कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
.देशातील लक्षावधी विद्यार्थ्यांच्या महत्त्वकांक्षेला सुरुंग लावणाऱ्या, तीट लावणाऱ्या “नीट”परीक्षा घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी गेल्या 18 दिवसांपासून नवी दिल्ली येथील जंतर मंतर रोडवर सोनम वांगचुक यांचे उपोषण आंदोलन सुरू आहे. युवा वर्गाचे मोठे समर्थन मिळत असलेले उपोषण आंदोलन बे दखल करणे ही बाब अतिशय गंभीर आहे. (movement) त्यातून केंद्र शासनाची असंवेदनशीलता प्रकर्षाने दिसून येते आहे.

आमिर खान यांचा “थ्री इडीयट्स”चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रचंड गाजला होता. या चित्रपटातील फुंसुख वांगडू ही व्यक्तिरेखा सोनम वांगचुक यांच्यावर प्रेरित होती. सोनम वांगचुक हे लडाखचे रहिवासी असून ते अभियंता आहेत, शिक्षण सुधारक आहेत आणि पर्यावरणवादी आहेत. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणानंतर देशभर खळबळ उडाली होती. पेपर फुटी मुळे परीक्षा रद्द करण्यात आली होती. 26 लाख विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत होते. परीक्षाच रद्द केल्यामुळे वैफल्यग्रस्त बनलेल्या काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. या पेपर फुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी अर्थातच केंद्रीय शिक्षण मंत्रालयावर येते. (movement) आणि म्हणूनच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी तो दिला नाही तर पंतप्रधानांनी तो राजीनामा घेतला पाहिजे ही भूमिका घेऊन सोनम वांगचुक यांनी दिल्लीच्या जंतरमंतर रोडवर गेल्या 18 दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. गुरुवारी त्यांच्या उपोषणाचा 19 वा दिवस होता. त्यांच्या या आंदोलनाला हळूहळू युवा वर्गातून समर्थन मिळत गेले आणि आज त्यांचे उपोषण हा राष्ट्रीय विषय बनला आहे. गुरुवारी मुंबईतही युवकांनी आंदोलन करून वांगचुक यांना समर्थन दिले आहे.
महाराष्ट्रातील आणि देशातील काही नेत्यांनी वांगचुक यांच्या उपोषणाची गांभीर्याने दखल घेतली असून केंद्र शासनाने धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी केली आहे.एका भीषण रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्कालीन रेल्वेमंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हाची नैतिकता आणि संवेदनशीलता आता इतिहास जमा झाली आहे.आणि सध्याच्या पेपर फुटी प्रकरणातून ते सिद्धही झाले आहे. अन्यथा नैतिक जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा केव्हाच राजीनामा दिला असता.धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला तर देशातील शैक्षणिक क्षेत्र शुद्ध होईल, घोटाळ्यातून मुक्त होईल, नीट परीक्षा इथून पुढच्या काळात पेपर न फुटता सुरळीत पार पडतील असे नाही. पण तरीही शिक्षण मंत्र्यांच्या राजीनामामुळे काही गोष्टी नैतिक पातळीवर स्पष्ट होतील. केंद्राने हे पेपर फुटी प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतलेले आहे, इथून पुढे अशा घटना होणार नाहीत याची अगदी काटेकोरपणे खबरदारी घेतली जाईल, संबंधित विभागातील भ्रष्ट मंडळी दहशतीखाली येतील, पेपर फोडण्याचे दुस्साहस कोणी करणार नाहीत, पेपर फुटणारच नाही याची काळजी घेतली जाईल, एकूणच विद्यार्थ्यांच्या महत्वकांक्षेला सुरुंग लागणार नाही, असे आश्वासक चित्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर तयार होईल.
सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरू होऊन, त्याचा आजचा गुरुवारचा 19 वा दिवस आहे. या उपोषण आंदोलन काळात केंद्र शासनातील शिक्षण विभागाचा एकही अधिकारी वांगचुक यांना भेटण्यासाठी गेलेला नाही.एनडीए मधील घटक पक्षांचे नेते जंतर मंतर कडे फिरकलेले नाहीत. केंद्र शासनाचे प्रमुख म्हणून नरेंद्र मोदी यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेतेही मौन बाळगून आहेत. या प्रकरणात सत्ताधाऱ्यांची असंवेदनशीलता दिसून येते आहे. सोनम वांगचुक यांनी आपले बेमुदत उपोषण मागे घ्यावे असे आवाहन केंद्र शासनाकडून केले पाहिजे आणि त्याआधी नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आम्ही कठोर कारवाई करण्यात कोणतीही कसूर ठेवलेली नाही, इथून पुढे असे प्रकार घडणार नाहीत याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ असे सांगून, तसे आश्वासक वातावरण तयार करण्याची जबाबदारी आमची आहे. हे पटवून दिले पाहिजे. अजून किमान तीन वर्षे तरी देशात कोणत्याही निवडणुका नाहीत, (movement) त्यामुळे सोनम वांगचुक यांच्या उपोषण आंदोलनाचा फटका बसेल असे नाही. आणि म्हणून उपोषण आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात असेल तर ती बाब गंभीर मानायला हवी.
नवी दिल्लीत इसवी सन 2013 च्या दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण आंदोलन केले होते. या उपोषणाचा भाजपने अतिशय खुबीने आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी वापर केला होता. तेव्हाचे अण्णा हजारे यांचे आंदोलन एक इव्हेंट म्हणून पुढे आले होते आणि त्याचा नंतर भारतीय जनता पक्षाला सत्तेवर येण्यासाठी फायदा झाला होता हे नाकारता येणार नाही. सध्या केंद्र शासनात खांदेपालट करण्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळात बदल आणि विस्तार हे विषय असतील तर धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात फारशी अडचण येणार नाही.
हेही वाचा :
पेट्रोल डिझेल स्वस्त झालं की महाग? वाचा आजचे लेटेस्ट रेट?