संघाशी नाते, आता सांगण्यापुरते

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाचे(team) राष्ट्रीय अध्यक्ष वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध नाहीत. तथापि नियमाला काही अपवाद असतात. बंगारू लक्ष्मण हे काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष असताना ते कमालीचे वादग्रस्त बनले होते. त्यांनी एका समाजाचे तुष्टीकरण करणारे वक्तव्य केले होते आणि एका भ्रष्ट व्यवहारातही सापडले होते. भाजपने त्यांना अर्धचंद्र दिला होता. त्यांच्यानंतर विद्यमान अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेले संघ विषयक वक्तव्य वादग्रस्त बनले असून त्यांनी विरोधकांच्या हाती एक नवा मुद्दा दिला आहे. सल्ला मसलत करण्यासाठी, मार्गदर्शना घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज राहिलेली नाही. अशा आशयाचे त्यांनी केलेले वक्तव्य भारतीय जनता पक्षाला अडचणीचे ठरले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची(team) स्थापना इसवी सन 1925 मध्ये डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी केली. आता त्याच्या भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम, राष्ट्र सेवा समिती या शाखां असून सर्वात महत्त्वाची राजकीय शाखा म्हणजे, कालचा जनसंघ आणि आत्ताचा भारतीय जनता पक्ष होय. भाजप हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रभावाखाली कालही होता आणि आजही आहे. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार ते विद्यमान डॉक्टर मोहन भागवत यांच्यापर्यंत सर्वच सर संघ चालकांनी जनसंघ, भाजप या राजकीय शाखेला मार्गदर्शन केले आहे. कधी थेट तर कधी अप्रत्यक्ष आदेश संघाच्या नागपूर येथील रेशीम बाग मुख्यालयातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपाला दिलेले आहेत.

विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, जे पी नड्डा, महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील वगैरे सर्वच मंडळी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेली आहेत. रा. स्व. संघाचे मार्गदर्शन घेतल्याशिवाय या मंडळींचे पान सुद्धा हलत नाही. दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे राम मंदिर उद्घाटन समारोह झाला त्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबरीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघ चालक डॉक्टर मोहन भागवत यांना सन्मान देण्यात आला होता. यावरून संघाचा प्रभाव भारतीय जनता पक्षावर असल्याचे सिद्ध होते.

2014 मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर कोणाची वर्णी लागणार याची चर्चा होती. एकनाथ खडसे हे सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक होते. तथापि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांना ते नागपूरचे असल्यामुळे संघ मुख्यालयाचा पाठिंबा होता. संघाच्या समर्थनातूनच फडणवीस यांना मुख्यमंत्री पद मिळाले हे कोणीही नाकारू शकत नाही.

अटल बिहारी बाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मार्गदर्शन भारतीय जनता पक्षाकडून घेतले जात होते. आता भारतीय जनता पक्ष स्वतःच्या पायावर ठामपणे उभा आहे, तो आता सक्षम बनलेला आहे, त्यामुळे संघाचे मार्गदर्शन घेण्याची भारतीय जनता पक्षाला गरज राहिलेली नाही असे वादग्रस्त विधान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केले आहे.

वास्तविक लोकसभा निवडणुकीचे आणखी काही टप्पे शिल्लक असताना त्यांच्याकडून अशा प्रकारच्या वक्तव्याची अपेक्षा खुद्द भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनाही नव्हती. आता महाराष्ट्रातील चंद्रशेखर बावनकुळे, वगैरे नेते सारवा सारव करू लागले असले तरी एकूणच राजकीय वर्तुळात नड्डा यांच्या वक्तव्याबद्दल उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. एक दिवस हे भाजपवाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा बाहेरचा रस्ता दाखवतील अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृ संस्था आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील नेते हे रेशीम बाग या संघ मुख्यालयाच्या संपर्कात असतात. डॉक्टर मोहन भागवत यांच्यासह संघाच्या इतर पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शना घेत असतात. अशी एकूण पार्श्वभूमी असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेले वक्तव्य संघ परिवाराला सुद्धा आश्चर्यचकीत करणारे आहे.

संघाचे काम वैचारिक आहे आणि भाजपचे काम राजकीय असल्याने आम्ही आमच्या जबाबदाऱ्या आपल्या परीने सक्षमपणे पार पाडत आहोत असे एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना जे पी नड्डा यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात संघाची गरज लागायची असे म्हटले आहे. त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी हे पुरेसे सक्षम नव्हते असे त्यांना सुचवावयाचे आहे काय? तेव्हाचा भारतीय जनता पक्ष हा सक्षम नव्हता असे त्यांना म्हणावयाचे असेल तर मग अटल बिहारी बाजपेयी हे देशाचे पंतप्रधान कसे काय झाले? त्यांची तर वैचारिक बैठक फार उंचीची होती, त्याचे काय?

हेही वाचा :

महाराष्ट्रात सोन्यासह चांदीचे दर गडगडले….

डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

मनातील भीती काढण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या