भव्य दिव्य “छावा” चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात…..!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : ऐतिहासिक सत्य घटनांवर आधारित, इतिहास घडवणाऱ्या महापराक्रमी व्यक्तिमत्वावर किंवा इतिहासाच्या सोनेरी पानात जाऊन बसलेल्या इतिहास पुरुषांवर चित्रपट(film) किंवा नाटक निर्माण करताना निर्माता, दिग्दर्शक यांना फार सावधगिरी बाळगावी लागते. इतिहासाशी प्रतारणा किंवा इतिहासातील घटनांशी आपणाकडून छेडछाड तर केली जात नाही ना याची पुरेपूर काळजी आणि खबरदारी त्यांना घ्यावी लागते.

सिनेमॅटिक लिबर्टी घेताना ती आपल्या अंगलट तर येणार नाही ना याचे भानही त्यांना राखावे लागते. सध्या” छावा”या भव्य दिव्य हिंदी चित्रपटाबद्दल(film) काही संघटना आणि व्यक्तींकडून आक्षेप घेतला गेला आहे. परिणामी हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला आहे. वादात सापडलेला हा काही पहिला चित्रपट नव्हे. यापूर्वीही ऐतिहासिक पट मोठ्या पडद्यावर मांडताना प्रदर्शनापूर्वीच ते वादग्रस्त बनले होते.

लक्ष्मण उतेकर या मराठी माणसाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर” छावा” या हिंदी चित्रपटाची निर्मिती केली आहे. दक्षिणेतील सुपरस्टार सर्जिकल स्ट्राइक फेम अभिनेता विकी कौशल यांनी धर्मवीर संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा या चित्रपटात साकारली आहे.

200 पेक्षा अधिक कोटी रुपयांचा खर्च या चित्रपट निर्मितीवर करण्यात आला आहे. या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि येसूबाई हे एका गाण्यात लेझीम खेळताना आणि नृत्य करताना दाखवले आहेत आणि त्यालाच मराठा क्रांती मोर्चा सह काही संघटनांनी तसेच व्यक्तींनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
या चित्रपटातील हे लेझीम दृश्य काढून टाका अन्यथा चित्रपट(film) प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा या चित्रपटाच्या निर्मात्यांना देण्यात आलेला आहे.

लेझीम खेळणे ही आपली संस्कृती आहे परंपरा आहे. त्याला हरकत घेणे चुकीचे आहे. पण ही सिनेमॅटिक लिबर्टी का घेतली आहे किंवा ते दृश्य घेण्यामागचे कारण काय, त्याचे सूत्र काय हे पाहिल्याशिवाय विरोधाची भूमिका घेतली जाऊ नये. लक्ष्मण उतेकर यांनी इतिहासाचे अभ्यासक तसेच संशोधक यांना हा चित्रपट आधी दाखवावा आणि मग हरकतीचे निराकरण झाल्यावर, किंवा त्यांनी चित्रपटातील हे लेझीम दृश्य काढून टाकण्याचा सल्ला दिल्यानंतर हे दृश्य वगळून चित्रपट प्रदर्शित करावा अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती तसेच खासदार आणि अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी घेतली आहे आणि ती योग्य म्हणावी लागेल.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला पहिला भव्य आणि दिव्य असा हिंदी चित्रपट निर्माण केला गेला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास देशभर आणि देशाबाहेरही या चित्रपटाच्या माध्यमातून जाणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी प्रचंड खर्च करण्यात आला आहे. आणि म्हणूनच हा चित्रपट कोणत्याही स्थितीत फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित झाला पाहिजे. त्यातील लेझीम दृश्य या चित्रपटातून काढून टाकले तरी एकूण चित्रपटावर त्याचा फारसा परिणाम होईल असे दिसत नाही. त्यामुळे या दृश्याशिवाय चित्रपट प्रदर्शित झाला पाहिजे किंवा या चित्रपटातील लेझीम दृश्य का असले पाहिजे याचा समाधानकारक खुलासा संबंधितांनी केला पाहिजे.

संजय लीला भन्साळी यांचा पद्मावती अर्थात राणी पद्मिनी तिच्या त्यागावर आधारित भव्य दिव्य चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या(film) नावावर राजस्थान मधील कर्मठ संघटनेने आक्षेप घेतला होता. इतकेच नाही तर या चित्रपटाचे चित्रीकरण पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या मसाई पठारावर केले जात असताना राजस्थान मधून आलेल्या एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चित्रीकरणासाठी लावण्यात आलेला सेट जाळून टाकला होता. त्यानंतर या चित्रपटाचे नाव पद्मावत असे करण्यात आले आणि तो मग प्रदर्शित करण्यात आला.

हमारे चाळीस वर्षांपूर्वी विजय तेंडुलकर लिखित आणि जब्बार पटेल दिग्दर्शित घाशीराम कोतवाल नावाचे नाटक रंगभूमीवर आणले होते. या नाटकात पेशव्यांच्या संदर्भात काही भाष्य केले होते म्हणून या चित्रपटावर तेव्हा बंदी घालण्यात आली होती. एकूणच इतिहासाशी संबंधित असलेल्या चित्रपटांना(film), ते प्रदर्शित होण्यापूर्वी विरोध झालेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेल्या” छावा”या भव्य दिव्य चित्रपटाला विरोध होऊ लागला आहे.

हेही वाचा :

गुइलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांसाठी अजित पवारांची मोठी घोषणा!

थोडीशी हुशारी पडू शकते महागात! 2 वर्षांसाठी बोर्ड परीक्षा होईल बंद

Champions Trophy च्या आधी रोहित शर्मा पुन्हा ब्रेकवर, घेतला धक्कादायक निर्णय