कोल्हापूर : जिल्ह्यात लोकसभेसाठी चुरशीने मतदान झाले. यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील(Voter) चंदगड, करवीर या विधानसभा मतदारसंघांत २०१९ च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढली; तर हातकणंगले मतदारसंघातील शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ, इस्लामपूर या विधानसभा मतदारसंघांची टक्केवारी पूर्वीच्या तुलनेत वाढली. हे वाढलेले मतदान कोणाला विजयाचा हात देणार आणि वाढीव मतांचा धक्का कोणाला बसणार, हे मात्र निकालानंतरच समजेल.
जिल्ह्यातील लोकसभेची निवडणूक नेहमीच चुरशीची आणि लक्षवेधी ठरते. यंदाही साऱ्या राज्याचे लक्ष कोल्हापूरकडे लागले होते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात(Voter) काँग्रेसचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि शिवसेनेचे संजय मंडलिक अशी थेट लढत होती; तर हातकणंगलेमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सत्यजित पाटील, शिवसेनेचे धैर्यशील माने आणि स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी अशी तिरंगी लढत होती.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात चंदगड विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या तुलनेत तीन टक्के मतदान वाढले आहे, तर करवीरमध्ये ४.२६ टक्क्यांची वाढ आहे. करवीरमध्ये काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील या तिघांचेही गट आहेत. त्यामुळे गत निवडणुकीच्या तुलनेत वाढलेली चार टक्के मते कोणाच्या गटाची आहेत, यावर विजयाची समीकरणे अवलंबून आहेत. चंदगड विधानसभा मतदारसंघात भाजपचे शिवाजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार राजेश पाटील, माजी आमदार भरमू पाटील यांचे गट मोठे असून, हे महायुतीच्या बाजूने आहेत.
तसेच माजी आमदार बाबासाहेब कुपेकर यांचा गटही येथे मजबूत असून, सध्या नंदिनी बाभूळकर या गटाचे नेतृत्व करतात. त्या महाविकास आघाडीकडून निवडणुकीत सक्रिय आहेत. त्यामुळे येथेही वाढलेली मते कोणाच्या गटाची आहेत, त्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात गेल्या लोकसभेच्या तुलनेत पाच टक्के मते वाढलेली आहेत. आमदार सत्यजित पाटील यांच्या रूपाने बऱ्याच वर्षांनंतर तालुक्याला स्थानिक उमेदवार मिळाला आहे. त्यामुळे हे मतदान वाढले आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.
हातकणंगलेमध्ये १.३२ टक्क्यांची वाढ आहे. शिरोळमध्ये १.६०, तर इस्लामपूरमध्ये ३.४३ टक्के वाढ आहे. येथेही वाढीव मतदान कोणाला झाले, यावर गुलाल कोणाच्या वाट्याला येणार, हे निश्चित होईल. एकूण राजकीय वर्तुळात वाढलेली मते हा चर्चेचा विषय असून, वाढलेली मते आमचीच, असा दावा सर्व पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत. प्रत्यक्षात या प्रश्नाचे उत्तर निकालानंतरच लक्षात येईल.
हेही वाचा :
‘क्या कूल हैं हम’ चित्रपटाचे दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन
महागाईचा भडका! तुरीच्या डाळीत 30 टक्के तर उडदाच्या डाळीत 15 टक्क्यांची वाढ