WhatsApp यूजर्संसाठी महत्त्वाची बातमी! 

जगातील सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप येण्याआधी तुम्हाला फोटो, व्हिडिओ ब्लूटूथच्या माध्यमातून पाठवावे लागत होते. पण व्हॉट्सॲप आल्यानंतर फोटो, व्हिडिओ पाठवण्याचे काम सोपे झाले. आता व्हॉट्सॲप लवकरच तुम्हाला इंटरनेट कनेक्शनशिवाय फोटो, व्हिडिओ, डॉक्यूमेंट्स आणि बऱ्याच काही फाइल्स शेअर करण्याची सुविधा उपलब्ध करून देऊ शकते. याबाबतची अपडेट WABetaInfo ने दिली आहे. WABetaInfo हे WhatsApp च्या आगामी फिचर्सचा मागोवा घेणारे प्लॅटफॉर्म आहे.

WhatsApp चे नवीन फिचर फाइल्स शेअर करण्यासाठी ब्लूटूथवर अवलंबून असेल. यूजर्संना केवळ सेटिंग्जमधून त्यांचे ब्लूटूथ सुरु करावे लागेल आणि फाइल्स स्थानिक पातळीवर शेअर कराव्या लागतील. या फाइल्सदेखील प्लॅटफॉर्मवरील इतर मजकुरांप्रमाणे एंड-टू-एंड एनक्रिप्टेड असतील.

WABetaInfo अहवालात शेअर करण्यात आलेल्या लीक स्क्रीनशॉट्समध्ये हे फिचर कार्य करण्यासाठी ॲपला Android वर आवश्यक नेमक्या कोणत्या परवानग्या लागत्यात हे दिसून येते. विशेष म्हणजे फाइल्स ऑफलाइन शेअर करण्यासाठी, तुम्ही ज्या डिव्हाइससह फाइल्स शेअर करत आहात त्या डिव्हाइसमध्येदेखील हे ऑफलाइन फाइल-शेअरिंग फिचर असणे आवश्यक आहे. व्हॉट्सॲपच्या आगामी अपडेटमध्ये हे फिचर उपलब्ध होण्याची शक्यता आहे.