पुण्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी अवलंबलेली आरोपींची ‘धिंड’ काढण्याची पद्धत आता त्यांच्या अडचणीचे कारण ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. गुन्हेगारांची दहशत कमी करण्यासाठी आणि समाजात कायद्याचा धाक निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या कारवाईवर आता राज्य मानवी हक्क आयोगाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दोन व्हायरल व्हिडिओंची आयोगाने स्वतःहून (सुओ-मोटो) दखल घेत चौकशी सुरू केली असून, (crime) त्याचा अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे.

गेल्या काही वर्षांत पुण्यात अल्पवयीन टोळ्यांकडून वाहनांची तोडफोड, कोयते घेऊन दहशत माजवणे, गोळीबार आणि किरकोळ कारणांवरून मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आरोपींना त्यांच्या परिसरातून सार्वजनिकरीत्या फिरवून त्यांचा माज उतरवण्याची पद्धत सुरू केली होती. अनेक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असले, तरी काहींनी ती मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचा आरोप केला. (crime) अलीकडेच सोशल मीडियावर दोन व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. एका प्रकरणात आरोपींना गुडघ्यावर बसवून रस्त्यावरून फिरवल्याचा व्हिडिओ समोर आला, तर दुसऱ्या प्रकरणात अल्पवयीन आरोपींना पोलिस वाहनावर बसवून नेत असताना त्यांना मारहाण झाल्याचे दृश्य व्हायरल झाले. या दोन्ही घटनांची राज्य मानवी हक्क आयोगाने गंभीर दखल घेतली असून, त्याबाबत तथ्यशोधन सुरू केले आहे.
या चौकशीसाठी आयोगाने जिल्हा न्यायाधीश दर्जाचे रजिस्ट्रार, एक पोलिस अधीक्षक आणि अन्य सदस्यांचा समावेश असलेली तीन सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. समितीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याला भेट देऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. तसेच सीसीटीव्ही फुटेज, पोलिस नोंदी, तपासाशी संबंधित कागदपत्रे आणि इतर पुराव्यांची पडताळणी करण्यात आली आहे.(crime) दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनीही स्वतंत्र चौकशीचे आदेश दिले आहेत. परिमंडळ दोनचे उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू असून, संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून संपूर्ण घटनेची पडताळणी केली जात आहे.या घडामोडींमुळे गुन्हेगारीविरोधातील कठोर कारवाई आणि मानवी हक्कांचे संरक्षण यामधील समतोल कसा राखायचा, याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आयोगाच्या अहवालानंतर या प्रकरणात पुढे कोणती भूमिका घेतली जाते, याकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
पंकजा मुंडेंना पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर राजकारणात खळबळ?
व्यसनमुक्त असणाराच खरा सत्संगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंत्र?