जळगावजवळील परधाडे रेल्वे स्टेशनजवळ बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास एक भीषण रेल्वे अपघात घडला. धावत्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये(Express) आग लागल्याची अफवा पसरल्याने घाबरलेल्या प्रवाशांनी धावत्या रेल्वेतून उड्या मारल्या. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसखाली सापडून १२ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.
पुष्पक एक्सप्रेसच्या(Express) इंजिनच्या मागील डब्यातील प्रवाशांना धूर निघत असल्याचे दिसले. त्यातील काहींनी इंजिनच्या दिशेने डोकावून पाहिले असता, इंजिनमधून धूर निघत असल्याचा अंदाज बांधला. या दरम्यान डी-३ या बोगीतील प्रवाशांनी चैन ओढली आणि गाडी परधाडे स्टेशननजीक असलेल्या पुलाजवळ थांबली. यावेळी घाबरलेले अनेक प्रवासी, ज्यात बहुतांश जनरल बोगीतील होते, धावत्या गाडीतून खाली उतरले आणि समोरच्या रेल्वे रुळांवर जाऊन उभे राहिले. त्याचवेळी विरुद्ध दिशेने ताशी ११० किमी वेगाने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने या प्रवाशांना चिरडले. या अपघातात १२ जण जागीच ठार झाले.
मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये (क्र. १२५३३) प्रवास करणाऱ्या एका जखमी प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा रेल्वे स्थानक सोडल्यानंतर काही अंतरावर एका चहा विक्रेत्याने गाडीला आग लागल्याची माहिती दिली. यानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि त्यांनी घाबरून परधाडे-माहेजीदरम्यान धावत्या रेल्वेतून उड्या मारल्या. या दुर्घटनेत होत्याचे नव्हते झाले.
अपघातानंतर घटनास्थळावर अत्यंत विदारक दृश्य होते. कुणाचे हात, कुणाचे पाय तर कुणाचे अर्धे धड रेल्वेच्या ट्रॅकवर पडलेले होते. जखमी प्रवासी वेदनेने विव्हळत होते. हा आवाज ऐकून गाडीतील इतर प्रवाशांसह प्रत्यक्षदर्शी नागनाथ बोडखे (बेंगळुरू) हे देखील खाली उतरले आणि त्यांनी हे भयानक दृश्य पाहिले.
अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, पोलीस आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
हेही वाचा :
आज अमला योगासह जुळून आले मोठे शुभ योग; 3 राशींना सोन्याचे दिवस
एक्स्प्रेसमधून उड्या मारलेल्या प्रवाशांना समोरुन येणाऱ्या ट्रेनने उडवलं, 8 जण ठार
सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा मटार ढोकळा