कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : 18 व्या लोकसभेसाठी मंगळवारी 12 राज्य व केंद्रशासित प्रदेश(voters) येथील 93 लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. आसाम मध्ये सर्वात जास्त म्हणजे 70 टक्क्यापेक्षा अधिक मतदान झाले. महाराष्ट्रात 61.44% मतदान झाले. मतदानाच्या एकूण टक्केवारीवरून या देशातील मतदार मतदान करण्या इतका शहाणा झालेला नाही असे खेदाने म्हणावे लागेल. असे शहाणे मतदार हे कायम लोकशाहीचा उदो उदो करत असतात.
कायम लोकशाहीवर बोलत असतात. निवडणूक(voters) प्रक्रियेवर आपले मत नोंदवत असतात. आपले लोकप्रतिनिधी कसे असले पाहिजेत, आणि कसे नसले पाहिजेत यावर ते आपले मत व्यक्त करत असतात. आणि मतदानाच्या दिवशी हेच शहाणे मतदार मतदानचा हक्क बजावण्यासाठी एक तर घरातून बाहेर पडत नाहीत आणि पडले तर पर्यटनासाठी बाहेरगावी निघून जातात.
अहमदाबाद येथील अंकित सोनी या मतदाराचे दोन्ही हात एका अपघातात निकामी झालेले आहेत. पण त्यांनी मंगळवारी मतदान केंद्रावर जाऊन पायाने मतदान केले. अशा कितीतरी दिव्यांग व्यक्तींनी, उदाहरणच द्यायचे झाले तर साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित केल्या गेलेल्या कोल्हापूरच्या सोनाली नवांगुळ यांनी त्या दिव्यांग असल्यामुळे व्हील चेअरवरुन येऊन मतदान केले. 75 ते 100 या वयोगटातील वृद्धांनी तरुणांना लाजवेल इतक्या उत्साहाने मतदान केंद्रावर येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला. कोल्हापुरात महादेव सुतार या वृद्ध व्यक्तीचा मतदारांच्या रांगेत मतदानासाठी उभे असतानाच हृदय विकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू झाला.
देशातील कोणत्याही राज्यात कोणत्याही लोकसभा मतदारसंघात 80 टक्के मतदान झालेले नाही. महाराष्ट्राचा टक्का तर पार खाली घसरला आहे. ज्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला नाही अशा मतदारांच्या बद्दल आता गांभीर्याने निवडणूक आयोगाने विचार केला पाहिजे. या निवडणुकीत 70 वयोगटाच्या वरील वृद्धांना घरीच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. अंथरुणाला खिळून असलेले मतदार, अपरिहार्य कारणामुळे परगावी गेलेले मतदार, किंवा तत्सम कारणामुळे मतदान करू न शकलेले मतदार यांचा अपवाद केला तरी किमान 20% मतदारांनी मतदानासाठी बाहेर येणे आवश्यक होते. पण ही शहाणी मंडळी मतदानासाठी पुढे आलेली नाहीत.
मतदान(voters) करणाऱ्याला शासन यंत्रणे कडून मतदान केल्याबद्दल चे अधिकृत दाखले देण्यात यावेत. शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ घेताना, तसेच शिधापत्रिका वितरित करताना, आधार कार्ड देताना, पॅन कार्ड वितरित करताना, संबंधिताने मतदान केले चा दाखला दाखवला पाहिजे असा नियम केला तर मतदानापासून कोणीही अलिप्त राहणार नाही. ज्यांच्याकडे मतदान केल्याचा दाखला नाही त्याला कोणत्याच प्रकारच्या शासकीय सोयी सुविधा द्यायच्या नाहीत. असे केल्याशिवाय इथला मतदान न करणारा शहाणा मतदार सुजाण होणार नाही.
मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली असते. या सुट्टीच्या आधी आणि नंतर रजा टाकून पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यांच्या पगारात कपात करावी. त्याची एक वेतन वृद्धी थांबवण्यात यावी.
अशा कितीतरी उपाययोजना निवडणूक आयोगाने केल्या पाहिजेत.
समाजातील सकारात्मक आणि नकारात्मक घटनांची नोंद घेणाऱ्या काही सामाजिक संस्था काम करत असतात. अशा या संस्थांनी ज्यांनी मतदान केलेले नाही अशा मतदारांच्या घरी जाऊन प्रातिनिधिक स्वरूपात त्यांचा गांधीगिरी स्टाईलने सत्कार करण्याचे एक अभियान सुरू करावे. दोन्ही हात नसल्याने पायाने मतदान करणारे अंकित सोनी, साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवणाऱ्या दिव्यांग साहित्यिका सोनाली नवांगुळ नव्वदी पार केलेल्या वृद्ध मतदार व्यक्ती यांचे मतदान करतानाचे फोटो पाहूनही त्याच्यापासून कोणताही बोध न घेणाऱ्या अशा मतदारांचे मतदान पत्रिकेवरील नाव काढून टाकण्याचे धाडस निवडणूक आयोगाने केले तरच मतदानाचा टक्का 90 च्या पुढे जाणार आहे.
हेही वाचा :
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; ‘या’ चार जिल्ह्यांत फेरमतदान होणार
रोहितसोबत कोण करणार ओपनिंग? कशी असणार भारताची प्लेईंग 11?