सांगलीतील काँग्रेस नेते शिवसेनेच्या चंद्रहार पाटलांच्या प्रचारात उतरणार का?

सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे(leader) तिरंगी लढत होणार आहे. महायुतीकडून भाजपचे खासदार संजय पाटील, महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे चंद्रहार पाटील, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, ओबीसी बहुजन पार्टीचे प्रकाश शेंडगे हे रिंगणात आहेत. त्यामुळे पुढचे दोन आठवडे प्रचाराचा नुसता धुराळा उडणार आहे. यानिमित्ताने राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेते मतदारसंघात प्रचारासाठी उतरण्याची शक्यता आहे.

सांगली लोकसभेसाठी येत्या सात मे रोजी मतदान(leader) होणार आहे. तोवर उमेदवारांना प्रचारासाठी १४ दिवसांचा कालावधी मिळणार आहे. मात्र, संजय पाटील, चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील यांनी यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली आहे. या तिघांनीही बैठका आणि भेटीगाठींवर भर दिलेला आहे. आगामी पंधरा दिवसांत मात्र राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर नेते प्रचार सभांचा फड गाजवणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संजय पाचाटील यांच्यासाठी सांगलीत सभा होणार होती. मात्र, मोदींची सभा कराडला घेण्याचे ठरले आहे. त्यामुळे मोदींची सांगलीत सभा होण्याची शक्यता मावळली आहे. नरेंद्र मोदी यांची वेळ मिळणार नसेल तर किमान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा घेतली जाऊ शकते.

शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीत एक सभा घेतली आहे. आता पुन्हा एकदा ते सांगलीत येण्याची शक्यता आहे. तसेच, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा रोड शो होणार आहे. सांगलीत संजय राऊतांनी दोन-चार दिवस तळ ठोकून आढावा घेतला होता. यासोबत राष्ट्रवादीचे शरद पवार, जयंत पाटील हे सांगलीत काय प्रचारयंत्रणा राबवितात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यामुळे सांगलीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीत एकत्र असलेले काँग्रेसचे नेते चंद्रहार पाटील यांच्यासाठी प्रचारात उतरणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनाही सांगली आणण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न राहण्याची शक्यता आहे. मात्र, विश्वजित कदम आणि विक्रम सावंत हे काँग्रेसचे दोन आमदार काय भूमिका घेतात, हे पाहावे लागणार आहे.

अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच, दुसरे एक काँग्रेसचे बंडखोर आमदार सत्यजित तांबे यांनीही विशाल यांना पाठिंबा दिला आहे, त्यामुळे हे दोन्ही नेते विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी सांगलीत येणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा :

शिराळा पुन्हा राजू शेट्टींना भरभक्कम साथ देणार का?; ‘स्वाभिमानी’वरच सर्व भिस्त

कोल्हापुरात दुरंगी, तर हातकणंगलेत चौरंगी लढत; हे उमेदवार असणार रिंगणात

पंतप्रधान मोदींची 28 एप्रिलला कोल्हापुरात सभा, तपोवनात येणार भगवं वादळ !