र राहुल यांनी १५ वर्षांपूर्वी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. मात्र, त्यांनी ऐनवेळी माघार घेतली. आता पुन्हा त्यांचे नाव चर्चेत होते. महाविकास आघाडी, महायुतीकडून त्यांनी उमेदवारीची चाचपणी केल्याची चर्चा होती. पण, उमेदवारी न मिळाल्यामुळे अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली होती. आता त्यांच्याऐवजी स्वतः आमदार आवाडे हे निवडणूक रिंगणात उतरत असल्यामुळे या मतदारसंघातील ही सर्वांत मोठी राजकीय घडामोड आहे.

दुसरीकडे, आमदार आवाडे यांच्या उमेदवारीला साखर कारखानदारांचीही मदत मिळण्याची शक्यता आहे. भाजपसह विविध पक्षांतील अदृश्‍य शक्तींचे पाठबळ मिळाल्यास या मतदारसंघातील होणारी बहुरंगी लढत प्रचंड चुरशीची होऊ शकते.

आमदार आवाडे यांच्या संभाव्य उमेदवारीला अनेक कंगोरे आहेत. भाजपमध्ये रखडलेला प्रवेश, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीची साशंकता, सरकारी पातळीवर रखडलेले महत्त्वाचे प्रस्ताव, महापालिकेतील त्यांच्या विकासकामांसाठी होत असलेला अडथळा या सर्वांचा परिपाक म्हणूनही त्यांच्या उमेदवारीकडे पाहिले जात आहे.

हेही वाचा :

टेन्शन वाढलं! राज्यावर भीषण पाणी टंचाईचं संकट, फक्त ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक

‘घड्याळाचे काटे पुन्हा…’; पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा BJP नेत्याचा आरोप

भाविकांसाठी आनंदाची बातमी! ‘चैत्रोत्सवात’ सत्पश्रृंगी देवीचं मंदिर २४ तास राहणार खुलं