पुण्याला काहीच नाही उणे! ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभेत ‘गॅरंटी’

पुण्यातील लोक बुद्धिमान आहेत. गेल्या दहा वर्षांत पुण्याचे रूप बदलत आहे. मेट्रो(metro ride), विमानतळाचे विस्तारीकरण, प्रशस्त पालखी मार्ग तसेच समृद्धी महामार्ग, वंदे भारत रेल्वे, अशी सर्व आधुनिक भारताची प्रतिमा पुण्यात दिसत आहे.


पुणे : “पुण्यातील लोक बुद्धिमान आहेत. गेल्या दहा वर्षांत पुण्याचे रूप बदलत आहे. मेट्रो(metro ride), विमानतळाचे विस्तारीकरण, प्रशस्त पालखी मार्ग तसेच समृद्धी महामार्ग, वंदे भारत रेल्वे, अशी सर्व आधुनिक भारताची प्रतिमा पुण्यात दिसत आहे. पुणेकरांनो, तुम्ही लिहून घ्या, महाराष्ट्राला ही मोदीची गॅरंटी आहे की, तुम्ही देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास करणार,” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची गॅरंटी सोमवारी पुन्हा एकदा अधोरेखित केली.

मोदी यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या उल्लेखाने केली. पुण्याने अनेक सुधारक देशाला दिले आहेत. आज ही भूमी जगाला चांगले शास्त्रज्ञ, उद्योजक देत आहे. पुणे जितके प्राचीन, तितकेच भविष्याचा वेध घेणारे शहर आहे. पुण्यात प्रत्येक क्षेत्राचे तज्ज्ञ आहेत. त्यामुळेच ‘पुणे तिथे काय उणे’, असे म्हणत त्यांनी पुण्याची महती विशद गेली.

महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार, शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पुण्यातील रेसकोर्सवर आयोजित सभेत मोदी बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार मेधा कुलकर्णी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्यासह शहर भाजपचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
मोदी म्हणाले, “केंद्र सरकारच्या नवीन धोरणाचा थेट परिणाम पुण्यासारख्या शहरातील महत्त्वाकांक्षी तरुणांवर होत आहे. मॅपिंगच्या क्षेत्रात तरुण आघाडीवर आहेत. अवकाश संशोधन, संरक्षण साहित्याचे उत्पादन, संशोधन विभाग, नावीन्यपूर्ण उद्योग अशा विविध क्षेत्रांत पुणे प्रगती करत आहे. पुण्यात बुद्धिमान तरुण आहेत, त्यामुळे केंद्राने नवनिर्मितीला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात एक लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या तरुणांना ती डोळे झाकून देण्याचा निर्णय घेतला आहे.”

पुणे हे वाहन उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. दहा वर्षांपूर्वी भारतात मोबाईल आयात करावे लागायचे. पण भारत आज जगातला दुसरा सर्वांत मोठा निर्यातदार देश आहे. पुण्यात उत्पादित झालेल्या ‘मेड इन इंडिया’ चिपवर जगातील गाड्या धावताना दिसतील. भारतात हायड्रोजन हब बनविण्याचा संकल्प आहे. सर्वसामान्य नागरिकांचा विचार करणारे हे आमचे सरकार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोफत उपचार

“केंद्रात काँग्रेसप्रणीत आघाडीचे सरकार असताना महागाई आणि भ्रष्टाचार असे दुहेरी कर जनतेला भरावे लागत होते,” अशा शब्दांत मोदी यांनी विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले, “सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही महागाई नियंत्रणात आणली. भ्रष्टाचारमुक्त सरकार दिले. आयकराची मर्यादा वाढविली. आता वयाची ७० वर्षे ओलांडलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मोफत उपचार मिळतील, ही ‘मोदींची गँरेटी’ आहे.”

हेही वाचा :

बंडखोर विशाल पाटलांवर कारवाई होणार की नाही? काँग्रेस नेते म्हणाले तरी काय??

‘या’ वर्षी भाजप आरक्षण संपवणार! मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा

‘… दिशाभूल करू नका’, संजय मंडलिकांचे शाहू महाराजांना खुल्या चर्चेचे आवाहन

“तीन जागांसाठी तीन महिने गेले त्यात सांगली,…”; विश्वजित कदमांच्या रुद्रावतारावर बाळासाहेब थोरातांचा शांत उतारा!