आधी वादावादी नंतर कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर कामाबाबत समिती स्थापन करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय?

करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर जतन, संवर्धन कामाच्या तक्रारीबाबत जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक डॉ. विजय राठोड यांनी अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे.मंदिर परिसर, मणिकर्णिका कुंड, नगारखाना इमारत आणि गरुड मंडप बांधकाम इत्यादी ठिकाणी राज्य पुरातत्त्व विभाग पुणे यांच्यामार्फत जतन व संवर्धनाची कामे सुरू आहे. (Mahalaxmi Temple) मंदिर संवर्धनाच्या पहिल्या टप्प्यात मंदिराच्या आतील ओवऱ्या सहीत विविध कामांचा समावेश आहे.

या कामांमध्ये त्रुटी व नियमबाह्य कामे होत असल्याबाबत विविध संघटना, व्यक्ती आणि भाविकांनी तक्रारी व निवेदने सादर केली आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीतील हा निर्णय घेण्यात आला.याबाबतची बैठक होणार असल्याचे पत्र देवस्थान समितीने दिलीप देसाई यांना पाठवले होते. त्यानुसार प्रमुख सामाजिक कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोचले असता बैठक पुढे ढकलण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. त्यावर संतप्त कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आई महालक्ष्मी यांना सद्बुद्धी दे असे म्हणत ठिय्या आंदोलन आरंभले. काही वेळाने जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना हात बोलावून चर्चा केली. (Mahalaxmi Temple)यावेळी दिलीप देसाई, विजय देवणे, बाबा पार्टे, वकील बाबा इंदुलकर वकील प्रसन्न मालेकर, हर्षल सुर्वे, किशोर घाटगे उपस्थित होते. प्रशासकीय कारणामुळे बैठक पुढे ढकलावी लागल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून अपर जिल्हाधिकारी अजय पवार, तर सदस्य म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक चंद्रशेखर दिघावकर, भूजल सर्व्हेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक शशिकांत निंबाळकर व शिवाजी विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. अवनिश पाटील यांचा समावेश आहे.मंदिर परिसरात प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी करून सुरू असलेल्या जतन व संवर्धन कामांची तपासणी करावी, प्राप्त तक्रारी व निवेदनांमधील मुद्द्यांची प्रत्यक्ष पाहणीदरम्यान पडताळणी करावी, राज्य पुरातत्त्व विभाग पुणे यांच्या लागू असलेल्या नियम, निष्कर्ष व मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामांची तपासणी करावी, आवश्यक असल्यास संबंधित अधिकारी, तांत्रिक अधिकारी व तक्रारदार यांचे म्हणणे ऐकून त्याची नोंद घ्यायची आहे.

या कामांबाबत विविध संघटना, भाविक यांनी दिलेल्या निवेदनातील मुद्दे व पुरातत्त्व विभागाकडील मंदिर जतन संवर्धन कामातील मार्गदर्शक तत्वे कार्यारंभ आदेशातील अटी व शर्ती या संपूर्ण बाबींचा सखोल अभ्यास करून निष्कर्ष व शिफारशींसह सविस्तर (Mahalaxmi Temple)अहवाल तातडीने या सादर करावा, समितीतील सर्व सदस्यांनी संयुक्तिक समन्वयाने स्थळ पाहणी करावी. समितीस आवश्यक वाटेल तेव्हा आवश्यक त्या यंत्रणांना बैठकीस व स्थळ भेटीस बोलवता येईल, चालू असलेली कामे नियमाप्रमाणे चालू आहेत किंवा कसे याबाबत प्रत्यक्ष स्थळ भेटी देऊन खातर जमा करावी व त्याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी आदेशित केले आहे.

हेही वाचा :

माजी खासदार राजू शेट्टींच्या ‘स्वाभिमानी’ला जाग, आता ‘एकला चलो’चा नारा?

आधी वादावादी नंतर कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर कामाबाबत समिती स्थापन करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय?

कोल्हापूर विमानतळ धावपट्टी विस्तारणार कधी?