रोहितने टी20 वर्ल्ड कप विजयानंतर का चाखलेली खेळपट्टीवरील माती?

भारतीय कर्णधार रोहित शर्माने आपल्या नेतृत्वाखाली टी-२० वर्ल्ड कप (t20 world cup)२०२४ जिंकण्याचा मान पटकावला. भारताने या निर्णायक सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि १७६ धावा केल्या याबदल्यात आफ्रिका संघ केवळ १६९ धावा करू शकला. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी आपापल्या पद्धतीने जल्लोष साजरा केला. रोहितनेही अनोखे सेलिब्रेशन केले त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विजेतेपद(t20 world cup) जिंकल्यानंतर रोहित शर्मा भावूक झाल्याचे दिसले होते. त्याने आनंदाच्या भरात खेळपट्टीवरील मातीचीही चव चाखल्याचे दिसले होते. त्याच्या या कृतीने अनेकांना टेनिसपटू नोवाक जोकोविचची आठवण करून दिली होती. जोकोविचही विम्बल्डन जिंकल्यानंतर मैदानातील गवताची चव चाखतो.

दरम्यान, रोहितने खेळपट्टीवरील माती का चाखली, याचा खुलासा केला आहे. त्याने म्हटले आहे की त्याने याबद्दल काही ठरवले नव्हते, जे केलं ते भावनेच्या आणि आनंदाच्या भरात त्याने केले. बीसीसीआयने रोहित शर्माच्या वर्ल्ड कप ट्रॉफीसोबतच्या फोटोशुटवेळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहितने जिंकल्यानंतरच्या भावना आणि त्याच्या माती चाखण्याबद्दल खुलासा केला आहे.

रोहित म्हणाला, ‘काहीच ठरवून केलं नव्हतं, ते जे मी केलं तर अचानक वाटलं म्हणून केलं.मी त्या क्षणाचा आनंद घेत होतो. कारण त्या खेळपट्टीने आम्हाला टी२० वर्ल्ड कप दिला. आम्ही या खेळपट्टीवर आणि या मैदानात खेळलो.’ ‘माझ्या हे मैदान आणि ही खेळपट्टी आयुष्यभरासाठी लक्षात राहिल. त्यामुळे मला माझ्याबरोबर त्याची आठवण न्यायची होती. ते क्षण खूप खूप खास होते. या ठिकाणी आमचं स्वप्न पूर्ण झालं. मला या क्षणाची आठवण हवी होती. हीच भावना त्या कृतीमागं होती.’

तसेच पुढे रोहित म्हणाला, ‘ती भावना खरंच अविस्मरणीय आहे. अजूनही आम्ही त्या भावना जगत आहोत. सामना संपल्यापासून ते आत्तापर्यंत, या खूप मस्त भावना आहेत. हे स्वप्नच असल्यासारखं वाटत आहे. जरी हे घडलं असलं, तरी त्यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. याचाच अनुभव येत आहे.’

‘आम्ही याबद्दल स्वप्न पाहिलं होतं, एक संघ म्हणून खूप दिवसांपासून मेहनत घेतली होती. आता खूप हायसं वाटत आहे, कारण जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी खूप मेहनत घेता आणि अखेरीस तुम्हाला ती मिळते, तेव्हा खूप खूप छान वाटतं.’

https://twitter.com/i/status/1807980113985757365

याशिवाय रोहितने असंही सांगितलं की खेळाडूंनी रात्री उशीरापर्यंत सेलीब्रेशन केलं, त्यामुळे झोपही नीट झालेली नाही. रोहित म्हणाला, ‘काल रात्री आम्ही चांगला वेळ घालवला. पहाटेपर्यंत टीममेट्सबरोबर सेलीब्रेशन केलं. त्यामुळे मी म्हणेल की माझी नीट झोप झालेली नाही, पण ठीक आहे. विजेतेपद जिंकल्यानंतर झोप न मिळणं ठिकच आहे. आता घरी जाऊन झोपण्यासाठी खूप वेळ आहे.’ दरम्यान, रोहित २००७ साली टी२० वर्ल्ड कप जिंकलेल्या भारतीय संघाचाही भाग होता. त्यामुळे दोन टी२० वर्ल्ड कप जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे.

हेही वाचा :

दाक्षिणात्य अभिनेता प्रभासला डेट करतेय दिशा पटानी?

दातांचे उपचारही होणार मोफत! राज्य सरकारची ‘ही’ योजना येईल कामी

न्याय मंदिर, न्याय देवता विद्या मंदिर, वगैरे वगैरे!