ज्येष्ठ पुरातत्त्वशास्त्रज्ञ के. के. मोहम्मद,राष्ट्रहितासाठी हिंदूंनी येथेच थांबावे

‘‘आधुनिक समाज म्हणून आपण ऐतिहासिक(historical) तथ्ये स्वीकारायला हवीत. मुस्लिमांसाठी ज्याप्रमाणे मक्का आणि मदिना पवित्र आहेत. त्याचप्रमाणे हिंदूंसाठी काशीतील ज्ञानवापी आणि मथुरेतील कृष्ण जन्मस्थळ पवित्र आहेत.


पुणे : ‘‘आधुनिक समाज म्हणून आपण ऐतिहासिक(historical) तथ्ये स्वीकारायला हवीत. मुस्लिमांसाठी ज्याप्रमाणे मक्का आणि मदिना पवित्र आहेत. त्याचप्रमाणे हिंदूंसाठी काशीतील ज्ञानवापी आणि मथुरेतील कृष्ण जन्मस्थळ पवित्र आहेत. मुस्लिमांच्या दृष्टीने तेथे फक्त एक मशीद आहे. त्यामुळे त्यांनी ती स्वतःहून हिंदूंना सुपूर्त करावी आणि हिंदूंनीही राष्ट्रहितासाठी येथेच थांबावे,’’ असे आवाहन ज्येष्ठ पुरातत्त्वशास्त्रज्ञ के. के. मोहम्मद यांनी केले.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर येथे आयोजित ‘भारत ः विरासत आणि संस्कृती’ या व्याख्यानात ते बोलत होते. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण उत्तर भारताचे माजी संचालक असलेले मोहम्मद यांनी चंबळ खोऱ्यातील बटेश्वर मंदिर शृंखलेचे पुनर्निर्माण आणि राम मंदिराच्या सर्वेक्षणासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘काशी आणि मथुरेतील जन्मस्थळाशी ना प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा संबंध आहे, ना एखाद्या औलियाचा संबंध आहे, परंतु हिंदूंसाठी ते देवांचे जन्मस्थान आहे. हिंदू समुदायाने मध्ययुगीन कालखंडात उद्‌ध्वस्त झालेली तीन ते चार हजार मंदिरे मागितली नाहीत. त्यांनी तसे केले तर देशात हाहाकार माजेल. देशाच्या हिताच्या दृष्टीने हिंदूंनी येथेच थांबावे.’’

पुणे संवाद, डेक्कन कॉलेज आणि भांडारकर संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया, डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. प्रमोद पांडे, पुणे संवादचे संयोजक मनोज पोचट, केदार नाईक आदी उपस्थित होते.

फिरोदिया म्हणाले, ‘‘मध्ययुगीन कालखंडात आक्रमणामुळे हजारो मंदिरे आणि स्तूप उद्‌ध्वस्त करण्यात आले. अनेक आक्रमणांनंतर आणि डाव्या इतिहासकारांच्या अस्तानंतर आपण खऱ्या अर्थाने खरा इतिहास अभ्यासतो आहोत.’’ भारतासारख्या देशात शास्त्रीय पुरातत्त्व उत्खननाचे विशेष महत्त्व आहे, असे मत डॉ. पांडे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा :

‘गरीबी हटाव’चा नारा फक्त इलेक्शन पुरताच; उदयनराजे भोसलेंचे काँग्रेसवर टीकास्त्र

बॉसच्या त्रासाला कंटाळले कर्मचारी, चक्क गुंडांना दिली सुपारी! हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

आलिया-रणबीरची लाँग ड्राईव्ह नाही तर… 8 कोटींच्या गाडीची नंबर प्लेट चर्चेत