मुंबई इंडियन्स वाढदिवशी रोहितला विजयाची भेट देणार?

आयपीएलमध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्सचा(mumbai indians) सामना लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध खेळवला जाणार आहे.
रोहित शर्माचा ३० एप्रिल हा वाढदिवस. या दिवशी तरी आपल्या संघातील या महान खेळाडूला विजयाची भेट त्याचे मुंबई इंडियन्समधील सहकारी देणार का, याची उत्सुकता आहे.

पराभवाच्या खाईत हेलकावे खाणाऱ्या मुंबईला(mumbai indians) यंदाच्या आयपीएलमध्ये आव्हान कायम ठेवायचे असेल तर आज(३० एप्रिल) के.एल. राहुलच्या लखनौ सुपर जायंट्स संघाला पराभूत करावेच लागणार आहे.

दुसऱ्या बाजूला घरच्या मैदानावर खेळणाऱ्या लखनौला सहाव्या विजयाची आस लागली असून त्यांनाही प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी विजय आवश्‍यक आहे. लखनौचा कर्णधार के.एल. राहुलच्या फलंदाजी स्ट्राईकरेटवर चोहोबाजूंनी टीका होत असल्यामुळे त्याच्या फलंदाजीवरही लक्ष असणार आहे.
के.एल. राहुल लखनौसाठी सलामीला फलंदाजीला येतो. मात्र, पॉवरप्लेमध्येही त्याच्याकडून आक्रमक फटकेबाजी केली जात नाही. अर्थात त्याने १४४.२७च्या स्ट्राईकरेटने ३७८ धावा फटकावल्या आहेत; पण त्यांचा फलंदाजी स्ट्राईकरेट रिषभ पंत (१६०.६०) व संजू सॅमसन (१६१.०८) यांच्यापेक्षा कमी आहे.

त्यामुळे भविष्यात त्याला यष्टिरक्षक व फलंदाज म्हणून भारतीय संघात प्रवेश करावयाचा असल्यास फलंदाजी स्ट्राईकरेट सुधारावा लागणार आहे.

गोलंदाजी विभाग कमकुवत
मुंबईच्या संघाला यंदाच्या मोसमात सपाटून मार खावा लागला आहे. जसप्रीत बुमरावगळता मुंबईच्या गोलंदाजांना ठसा उमटवता आलेला नाही. दिल्लीच्या जेक फ्रेसर मॅकगर्क याने बुमराच्या गोलंदाजीवरही आक्रमण केले होते.

मुंबईच्या संघाला यामधून बाहेर यावे लागणार आहे. जेराल्ड कोएत्झी, हार्दिक पंड्या, आकाश मधवाल, पियूष चावला, मोहम्मद नबी, रोमारिओ शेफर्ड यांना गोलंदाजीत कमालीची सुधारणा करावी लागणार आहे.


विश्‍वकरंडकाआधी फॉर्मची गरज
रोहित शर्मा (३११ धावा) व सूर्यकुमार यादव (१६६ धावा) यांनी मुंबईसाठी समाधानकारक फलंदाजी केली आहे; पण आयपीएलमधील उर्वरित लढतींमध्ये त्यांच्याकडून आणखी चांगल्या फलंदाजीची अपेक्षा आहे.

जून महिन्यात वेस्ट इंडीज व अमेरिका येथे होत असलेल्या टी-२० विश्‍वकरंडकाआधी दोघांनी फॉर्ममध्ये येण्याची नितांत गरज आहे. असे झाल्यास भारतीय संघासाठी ही आनंदाची बाब असणार आहे.

ईशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, रोमारिओ शेफर्ड व हार्दिक पंड्या यांनीही कात टाकायला हवी. अर्थात आतापर्यंत तिलक वगळता इतरांना सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही.

हेही वाचा :

हातकणंगले लढाई सोपी नाही…धैर्यशील मानेंच्या गावातच मत विभाजन

कदमबांडे यांना आत्ता येण्याची वेळ का आली? सतेज पाटलांनी थेट सांगितले…

“इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं”; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा