पहाट शपथविधीचे भूत हळूहळू उतरते आहे….

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : बारामती लोकसभा मतदारसंघातील(political consulting firms), सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या ननंद भावजयीमधील लढत हळूहळू रंगतदार बनत चालली आहे. महाराष्ट्रातील ही लढत हाय व्होल्टेज ठरणार आहे. दोन्ही बाजूंनी प्रचाराचा धुरळा उडवला जात असतानाच, अजित दादा पवार यांनी पहाटेच्या शपथविधी बद्दल पहिल्यांदाच तोंड उघडले असून, संपूर्ण घटनाक्रम त्यांनी महाराष्ट्रासमोर आणलेला आहे. त्यावर आता पुन्हा खुलासे होतील, पण पहाटेच्या शपथविधीचे महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेले भूत हळूहळू उतरत चालले आहे.

2019 मध्ये विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर(political consulting firms) राज्यात त्रिशंकू राजकीय अवस्था निर्माण झाली होती. एक दिवस अचानक राजभवनामध्ये तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांना शपथ दिली. वास्तविक हा शपथविधी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान झाला होता पण तो फारच सकाळी झाला असल्यामुळे त्याला पहाटेचा शपथविधी म्हणून आजही ओळखले जाते. त्या शपथविधी बद्दलचा पहिला गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. हा शपथविधी शरद पवार यांच्या सहमतीने झाला असल्याचा खुलासा तेव्हा त्यांनी केला होता. अर्थातच शरद पवार यांनी असे काही घडलेच नाही अशी राजकीय भूमिका घेतली.

नंतर कालांतराने त्यांनी या पहाटेच्या शपथविधीबद्दल भाष्य केले होते. आपणाला हा शपथविधी माहीत होता अशी त्यांनी कबुली दिली होती. त्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार हे किती खोटे बोलतात याबद्दल पुरावा म्हणून पुन्हा पहाटेच्या शपथविधीचाच विषय हाती घेतला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्यावर विनाकारण आरोप केले जात असल्याचा खुलासा करून पुन्हा हे आम्हाला काही माहीतच नव्हते असे स्पष्ट केले होते.

पहाटेच्या शपथविधी बद्दल राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यापासून ते देवेंद्र फडणवीस व शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी खुलासे प्रत्येक खुलासे केले होते पण ज्यांच्या भोवती ही चर्चा फिरत होती ते अजितदादा पवार याबद्दल काहीही बोलावयास तयार नव्हते. मीडियासमोर ते हा विषय खुबीने टाळत होते. शुक्रवारी मात्र त्यांनी पहिल्यांदाच पहाटेच्या शपथविधीचा घटनाक्रम उघड केला.

2019 मध्ये कोणत्याही एका पक्षाला विधानसभेत सरकार बनवण्यासाठी बहुमत मिळालेले नव्हते. तथापि सरकार बनवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अन्य काही नेते, आणि शरद पवार, प्रफुल्ल पटेल, आमचे अन्य काही नेते यांच्यात सरकार बनवण्याच्या संदर्भात पाच ते सहा बैठका झाल्या होत्या. या बैठकीत मंत्री मंडळाच्या बद्दल सविस्तर चर्चा झाली होती. भारतीय जनता पक्षाला किती मंत्रिपदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला किती मंत्री पदे हे सारे काही ठरले होते. अमित शहा यांनी मला बोलावून आता शब्द फिरवू नका असे निक्षून सांगितले होते. पण ऐनवेळी शरद पवार यांनी माघार घेतली पण मी मात्र शब्दाचा पक्का असल्यामुळे पहाटेच्या शपथविधीला खरे तर सकाळी आठ वाजता झालेल्या शपथविधीला मी गेलो होतो. असा तपशीलवार खुलासा अजितदादा पवार यांनी शुक्रवारी केला आहे. त्यांनी सर्व खापर शरद पवार यांच्या माथ्यावर फोडलेले आहे.

गेल्या अडीच तीन वर्षांपासून पहाटेच्या शपथविधी बद्दल खुलासे आणि प्रत्येक खुलासे दोन्ही बाजूने केले जात आहेत पण महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेले शपथविधीचे भूत काही उतरावयास तयार नव्हते. आता मात्र अजित दादा पवार यांनी पहिल्यांदाच तोंड उघडून त्याचे सर्व तपशील जाहीर केले आहेत. याबद्दल माहिती देण्यासाठी त्यांनी लोकसभा निवडणुकीचे
निमित्त शोधले आहे. वास्तविक हा खुलासा त्यांना आधीही करता आला असता पण बारामती लोकसभा मतदारसंघात पहाटेच्या शपथविधीचा विषय वारंवार चघळला जाणार हे लक्षात आल्यामुळे अजित दादा पवार यांनी प्रचाराचा एक भाग म्हणून खुलासा केलेला दिसतो. त्यात त्यांनी शरद पवार हे ऐनवेळी कसे माघार घेतात, त्यांचा भाजप विरोध हा तकलादू आहे असे अजित दादा पवार यांनी या निमित्ताने सुचित केले आहे.

अजितदादा पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या खुलासानंतर महाराष्ट्रात फार अशी काही खळबळ उडाली नाही कारण हा विषय सर्वसामान्य जनतेला नेमकेपणाने समजलेला आहे. अजितदादा यांनी हे तपशील आत्ताच उघड करण्याचे कारण काय? हा विषय गाजत असताना त्यांना हे तपशील जाहीर करता आले असते अशी चर्चा आता सुरू झाली आहे. आता यावर सुद्धा शरद पवार यांच्याकडून खुलासे होतील. शपथविधीचे भूत हे केव्हा पूर्णपणे उतरेल हे सांगता येणार नसले तरी ते महाराष्ट्राच्या मानगुटीवरून हळूहळू उतरू लागले आहे.

हेही वाचा :

महाराष्ट्रात खळबळ! टॉयलेटमध्ये घुसून महिला वकिलाचा विनयभंग

भारतीय रेल्वेच्या विक्रम; यंदा ९१११ उन्हाळी विशेष ट्रेन!

पहाटेच्या शपथविधीबाबतचा अजितदादांचा दावा पवारांनी फेटाळला; भाजपसोबत जाण्याची इच्छा…