कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांनी लोकसभा(reaction) निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करून दोन आठवडे उलटून गेले. त्याच्याही आधी दोन महिन्यांपासून सत्तेत असलेली महायुती आणि विरोधात असलेली महाविकास आघाडी यांच्यामध्ये जागा वाटपांच्या बैठका स्वतंत्रपणे सुरू आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत आणि त्या कुणाला किती? हा प्रश्न सोडवताना दोन्ही ठिकाणच्या नेत्यांना नाकी नव येत असतील तर विधानसभेच्या 288 जागांची निरगाठ कशी सोडवली जाणार? आणखी चार सहा महिन्यानंतर महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची, लोकसभा निवडणूक ही रंगीत तालीम आहे किंवा तिचा टिझर आहे असे म्हटले तरी यापेक्षा” कालचा गोंधळ बरा होता”असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्य मतदारांवर येणार आहे किंवा आली सुद्धा आहे.
गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राचे(reaction) राजकारण पूर्णपणे बदलले आहे. आणि त्यामुळे राजकारणाचे संदर्भ आणि समीकरणे एका वेगळ्याच अनोख्या वळणावर येऊन थबकली आहेत. सध्याच्या लोकसभा निवडणूक पार पडल्यावर महाराष्ट्राचे राजकारण कोणता स्थर गाठेल याचा अंदाज आता बांधणे कठीण आहे. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं होईल हा अनुभव आम जनतेने गेल्या काही वर्षात घेतला आहे. ज्या शिवसेनेला मुख्यमंत्री पद द्यायचं नाही असा अजेंडा राबवून राजकीय पक्षांमध्ये उलथापालथ घडवून आणणाऱ्या भारतीय जनता पक्षांनी नकळतपणे किंवा कळत असूनही पाच वर्षे मुख्यमंत्री पद शिवसेनेला दिले आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने देऊन शिवसेना हा त्यांचाच अधिकृत पक्ष असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आजही महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे.
भारतीय जनता पक्षांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांचे चार पक्ष केल्यानंतर राजकारणच बदललं. आज जागा वाटपाचा जो प्रश्न कठीण होऊन बसला आहे त्याचे मूळच बदललेल्या राजकारणात आहे. देशात एनडीए च सरकार पुन्हा आले पाहिजे आणि नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले पाहिजेत याचसाठी महाराष्ट्रातील भाजप प्रणित खासदारांची संख्या त्यांना वाढवायची आहे आणि मग त्यासाठी”काय पण”अशी टोकाची भूमिका भाजपाने घेतली आहे. त्यासाठी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर जे राजकीय स्क्रिप्ट लिहिण्यात आले त्याप्रमाणे सगळे घडत गेले आहे. या स्क्रिप्ट मध्ये पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री असा ऐनवेळी बदल करण्यात आला आहे इतकेच.
भारतीय जनता पक्षांने ठरवून, नियोजनपूर्वक महाराष्ट्राच्या राजकारणात सामान्य माणसाचा राजकीय पक्षांवरील विश्वासच उडून जावा इतका विलक्षण बदल घडवून आणला आहे. भाजपच्या या राज नीतीमुळे महाभारतातील कुरुक्षेत्राची आठवण यावी. श्रीकृष्णाने, स्वतःचेच सैन्य स्वतःच्याच विरोधात रणांगणात आणले होते. तर अर्जुनाला शत्रू पक्षात स्वतःचेच नातेवाईक दिसत होते. म्हणजे कोण कोणाच्या बाजूने आहे आणि कोण कोणाच्या विरोधात उभा आहे हेच कळत नव्हते.
आजच्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीच्या रणांगणावर कोण कोणाच्या विरुद्ध आहे आणि कोण कोणाच्या बाजूने आहे हे सामान्य मतदारालाही समजण्यास कठीण जात आहे. लोकसभा निवडणुकीच समोर दिसणारे कुरुक्षेत्र आहे, या कुरुक्षेत्रावर काय घडतंय याचं समग्र दर्शन घडवणारा दिव्यदृष्टी असणारा संजय म्हणजे दूरदर्शन संच घरोघरी आहे. या छोट्या पडद्यावरील सर्वच वृत्तवाहिन्यांवर अधून मधून किंवा रोजच संजय राऊत, संजय शिरसाट, संजय राठोड, संजय निरुपम
असे कितीतरी संजय दिसतात पण ते सारेच जण कधीतरी आणि केव्हातरी “संजय ऐवजी संशय”वाटू लागतात. तर असं हे महाराष्ट्राचं राजकारण आहे.
हेही वाचा :
मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी; मिस्टर ३६० सूर्या झाला फिट
सांगलीतील 80 गावे टंचाईग्रस्त, 73 टँकरने पाणीपुरवठा
काँग्रेसला मोठा धक्का! गौरव वल्लभ यांनी दिला पक्षाचा राजीनामा