राजकारणातले अतृप्त आत्मे

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : शरद पवार हे केंद्रात मंत्री होते आणि मी गुजरातचा मुख्यमंत्री(souls) होतो. अनेकदा त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी मी त्यांना नवी दिल्लीत भेटायचो. असे शरद पवार यांच्या नागरी सत्कार समारंभात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून जाहीरपणे कौतुक करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना शरद पवार हे अतृप्त आत्मा असल्याचा साक्षात्कार झाला आणि तोही पुणे मुक्कामी. तर अशा या अतृप्त आत्म्याला, राज्य अस्थिर करणाऱ्याला पद्मविभूषण हा नागरिक पुरस्कार जाहीर झाला तेव्हा अभिनंदन करणारे नरेंद्र मोदीच होते. एकाच व्यक्तीत त्यांना गुरुही दिसतो आणि अतृप्त आत्माही दिसतो. हे कसे काय असा भामक सवाल कुणी उपस्थित करू नये. कारण निवडणूक प्रचारात साधं काही क्षम्य असते आणि आहे.

नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना शरद पवार(souls) यांच्या जाहीर नागरी सत्कार समारंभास प्रमुख अतिथी म्हणून बोलावले होते. पुणे येथे झालेल्या या समारंभात नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना शरद पवार हे केंद्रात मंत्री होते. मी त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी अनेकदा त्यांना दिल्लीत भेटायचो. असे सांगून त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार हे आपले गुरु असल्याचे स्पष्ट केले होते. आता याच पुण्यात सोमवारी निवडणूक प्रचार सभेत बोलताना त्यांनी शरद पवार यांचे नाव घेतले नाही पण त्यांच्यावर सडकून टीका केली. ते अतृप्त आत्मा आहेत. महाराष्ट्र अस्थिर केला आणि आता ते देश अस्थिर करायला निघाले आहेत अशा शब्दात त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

शरद पवार यांना पद्मविभूषण हा नागरी पुरस्कार केंद्र शासनाने जाहीर केला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे खास अभिनंदन केले होते. जे शरद पवार त्यांना गुरु वाटत होते, ज्या शरद पवारांना पद्मविभूषण पुरस्कार दिला गेला ते शरद पवार अतृप्त आत्मा कसे काय?

2014 मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या सरकारला बाहेरून बिनशर्थ पाठिंबा देणारे शरद पवार कसे काय चालले? ते अतृप्त आत्मा असतील तर त्यांना एन डी ए मध्ये येण्यासाठी अप्रत्यक्षपणे रेड कार्पेट कसे काय घातले गेले होते? अजित दादा पवार, प्रफुल्ल पटेल आदी नेते शरद पवार यांना एन डी ए मध्ये येण्यासाठी गळ का घालत होते? कुणाच्या सांगण्यावरून वारंवार आग्रह धरत होते?

तसं पाहायला गेले तर महाराष्ट्रातील राजकारणात बऱ्याच नेत्यांना अतृप्त आत्मे म्हटले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा मुख्यमंत्री व्हावयाचे होते. तसे ते 82 तासांचे मुख्यमंत्री झाले सुद्धा होते. नंतर मात्र फासे उलटे पडले. तेव्हापासून देवेंद्र फडणवीस हे अतृप्त राजकारणी म्हणून वावरत होते. नंतर संधी येऊनही एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. तेव्हापासून ते सुद्धा अतृप्त आपल्यासारखेच महाराष्ट्रात वावरताना दिसतात.

अजितदादा पवार यांना सुद्धा मुख्यमंत्री पद मिळण्याची संधी आलेली असताना शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिले. तेव्हापासून अजितदादा पवार हे सुद्धा अतृप्त आत्म्यासारखेच राजकारणात वावरत होते. काही वर्षांपूर्वी छगन भुजबळ हे नरेंद्र मोदी यांची नक्कल करायचे. त्यांच्यावर जहाल टीका करायचे. महाराष्ट्र सदन मधील भूत त्यांच्या मानगुटीवर बसले. आणि त्यांना साक्षात्कार झाला. आता ते तोंड फाटेपर्यंत नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करत असतात. त्यांनाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळाले नाही म्हणून त्यांचा आत्मा आजही अतृप्त आहे.

शरद पवार यांचे वय 84 आहे. पण ते स्वतःला राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा समजतात. राजकारणात सहा दशके वावरूनही, सत्तेत आणि सत्तेच्या वर्तुळात राहूनही त्यांचे मन तृप्त झालेले नाही. म्हणजे ते या वयातही अतृप्त आहेत. म्हणजे ते अतृप्त आत्मा आहेत असे दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच बोलत असतील, तर ते मान्य करायचे काय? हा प्रश्न तुम्ही तुमच्या आत्म्यालाच विचारलेला बरा!

हेही वाचा :

सांगली : ‘जयंत पाटील काड्या करण्यात आणि…’; माजी आमदाराची टीका

धोनीसोबत प्रेम म्हणजे नावावर भलामोठा डाग..! का केले या अभिनेत्रीने धोनीवर इतके मोठे आरोप?

इचलकरंजीत उद्या उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात याची जाहीर सभा